चंदीगढ : हरियाणाच्या मेवात भागातील नुँहमध्ये एमएसएम, मोबाईल इंटरनेट सेवा २४ तासांसाठी बंद करण्यात आली आहे. सोमवार, दि. २२ जुलै २०२४ येथे ब्रज मंडळ जलाभिषेक यात्रा काढण्यात येणार आहे, त्यासंदर्भात सरकार सतर्क आहे. गतवर्षी ब्रज मंडळ जलाभिषेक यात्रेत सहभागी झालेल्या हिंदू भाविकांवर कट्टरपंथीयांनी हल्ला केला होता. ज्यात ६ जणांचा मृत्यू झाला होता.
कट्टरपंथी जमावाने सायबर पोलीस ठाण्यालाही लक्ष्य करून आग लावली होती. या काळात दीडशेहून अधिक वाहनेही जाळण्यात आली होती. या हल्ल्यानंतर गुरुग्राममध्ये दोन गटात हिंसाचार झाला होता. जलाभिषेक यात्रेवर झालेल्या हल्ल्यानंतर ब्रज मंडळ बराच काळ तणावाखाली होते आणि गुन्हेगार-दंगलखोरांना पकडण्यासाठी पोलिसांना मोठी कारवाई करावी लागली होती.
या प्रकरणात आरोपी दंगलखोर डोंगरात लपून बसले होते, त्यासाठी पोलिसांना ड्रोनची मदत घ्यावी लागली आणि चकमकीनंतर अनेक गुन्हेगारांना अटक केली. यावेळी प्रशासन सतर्क आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हरियाणाच्या मेवात जिल्ह्यातील नुँहमध्ये इंटरनेट सेवा आणि एसएमएसवर बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने हे पाऊल उचलल्याचे पोलिस अधीक्षक विजय प्रताप यांनी सांगितले.
ब्रज मंडळ जलाभिषेक यात्रेपूर्वी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. रविवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून दि. २२ जुलैच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत इंटरनेट सेवा खंडित राहील. हरियाणाचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अनुराग रस्तोगी यांनी दिलेल्या आदेशानुसार, जिल्ह्यातील इंटरनेट सेवा रविवारी संध्याकाळी सहा ते सोमवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहणार आहे. आदेशात म्हटले आहे की, नुँहमध्ये तणाव, आंदोलन, सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान आणि शांतता आणि सौहार्द भंग होण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून चुकीची माहिती आणि अफवा पसरू नये म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे. गेल्यावर्षी दि. ३१ जुलै रोजी हरियाणातील नुँह येथे कट्टरपंथी जमावाकडून मिरवणूक रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यांनी हिंदूं भाविकांवर हल्ले केले होते.