अभिनयाच्या पडद्यामागे दडलेली लेखिका

Total Views |
actress neha shitole


अभिनेत्री नेहा शितोळे हिने आजवर नाटक, मालिका, चित्रपट विश्वात विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. पण, अभिनेत्री म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणार्‍या नेहामध्ये लेखिकादेखील दडली आहे. त्याची प्रचीती नुकतीच प्रदर्शित झालेल्या ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटातून आली. याच निमित्ताने ‘दै. मुंबई तरुण भारत’ने नेहाशी साधलेला खास संवाद...

अभिनयाकडे कशी पाऊले वळली, असे विचारले असता नेहा म्हणाली की, “लहानपणापासूनच माझ्या घरात शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाला की तो जाऊन पाहायचाच, असं वातावरण होतं. त्याशिवाय, नाटक हे माझ्या घरातच होतं. माझे पणजोबा पाटस या छोट्या गावातून पुण्यात आले. त्यावेळी ते ‘प्रभात स्टुडिओ’ कंपनीत आत्ताच्या भाषेत सांगायचं तर ‘एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर’ म्हणून काम करत होते. त्यामुळे माझ्या रक्तातच अभिनय होता, असंच म्हणावं लागेल. पण, माझ्या आईला वाटत होतं की, मी यूपीएससीची परीक्षा द्यावी आणि ‘इंडियन फॉरेन सर्व्हिस’मध्ये मी जावं; बरं त्याची तयारी म्हणून लहानपणापासूनच तिने मला जपानी, जर्मन, संस्कृत या भाषा शिकण्याचं प्रशिक्षण दिलं होतं. मात्र, कालांतराने मला समजलं की, मी 10-12 तास अभ्यास करू शकणार नाही. कारण, माझं मन हे अभिनयात रमत होतं. मग, माझा अभिनय क्षेत्राचा प्रवास सुरू झाला. एकांकिकेपासून सुरू झालेला प्रवास पुढे मालिका, चित्रपट आणि आता लेखनापर्यंत येऊन ठेपला आहे.”
 
मालिकेत पहिली भूमिका ही सामान्यत: साहाय्यक किंवा नायिकेची मिळते. पण, नेहाच्या बाबतीत काहीसं वेगळं घडलं. ते सांगताना नेहा म्हणाली की, “अभिनेत्री म्हणून नाटक हे माझ्यासाठी फार मोठं आणि महत्त्वाचं माध्यम आहे. रंगभूमीवर ‘रिटेक’ नसतो, तुमच्या कामाची पोचपावती तिथल्या तिथे मिळते. त्यामुळे नाटक माझ्यासाठी अभिनय क्षेत्रातील फार मोठा टप्पा आहे. एकांकिकेनंतर मला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. खरंतर, माझ्यासमोर दोन मालिकांमधून एक निवडण्याची संधी समोर होती. त्यापैकी ‘चारचौघी’ मालिकेतील मुख्य भूमिका साकारणार्‍या अभिनेत्रीला मला रिप्लेस करायचं होतं आणि दुसरी मालिका होती ‘या गोजिरवाण्या घरात’ ज्यात मला नवीन पात्र साकारायचं होतं, जी खलनायिका होती आणि अभिनेत्री म्हणून नक्कीच स्वत:चं विश्व तयार करावं, हा विचार केला आणि मी ‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतील खलनायिका साकारली.” त्यामुळे नेहाच्या बाबतीत नक्कीच असं म्हणून शकतो की, मालिका विश्वात नायिका म्हणून नाही तर खलनायिका म्हणून तिने अभिनयाची सुरुवात केली.
 
सध्या नेहा शितोळेची एक ओळख लेखिका म्हणूनही आहे. त्याचाच एक खास किस्सा सांगताना नेहा म्हणाली की, “शाळेत असल्यापासूनच मी कविता लिहायचे, लिखाणाची मला बालपणापासूनच आवड होती. सुरुवातीला फक्त कवितालेखन हाच माझा हातखंडा होता. पण, त्यानंतर ‘कुंकू’ या मालिकेत मी काम करत होते. त्यावेळी सेटवर जरा गडबड झाली. कारण, लेखकाकडून सीन लिहून आलाच नव्हता. माझ्या डोक्यात काहीतरी आलं की, दोन-चार वाक्ये मी कागदावर लिहिली आणि दाखवलं की, हा सीन करुयात का? तर त्यावेळी प्रवीण तरडे ‘कुंकू’ मालिकेचे संवाद लिहित होते. मी लिहिलेला तो सीन आम्ही शूट केला आणि मला प्रवीण तरडेंचा फोन आला. ते मग विनोदाने मला म्हणाले की, “काय मग आता आमच्या पोटावर पाय का?” पण, ‘कुंकू’ मालिकेच्या सेटवरून माझ्यातील लेखिका खर्‍या अर्थाने समोर आली.”

‘कल्की’ चित्रपटाबद्दल बोलताना नेहा म्हणाली की, “ ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाचा छोटासा भाग होण्याचं भाग्य मला लाभलं, याचं समाधान नक्कीच आहे. पण, या चित्रपटाची लेखिका म्हणून भाग होण्यापूर्वी ’वैजयंती फिल्मस’ या दाक्षिणात्य कंपनीचा ’सीता रामम’ हा चित्रपट आला होता आणि त्यातील एक गाणं लिहिण्याची संधीही मला मिळाली होती. ते गाणं तर पूर्ण झालं, पण ‘सीता रामम’ या चित्रपटाचं हिंदी डबिंग लिहिण्याचं कामंही त्यानिमित्ताने माझ्याकडे आलं. त्यानंतर सुदैवाने ‘वैजयंती फिल्मस’सोबत मी बरीच कामं केली आणि त्याच कामाची पावती म्हणून मला ‘कल्की’ चित्रपटात अभिनेते कमल हसन यांनी तामिळ भाषेत एक श्लोक म्हटला आहे, तर त्या भोवती फिरणारा सीन लिहिण्याची संधी मिळाली.”

लवकरच ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदा महेश मांजरेकर यांच्याऐवजी अभिनेता रितेश देशमुख ‘बिग बॉस’चे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. त्याबद्दल नेहाला विचारले असता, ती म्हणाली की, “रितेश देशमुख ‘मराठी बिग बॉस’च्या पाचव्या सीझनचं सूत्रसंचालन करणार आहे. अर्थात, त्यामुळे महेश मांजरेकर यांची खूप आठवण येईल आणि त्यांना मिस करणार आहोत. कारण, महेश मांजरेकर यांच्या रूपाने ‘बिग बॉस’च्या घरातील प्रत्येक सदस्याला घरातील एक मोठी व्यक्ती, तिचा धाक, दरारा आणि तरीही ती माया हे अनुभवता आलं. मुळात कला हे समाजाचं प्रतिबिंब असतं आणि समाजात जे घडतं, ते कलेच्या माध्यमातून मांडलं जातं. त्यामुळे सध्या समाजात ‘युथफुल एनर्जी’ दिसून येते. त्यामुळे त्यांना एखादी बाब त्यांच्याच शैलीत समजावून सांगणारी एक व्यक्ती म्हणून तरुणांचं प्रतिनिधित्व रितेश देशमुख या सीझनमध्ये करेल.” सध्या नेहा तिच्या आगामी चित्रपटाच्या लिखाणात व्यस्त असून लवकरच तिचा नवा चित्रपट भेटीला येणार आहे.

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.