योगानंद माऊलींचे कीर्तनातून समाजप्रबोधन

    20-Jul-2024   
Total Views |
keertan yoganand mauli

समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि धर्मसेवेचे व्रत हाती घेऊन, समाजात बोकाळलेल्या पाखंडाचे खंडन करण्यासाठी ते प्रयत्नरत आहे. धर्माचा व्यापार होऊ नये, यासाठी त्यांचा आग्रह असतो. आज गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घेऊया कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करणार्‍या योगानंद माऊलींच्या प्रवासाविषयी...

ध्यान मूलं गुरु मूर्ति, पूजा मूलं गुरु पदम्।
मंत्र मूलं गुरु वाक्यं, मोक्ष मूलं गुरु कृपा॥
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सायने बुद्रुक गावी जन्मलेल्या योगानंद पंढरीनाथ पवार यांचे आई-वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. महाविष्णुच्या परंपरेनुसार वडील आध्यात्मिक क्षेत्रात सक्रिय होते. योगाभ्यास करताना योगाच्या सर्व अवस्था प्राप्त झाल्याने त्यांनी मुलाचे नाव ‘योगानंद’ असे ठेवले. वडील शिक्षक असल्याने सातत्याने बदल्या होत होत्या. त्यामुळे अनेक खेड्यांमध्ये योगानंद यांचे शिक्षण झाले. इयत्ता दहावीपर्यंत त्यांनी पाच-सहा वेळेस शाळा बदलली. शालेय वयात विवेकानंदांच्या ग्रंथांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. वयाच्या 14व्या वर्षी योगानंद यांचे वडील पंढरीनाथ तथा स्वानंद महाराज पवार यांनी 1972 साली त्यांना अनुग्रह दिला. योगानंदांच्या जन्माआधीपासून दर गुरूवारी घरात दत्त आराधना, भजन, सत्संग सुरू असायचा. 1997 साली योगानंदांना त्यांच्या गुरूमाऊलींनी अर्थात वडिलांनी अधिकार देत वारसा सोपवला. 1984 साली वडिलांनी स्वानंद अध्यात्मिक ध्यानधारणा केंद्र स्थापन केले. नाशिकसह मुंबई, जळगाव, इंदौर अशा विविध ठिकाणांहून हजारो साधक ध्यानमंदिरात येत असत.

दरम्यान, पुणे विद्यार्थीगृहाच्या महाराष्ट्र विद्यालयात शिकताना योगानंद आणि त्यांचे बंधू दोघेही खोली घेऊन राहात होते. दहावीनंतर योगानंदांनी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला. मात्र, तेव्हा ‘बीएएमएस’ शिक्षण साडेसात वर्षांचे असल्याने त्यांना अर्ध्यावरच ते शिक्षण सोडावे लागले. यानंतर 1977 साली ‘आयटीआय’ला प्रवेश घेतल्याने त्यांचा संघर्ष सुरू झाला. कसेबसे ‘आयटीआय’ उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी एका कंपनीत नोकरीही केली. पुढे मुंबईत नौदलात नोकरीसाठी जाहिरात आल्यानंतर त्यांनी अर्ज केला आणि त्यांची निवडही झाली. ‘आयएनएस विक्रांत’ जहाजावर तीन वर्ष काम केल्यानंतर वडिलांच्या आग्रहाखातर त्यांनी नोकरी सोडली. नाशिकला आल्यानंतर व्हिआयपी कंपनीत नोकरी केली. रेल्वे विभागात अर्ज केल्यानंतर तिथेही त्यांची निवड झाली. तेव्हा वडिलांच्या विनंतीनंतर त्यांनी रेल्वेत नोकरी स्वीकारली. या निवडीदरम्यान बराच कालावधी गेल्याने त्यांनी पुण्यात ‘बजाज’, ‘फिलीप्स’ या कंपन्यांमध्येही काम केले. भुसावळ विभागात काम करत असताना नाशिकमधील वसंत व्याख्यानमालेलाही ते उपस्थित राहात असत.

गुरूकार्य वाढवत असताना ते नाशिकसह राज्यभर कीर्तन, प्रवचनेदेखील करू लागले. 2001 साली त्यांनी चेहेडी येथे पहिले कीर्तन केले. त्यानंतर त्यांना ‘योगानंद माऊली’ असे म्हटले जाऊ लागले. 2006 साली ‘सह्याद्री’ वाहिनीवर त्यांचे कीर्तन प्रसारित झाले होते. आजपर्यंत त्यांनी दोन हजारांहून अधिक कीर्तने केली आहेत. विशेष म्हणजे, नोकरी सांभाळत त्यांचे हे कार्य सुरू होते. समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती, श्रद्धा संवर्धन, नामदान, नामप्रसार, शाकाहार प्रसाराचे कार्य त्यांनी हाती घेतले, जे आजतागायत अविरत सुरू आहे. कीर्तनातून ते शाकाहारी होण्याचे आणि तुळशीमाळ घालण्याचे आवाहन करतात. कीर्तनातून गोसेवा प्रचार, गोवंशरक्षण, राष्ट्रधर्म, मातृ-पितृ सेवा, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, योगप्रसार, मातृशक्ती आणि नारीशक्ती आदी विषयांवर ते प्रबोधन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगर येथील हनुमान मंदिरात मागील 17 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. गुरूपौर्णिमेला अनेक साधक त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या नाशिकच्या डीजीपीनगर येथील स्वानंद ध्यानधारणा केंद्रात येत असतात. ‘हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघा’चे प्रचार-प्रसार आणि ‘पतंजली योग सेवा समिती’चेही ते काम करतात. त्यांना 2011चा ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार व गौरव’, 2010चा ‘जनसेवा प्रतिष्ठान’चा ‘जीवनगौरव पुरस्कार’, 2021 साली ‘पतंजली योगपीठ कोरोना योद्धा सन्मान’, ‘राष्ट्रीय श्री भोलानाथ भजनी मंडळ सन्मानपत्र’, ‘श्री भक्तीधारा अध्यात्मिक परिवारा’चा ‘समाजरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे.

‘स्वानंद ज्योती’ अंकही त्यांनी प्रकाशित केला. सामाजिक कार्याचा वसाही त्यांनी घेतला असून, त्यांच्यावतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. वनवासी भागात ते गरजूंना आवश्यक वस्तूंचे वाटपही करतात. स्वामी गोविंददेव गिरी महाराज, स्वामी रामदेव यांचे शुभाशीर्वादही योगानंद माऊलींना मिळाले आहेत. हजारो साधक असलेले योगानंद माऊली आजही राज्यातील विविध भागांमध्ये कीर्तन करतात. संत निवृत्तीनाथांच्या त्र्यंबकेश्वरला दरवर्षी ते दिंडीदेखील काढतात. ओम श्री शिवांजनेय हरिहर दत्तसेवा आश्रम उभारण्याचे काम सध्या त्र्यंबकेश्वर येथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 2019 साली आईचे निधन झाल्यानंतर चार महिन्यांपूर्वीच योगानंद माऊलींच्या वडिलांचेही निधन झाले. योगानंद माऊलीदेखील चार वर्षांपूर्वी रेल्वेच्या सेवेतून निवृत्त झाले. शिक्षणाची भूक अपूर्ण राहिल्याने त्यांनी वयाच्या 57व्या वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून त्यांनी मानसशास्त्रातून पदवी अर्थात ‘बीए’ पूर्ण केले. यानंतर पुणे विद्यापीठातून ‘तत्त्वज्ञान’ विषयातून त्यांनी वयाच्या 61व्या वर्षी ‘एमए’ शिक्षण पूर्ण केले. आता त्यांचा ‘पीएचडी’ पूर्ण करण्याचा मानस आहे.

मूळ धर्म सनातन वैदिकच

सध्या माझ्याकडे दोन हजारांहून अधिक आध्यात्मिक ग्रंथसंपदा आहे. 25 पेक्षा अधिक वेगवेगळे दुर्मीळ श्रीमद् भागवत ग्रंथ प्रती संग्रहात असून, ‘सप्त सागर’ नावाचा दुर्मीळ ग्रंथदेखील संग्रहात आहे. तसेच ‘गुरूचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘विचार सागर’, ‘तुकाराम गाथा’, ‘एकनाथ गाथा’, ‘वेद’, ‘सकलसंत गाथा’, ‘दत्त प्रबोध’ यांसह संविधानही संग्रही आहे. ‘सावाना नाशिक’च्या माध्यमातून मी वाचनाची आवडही जोपासली. वाचन, रेडिओ, लेख आणि अध्यात्म ही माझी ताकद आहे. धार्मिक ग्रंथ ही संस्कृतीच्या कायद्याची पुस्तके आहेत. आठ कंपन्यांत आणि सात सरकारी नोकर्‍या मला लागल्या. गेल्या अनेक वर्षांपासून मी दैनंदिनी लिहित आहे. विवेकानंदांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकजण शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो, त्यामुळे अजूनही दररोज अभ्यास सुरूच असतो. प्रत्येक धर्माच्या मूळ गाभ्यात संस्कार आणि सदाचारच आहेत. मूळ धर्म सनातन वैदिकच आहेत, असे योगानंद माऊली ठामपणे सांगतात.


पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.