नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दि. २३ जुलै २०२४, मंगळवार सकाळी ११ वाजता अर्थसंकल्पाचे वाचन सुरू केले. या अर्थसंकल्पात देशात वाढत्या बेरोजगारीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल, असा अंदाज बांधण्यात आला होता. सरकारने सुद्धा या अर्थसंकल्पात रोजगारासाठी अनेक योजनांची घोषणा केली आहे.
रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रोत्साहन देणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. सरकारने रोजगार देण्यासाठी पाच प्रोत्साहनपर योजना आणणार आहे. पंतप्रधान योजनेंतर्गत तीन टप्प्यांत रोजगारनिर्मीतीसाठी प्रोत्साहन दिले जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हणाल्या की, "मला ५ वर्षात ४.१ कोटी तरुणांना रोजगार, कौशल्ये आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी ५ योजना आणि उपक्रमांचे पंतप्रधान पॅकेज जाहीर करताना आनंद होत आहे."
हे वाचलंत का? - अर्थसंकल्प २०२४-२५! मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस; मस्य शेतीवरसुद्धा विशेष लक्ष
पुढे बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, "या वर्षी रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार २ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यासोबतच रोजगार आणि कौशल्य विकासासाठी १.४८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यासोबतच पहिल्यांदा पीएफ मध्ये नोंदणी होणाऱ्या कर्मचाऱ्याला एका महिन्याचा पगार योगदानाच्या रुपात पहिल्या तीन आठवड्यात देण्यात येणार, असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.