अमेरिकन मिड वेस्ट, प्रझेकरोज आणि काझीमीर

Total Views |
american mid west prazeckroz


आता इतक्या मोठ्या कालावधीनंतर म्हणजे 2024 साली ‘प्रझेकरोज’ची इंग्रजी आवृत्ती काढावी, असे चालकांना का बरे वाटले असावे? नव्या पिढीचा पोलिश भाषेशी संपर्क कमी होत चालला असावा. मूळचे इंग्रज असणारे लोक अमेरिकेत स्थलांतरित झाले आणि जेमतेम 100 वर्षांतच त्यांनी खुद्द मायभूमी इंग्लंडविरुद्धच युद्ध पुकारले.

अमेरिकन संयुक्त संस्थाने किंवा अमेरिका या देशामध्ये एकूण 50 संस्थाने किंवा राज्ये आहेत. यांपैकी उत्तर डकोटा, दक्षिण डकोटा, नेब्रॅस्का, कॅन्झस, मिनेसोटा, आयोवा, मिझुरी, विस्कॉन्सिन, इलिनॉय, मिशिगन, इंडियाना आणि ओहायो एवढ्या राज्यांना ‘मिड वेस्ट’ असे म्हटले जाते.

आजचे अमेरिकन राष्ट्र हे युरोपीय गोर्‍या स्थलांतरित लोकांचे राष्ट्र आहे, हे आपल्याला माहीतच आहे. कोणकोणत्या देशांमधले आहेत हे स्थलांतरित? सर्वात मोठी संख्या अर्थातच इंग्लंडची. मग इटली, आयर्लंड, जर्मनी आणि पाचव्या क्रमांकावर आहे पोलंड. आता गंमत बघा, इटली, आयर्लंड, जर्मनी आणि पोलंड हे सगळे कॅथलिक ख्रिश्चन देश. तिथले स्थलांतरितही अर्थातच कॅथलिक होते. पण, प्रोटेस्टंट ख्रिश्चन असणार्‍या इंग्लंडने, म्हणजे इंग्लिश स्थलांतरितांनी अमेरिकन राजकारणाची सूत्रे नेहमीच आपल्या हातात ठेवली. अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हा प्रोटेस्टंट होता. सन 1789 मध्ये तो राष्ट्राध्यक्ष बनला. यानंतर थेट 1961 साली म्हणजे सुमारे 175 वर्षांनंतर एक कॅथलिक माणूस राष्ट्राध्यक्ष बनू शकला.

1961 साली राष्ट्राध्यक्ष बनलेले जॉन केनेडी हे आयरिश कॅथलिक होते. त्यांच्यानंतर एकदम जो बायडन म्हणजे 2021 साली राष्ट्राध्यक्ष झालेले वर्तमान अध्यक्ष हे कॅथलिक आहेत. 2009 ते 2017 राष्ट्राध्यक्ष असलेले बराक ओबामा हे कृष्णवर्णी मुसलमान आफ्रिकन पिता आणि गौरवर्णी प्रोटेस्टंट ख्रिश्चन माता यांचे अपत्य होते. पण, ते स्वतःला म्हणवतात प्रोटेस्टंटच. अमेरिकन साहित्यिक, लेखक, विचारवंत म्हणत असतात की, आमचे राष्ट्र म्हणजे एक उकळती कढई आहे. विविध देशांचे, विविध वंशांचे, विविध भाषांचे लोक या उकळत्या कढईत एकजीव, एकरस होऊन जातात. हे खरे आहेही आणि नाहीही. एकतर राजकीय क्षेत्रावर इंग्लिश गोर्‍या प्रोटेस्टंटांचे वर्चस्व आजही कायम आहेच. दुसरे म्हणजे, विविध वंशांच्या मूळच्या लोकांनी आपापल्या संस्था, संघटना निर्माण केल्या आहेत. यांच्या नियमित बैठका होतात. त्यांची नियतकालिके निघतात.

ते पाहा मिशिगन या विशाल सरोवराच्या काठावर असलेले मिलवॉकी शहर. अलीकडे सर्वच शहरांमध्ये नाना-नानी पार्क, आजी-आजोबा पार्क वगैरे बनवण्याची फॅशन बोकाळली आहे. तसेच मिलवॉकीमधलेहे भले मोठे आजी-आजोबा पार्क. संध्याकाळची वेळ आहे. नेहमीसारखेच अनेक म्हातारे, म्हातार्‍या जॉगिंग करत आहेत, अड्डे जमवून गप्पा हाणत आहेत. पण, आज काही मध्यमवयीन आणि तरुण माणसेसुद्धा दिसत आहेत. एक गायक-वादकांचा ताफासुद्धा आला आहे. एवढ्यात बगीच्यातून काहीतरी वर हवेत उडाले. बाप रे! एक भले मोठे तान्हे बाळ हवेत उडाले? आहे तरी काय भानगड? ज्यांना ते दृश्य दिसले, अशा अनेकांनी लगेच त्या बागेकडे धाव घेतली.

मग सगळ्यांच्याच लक्षात आले की, ते भले मोठे तान्हे बाळ म्हणजे गॅसचा फुगा आहे. त्याचे दोर खाली जमिनीवर घट्ट बांधलेले असल्यामुळे ते बाळ आता आकाशात स्थिर झाले आहे. तो गायक-वादकवृंद आता एक छानसे गीत गात आहे. ‘प्रझेकरोज’ नावाच्या पोलिश म्हणजे पोलंड देशाच्या भाषेतील एका मासिकाचा हा उद्घाटन किंवा प्रकाशन सोहळा आहे. हे मासिक आता पोलिश भाषेसोबत इंग्रजीतही प्रकाशित होणार आहे. म्हणजे एक नवे बाळ जन्मले आहे, असे सूचित करण्यासाठी बाळाच्या आकाराचा गॅसचा फुगा आकाशात सोडण्याची ही अभिनव कल्पना ‘प्रझेकरोज’ मासिकाची संपादिका मरिया कोझॅक हिच्या सुपीक डोक्यातून निघालेली आहे. अगोदर सांगितलेल्या अमेरिकन ‘मिड वेस्ट’मध्ये पोलिश स्थलांतरितांची लक्षणीय संख्या आहे. आपणा भारतीय लोकांना साधारणपणे शिकागो हे शहर माहीत असते. कारण, स्वामी विवेकानंदांनी याच शिकागो शहरातल्या सर्वधर्म परिषदेत हिंदुत्वाचा ध्वज उंच फडकवून सगळे जग दिपवून सोडले होते.

तर या शिकागो शहरातच ‘पोलिश अमेरिकन काँग्रेस’ अशी पोलिश स्थलांतरितांची प्रभावी संघटना आहे. शिकागोमध्येच ‘पोलिश म्युझियम ऑफ अमेरिका’ असे संग्रहालयसुद्धा आहे. तिथली संचालिका निआट्रिक्स झरकावस्की ही पोलंड देशाचा गेल्या एक हजार वर्षांचा इतिहास तर घडाघडा सांगतेच, पण एका अतिशय उमद्या योद्ध्याच्या तैलचित्रासमोर प्रेक्षकांना उभे करून ती सांगते, हा आहे पोलंडचा पराक्रमी सेनापती काउंट काझीमीर पुलास्की, हा अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात क्रांतिकारकांच्या बाजूने लढला. अमेरिकेला स्वातंत्र्य मिळावे म्हणून याने बलिदान केले आणि याने योग्य वेळी माघार घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे जनरल जॉर्ज वॉशिंग्टन यांचे प्राण वाचले, अन्यथा चाल करून येणार्‍या इंग्रज सैन्याने वॉशिंग्टनला ठार केले असते किंवा कैद तरी केले असते.

खरोखरच काझीमीर पुलास्की (किंवा पलास्की) हा एक फार मोठ्या क्षमतेचा सेनापती होता. त्याच्या काळात पोलंडच्या सभोवार रशिया, प्रशिया आणि ऑस्ट्रिया यांची जबरदस्त साम्राज्ये होती आणि या तिघांनाही पोलंडचे लचके तोडायचे होते. यांच्याशी झुंजताना, झगडताना पुलास्कीने अनेक रणांगणे गाजवून सोडली. पण, दुर्दैवाने त्याच्या स्वकीयांनीच त्याचा घात केल्यामुळे त्याला स्वदेशातून परागंदा होऊन फ्रान्सचा राजकीय आश्रय घ्यावा लागला. तिथून त्याला बाहेर काढून अमेरिकेत पाठवण्याची कल्पना अमेरिकन क्रांतिकारक पक्षाचा फ्रेंचमित्र मार्कुस द लाफायेत आणि अमेरिकन विचारवंत बेंजामिन फ्रँकलिन यांची अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात, इंग्लिश साम्राज्यवादाविरुद्ध लढण्यासाठी, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा पुरस्कर्ता असणारा पुलास्की बोस्टनला येऊन पोहोचला. त्याने अमेरिकन क्रांतिकारक सैन्याची पाहणी केली. त्याला असे आढळले की, खुद्द सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टनसह सर्वच सेनापती हे पायदळावरच विसंबून आहेत. घोडा हे ते फक्त प्रवासाचे वाहन म्हणून वापरतात.

घोडदळाची युद्धपद्धती, घोडदळाची मारकशक्ती याची त्यांना कल्पनाच नाही. पुलास्कीने वॉशिंग्टनसह इतर सेनापतींसमोर आपले म्हणणे मांडले. वॉशिंग्टनने तो म्हणतो तसे घोडदळ संघटित करण्याची जबाबदारी त्याच्यावरच सोपवली. मग पुलास्कीने मोठ्या प्रयत्नांनी पायदळ पथकांमधूनच कुशल घोडेस्वार निवडून काढले. त्यांना घोडदळ युद्धपद्धतीचे प्रशिक्षण दिले. टेहळणीचेही प्रशिक्षण दिले. याचा परिणाम लगेच दिसला. जॉर्ज वॉशिंग्टनच्या लष्करी तळावर फार मोठी इंग्रजी सेना चालून येत आहे, अशी खबर या घोडेस्वार टेहळणी पथकाने आणली. आता लढाईला उभे न राहता माघार घेण्यातच शहाणपणा आहे, असा सल्ला पुलास्कीने वॉशिंग्टनला दिला. त्याने तो मानला आणि त्याचे प्राण वाचले, पराभव टळला. काझीमीर पुलास्कीला अमेरिकन सैन्याचा ब्रिगेडियर जनरल बनवण्यात आले.
 
पण, दि. 9 ऑक्टोबर 1779 या दिवशी आजच्या जॉर्जिया राज्यातल्या सवेना शहराजवळ थंडरबोल्टच्या लढाईत काझीमीर पुलास्की जबर जखमी झाला आणि दि. 11 ऑक्टोबरला मरण पावला. आपल्या घोडदळ पदकाचे नेतृत्व करीत इंग्रज सैन्यावर चालून जात असताना एक इंग्रजी तोफगोळ्याने त्याचा अचूक वेध घेतला. स्वतःचा देश स्वतंत्र ठेवू न शकलेला पण अमेरिकेच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेला काझीमीर पुलास्की हा पोलिश योद्धा अवघा 34 वर्षांचा होता. अमेरिकन राष्ट्राने पुलास्कीला मानद नागरिकत्व तर दिलेच, शिवाय ‘फादर ऑफ अमेरिकन कॅव्हलरी’ म्हणूनही गौरविले. अमेरिकाभरात अनेक ठिकाणी त्याच्या नावाचे रस्ते, चौक, संस्था, शाळा, महाविद्यालये, संशोधन संस्था आहेत. दरवर्षी दि. 11 ऑक्टोबरला अमेरिकेत ‘जनरल पुलास्की मेमोरियल डे’ पाळला जातो. न्यूयॉर्कच्या ‘फिफ्थ अ‍ॅव्हेन्यू’ या फार मोठ्या चौकात अमेरिकन सेना एक शानदार संचलन करून पुलास्कीला मानवंदना देते.
 
हा सगळा वृत्तांत सांगण्याचे तात्पर्य काय की, अमेरिकन राष्ट्राच्या जन्मापासूनच पोलंड देशामधून अमेरिकेत स्थलांतर करणार्‍या लोकांची संख्या भरपूर होती. दुसर्‍या महायुद्धानंतर पोलंड सोव्हिएत रशियाचा मांडलिक देश बनला. साम्यवादी राज्यकर्त्यांच्या दडपशाहीमुळेही अनेक पोलिश परिवार अमेरिकेत पळून आले. अमेरिकन ‘मिड वेस्ट’ राज्यांमध्ये, त्यातही शिकागोसारख्या शहरांमध्ये सार्वजनिक चौकात, हॉटेलात चार-पाच लोक पोलिश भाषेत गप्पा मारताना ऐकू येणे, हे सामान्य दृश्य आहे. अतिशय गरिबीतून वर येऊन हॉलिवुडचा सुपरस्टार बनलेला अभिनेता चार्ल्स ब्रॉन्सन याचे पूर्वज मूळचे पोलिश-लिथुएनियन होते.

अमेरिकेसह सगळे जगच आपल्या लाल साम्राज्यात आणू पाहणार्‍या सोव्हिएत रशियन साम्राज्याचे पतन पोलंड देशातल्या काही घटनांपासूनच सुरू झाले होते. पोलंडच्या गडान्स्क या मुख्य बंदरात कामगार नेता लेक वालेसा याच्या नेतृत्वाखाली पोलिश गोदी कामगारांनी अभूतपूर्व संप पुकारला होता. स्वतःला ‘कामगारांचे राज्य’ म्हणवणार्‍या शासनाच्या विरोधात त्याच देशातले कामगार बंड करून उठतात, हा हादरा पोलंड हुकूमशहा जनरल यारुझेल्स्की सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष ब्रेझनेव्ह आणि एकंदरीत सोव्हिएत तत्वज्ञान यांनाच होता. 1980-81 साली उभा राहिलेला हा लढा 1991 साली सोव्हिएत रशियातली साम्यवादी राजवट संपवूनच थांबला.

हा सगळा घटनाक्रम जरी अमेरिकेपासून दूर युरोप खंडात घडत होता, तरी अमेरिकन ‘मिड वेस्ट’मधल्या पोलिश भाषिक अमेरिकन स्थलांतरितांना ‘प्रझेकरोज’ मालिकातून तो वाचायला मिळत होता. 1945 ते 1991 या काळात अमेरिका आणि तिची दोस्त राष्ट्रे आणि सोव्हिएत रशिया आणि त्याची मांडलिक राष्ट्रे यांदरम्यान चालू असलेल्या शीतयुद्धाची बित्तंबातमी पोलिश नागरिकांपर्यंत पोहोचवीत राहणे हे महत्त्वाचे कार्य ‘प्रझेकरोज’ मासिकाने पार पाडले.
 
आता इतक्या मोठ्या कालावधीनंतर म्हणजे 2024 साली ‘प्रझेकरोज’ची इंग्रजी आवृत्ती काढावी, असे चालकांना का बरे वाटले असावे? नव्या पिढीचा पोलिश भाषेशी संपर्क कमी होत चालला असावा. मूळचे इंग्रज असणारे लोक अमेरिकेत स्थलांतरित झाले आणि जेमतेम 100 वर्षांतच त्यांनी खुद्द मायभूमी इंग्लंडविरुद्धच युद्ध पुकारले. नव्या पिढ्यांना युरोप खंड, तिथले गलिच्छ राजकारण हे सगळे नकोसे होऊन त्यांनी युरोपशी जवळपास संबंधच तोडला होता. पहिले आणि दुसरे महायुद्ध झाले नसते, तर कदाचित अमेरिका युरोपपासून, म्हणजे जगापासून कायमची लिप्त राहिली असती.

आता जागतिकीकरण आणि व्यापाराच्या बदलत्या संकल्पनांमुळे कोणीच कोणापासून कायम अलिप्त राहू शकत नाही. त्यामुळे पोलिश स्थलांतरितांची अमेरिकेत जन्मून पक्की अमेरिकन बनलेली नवी पिढी किंवा नव्या पिढ्या कायमच्या पोलंडपासून तुटू शकणार नाहीत. पण, भाषेमुळे त्यांच्या मनात मूळ मायभूमीबद्दल दुरावा निर्माण होेऊ नये, म्हणून कदाचित ‘प्रझेकरोज’ मासिकाने इंग्रजीत आवृत्ती काढण्याचा निर्णय घेतला असावा.


मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.