कौशल्याची दिंडी! ५ हजार आयटीआयच्या विद्यार्थ्यांसह मंत्री लोढांचा सहभाग

    02-Jul-2024
Total Views |
 
Lodha
 
पुणे : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या भेटीसाठी लाखों भाविक भक्त पंढपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, 'विकासाच्या वाटेवर कौशल्याची दिंडी' असा अनोखा उपक्रम राबवत मंत्री मंगल प्रभात लोढादेखील या वारीत सहभागी झाले आहेत.
 
हे वाचलंत का? -   भर सभागृहात अंबादास दानवेंकडून शिवीगाळ! 
पुण्यातील भैरोबा नाला, रेसकोर्स जवळ 'कौशल्य दिंडी' कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांनी दिंडीत सहभाग घेतला. सुमारे ५ हजार आयटीआयच्या विद्यार्थ्यांसह त्यांनी या वारीच्या सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी विठू माऊलीने महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् करावे आणि युवकांना कौशल्ययुक्त करण्यासाठी सर्वांना प्रेरणा द्यावी, अशी प्रार्थना त्यांनी केली. तसेच डोक्यावर विठ्ठल-रुख्मिणीची मुर्ती आणि हाती टाळ घेत त्यांनी या वारीचा आनंद घेतला.
 
यावेळी बोलताना मंत्री लोढा म्हणाले की, "महायुतीचे सरकार आल्यानंतर आज प्रथमच कौशल्य दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे महत्व अधोरेखित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज रोजगाराची समस्या आपल्या सर्वांसमोरचे आव्हान आहे आणि ती सोडवण्यासाठी कौशल्य विकास विभाग मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना, छत्रपती शाहू महाराज करियर मार्गदर्शन शिबीर, महारोजगार मेळावे, आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र यासारखे भरपूर उपक्रम कौशल्य विकास विभाग राबवत आहे. महाराष्ट्र कौशल्य संपन्न व्हावा यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी कौशल्य विकासाच्या, रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या संधींचा फायदा घ्यावा," असे आवाहन त्यांनी केले.