नवी दिल्ली, दि.२ : वृत्तसंस्था भारतातील उत्तर, दक्षिण आणि पूर्व भागात बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी व्यवहार्यता अभ्यास करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दि. २७ जून रोजी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना सांगितले. सद्यस्थतीमध्ये मुंबई-अहमदाबाद या मार्गावर ५०० किमी अंतराच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. याच पार्श्वभूमीवर आता देशातील इतर मार्गांवर या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात भारतात मेट्रो बरोबरच आता बुलेट ट्रेनचे जाळेही विस्तारण्याची चिन्हे आहेत.
याअभ्यास अंतर्गत प्रगत वाहतूक व्यवस्थेद्वारे कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी भारत सरकारची वचनबद्धता दर्शवतात. राष्ट्रपती मुर्मू यांनी अहमदाबाद आणि मुंबई दरम्यान सुरू असलेल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाचाही संदर्भ दिला, जो वेगाने प्रगती करत आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ५०८ किलोमीटरचा, १२ स्थानके, २४ नदी पूल, आठ पर्वतीय बोगदे आणि एक समुद्राखालील बोगदा हा पायाभूत सुविधांच्या दृष्टीने एक अविष्कार म्हणून ओळखला जात आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) द्वारे याची अंमलबजावणी केली जात आहे.
३२० किमी ताशी चालणारी हाय-स्पीड रेल्वे मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानचे ५०८.१७ किमीचे अंतर केवळ दोन तासांत पार करेल. हे दोन टर्मिनल स्थानकांमधील सध्याच्या प्रवासाच्या वेळेच्या तुलनेत सुमारे नऊ तास (बसने) किंवा सहा तास (पारंपारिक रेल्वेद्वारे) वेळ वाचवेल. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने ऑगस्ट २०२६पर्यंत सूरत आणि बिलीमोरा दरम्यानचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठीच्या व्यवहार्यता अभ्यासामुळे भारताच्या रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये आणखी प्रगती होण्याचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे.