‘आव्हान पालक संघा’च्या माध्यमातून १८ वर्षांवरील विशेष मुलांना सर्वांगीण विकास आणि रोजगाराचे प्रशिक्षण देऊन, त्यांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवणार्या वंदना विद्याधर कर्वे यांच्या कार्याविषयी...
मुंबईच्या दादरमध्ये १८ वर्षांवरील विशेष बालकांसाठी एक कार्यशाळा आयोजित केली जाते. जवानांना स्वहस्ते बनविलेल्या राख्या बांधण्यासाठी या कार्यशाळेतील भगिनी दरवर्षी रक्षाबंधनाला देशातील विविध सीमांवर भेट देतात. ही कार्यशाळा ज्यांच्या यशस्वी अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली राबविली जाते, त्या वंदना कर्वे. आयुष्यात आलेल्या एका अनपेक्षित वादळाने वंदना कर्वे यांचे आयुष्यच बदलून गेले. मात्र, या वादळातही न डगमगता खंबीरपणे उभं राहून आज ही माऊली ३५ विशेष बालकांच्या संगोपनात मोलाची भूमिका बजावते आहे.
वंदना कर्वे बारावीपर्यंतच्या शिक्षणानंतर पुढे संसारगाड्याकडे ओढल्या गेल्या. विवाहानंतर एका वर्षात त्यांनी अगदी गुटगुटीत लेकीला जन्मही दिला. मात्र, अचानक या बाळावर आजारपण ओढवले. या आजारपणात या बाळाने दृष्टी गमावली आणि ते गतिमंद झाले. मात्र, वंदना यांनी हार मानली नाही. त्यांनी वसुधा या आपल्या लेकीचं संगोपन तर केलंच, मात्र वसुधासारख्या समाजातील इतर विशेष बालकांना आपल्या पायावर उभं करण्याचं आणि उत्पन्नाचं साधन मिळवून देण्याचीही जबाबदारीही स्वीकारली.
जन्मजात किंवा आजारपणाने ओढवलेल्या दिव्यांगत्वामुळे मुलांची शारीरिक वाढ होत असली तरी मानसिक वाढ मात्र खुंटते. अशा मुलांना पालकांच्या विशेष संगोपनाची आवश्यकता असते. ६०-७०च्या दशकांत अशा दिव्यांग मुलांसाठी वयाच्या अठराव्या वर्षापर्यंतच प्राथमिक शिक्षण दिले जात असे. वयाच्या १८ वर्षांनंतर या विशेष बालकांसाठी कोठेही शाळा नव्हत्या. मग, १८व्या वर्षानंतर या मुलांनी काय करावे? त्यांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी मग आपसुकच येते ती पालकांच्या खांद्यावर. इतकेच नाही तर ही मुले पुन्हा घरातच बंदिस्त झाल्यामुळे आपसुकच समाजापासून अधिक दुरावतात. या कारणास्तव वसुधाचे संगोपन आणि शिक्षण कसे करावे, याबाबत कर्वे कुटुंबीय चिंतित होते.
वसुधा ज्या गतिमंद मुलांच्या शाळेत शिक्षण घेत होती, त्याच शाळेतील एका शिक्षकाने कर्वे यांना मुलांच्या १८व्या वर्षांनंतर कशी काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. इतकेच नाहीतर अशा मुलांसाठी एखादी कार्यशाळा वंदना कर्वे यांनी सुरू करावी, असा सल्लाही दिला. हा सल्ला गांभीर्याने घेत, वंदना कर्वे यांनी मग मुंबईतील १८ वर्षे वय पूर्ण केलेल्या अशा विशेष बालकांचा आणि त्यांच्या पालकांचा शोध घेतला. त्याचवेळी आणखी तीन मुली आणि त्यांच्या पालकांसह वंदना कर्वे यांनी घरातच एक कार्यशाळा सुरू केली. १९७३-७४ मध्ये कर्वे यांनी ’आव्हान पालक संघा’ची स्थापना केली. अगदी प्राथमिक स्तरावर तीन मुलींसह ही कार्यशाळा सुरू झाली.
निधीची आणि जागेची कमतरता होतीच. मात्र, त्यावरही उपाय शोधण्यात आले आणि १९९० मध्ये या संस्थेची धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी झाली. या संस्थेच्या माध्यमातून १८ वर्षे वय पूर्ण केलेल्या या विशेष मुलांना त्यांच्या क्षमतेची वेगवेगळ्या उपक्रमांतून जाणीव करून दिली जाते. तसेच त्यांच्यातील कलागुण-कौशल्ये विकसित करत व्यावसायिक प्रशिक्षणही दिले जाते. या कार्यशाळेत मुलांना मदतनीसांच्या सहकार्याने रंगांची ओळख, सुई ओवणे, फुलांच्या माळा बनविणे, मोजमाप करणे यांसारख्या अगदी सोप्या आणि व्यावहारिक गोष्टी शिकविल्या जातात. या संपूर्ण प्रशिक्षणासाठी किमान दहा वर्षांचा कालावधी द्यावा लागतो. त्यानंतर हीच दिव्यांग मुले एकमेकांस मदतनीस म्हणून साहाय्य करु शकतात.
या विशेष मुलांनी तयार केलेल्या वस्तू बाजारात नेण्यासाठी, कार्यशाळा, तसेच सेल्स, मार्केटिंग यांसारख्या जबाबदार्यांसाठी साहजिकच स्वयंसेवकांची गरज लागते. सध्या तरी ‘आव्हान पालक संघ’ दहा मदतनीस, १५ पालक आणि काही स्वयंसेवकांच्या मदतीने ही कार्यशाळा राबवितो. या संस्थेला ३० वर्षे पूर्ण झाली असून, सध्या अशी १५ दिव्यांग मुले प्रशिक्षण घेत आहेत. ३० वर्षांत एकूण ३५ दिव्यांग मुलांनी या संस्थेतून प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. या मुलांसाठी पालकांनी वेळ देणं हे मुलांच्या भविष्यासाठी महत्त्वाचे असल्याचे वंदना कर्वे सांगतात. शासनानेदेखील या बालकांच्या भविष्यासाठी पर्याय उपलब्ध करून देणे, त्यासाठी अर्थसाहाय्य, जागेची उपलब्धता आवश्यक असल्याचे त्या सांगतात.
मनाचे श्लोक, पाढे पाठांतर यांसारख्या गोष्टी, ज्या मुलांना बोलणे शक्य आहे, तेही त्यांना शिकविले जाते. तसेच या कार्यशाळेत मुलांनाही साध्या उत्पादक कामाचे प्रशिक्षण दिले जाते, ज्यासाठी त्यांना मासिक ‘स्टायपेंड’ आणि विक्रीनुसार वार्षिक बोनस मिळतो. सध्या वंदना कर्वे यांच्या या कार्यशाळेत हार, तोरण, आहेराची पाकिटे, चष्म्याच्या डिझायनर कॉड, मोत्यांचे हार, राखी यांसारख्या विविध वस्तू तयार केल्या जातात. या वस्तूची स्टॉलच्या माध्यमातून विक्री केली जाते.
वंदना कर्वे यांच्या कन्या वसुधा आज ५० वर्षांच्या आहेत. वसुधा यांना वंदना कर्वे यांच्या जिद्दीमुळे आणि योग्य उपचारांची साथ मिळाल्यामुळे दृष्टीही मिळाली. संस्कृत भाषा शिकून वसुधा यांना संस्कृत श्लोकही उत्तम म्हणता येतात. इतकेच नाहीतर अंकओळखही असून वसुधा यांना १५ पर्यंतचे पाढेही अगदी तोंडपाठ आहेत. वंदना कर्वे या माऊलीच्या जिद्दीला आणि कष्टाला त्रिवार सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
(अधिक माहितीसाठी संपर्क - ९०९६२८४६०६)