लाडका भाऊ योजना म्हणजे काय? कुणाला मिळणार लाभ?

    19-Jul-2024   
Total Views |
 
Ladka Bhau
 
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेनंतर आता राज्य सरकारने लाडका भाऊ योजनेची घोषणा केलीये. खरंतर लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी लाडक्या भावासाठी काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या भावांसाठी एक योजना सुरु केलीये. बुधवारी पंढरपूरमध्ये 'कृषी पंढरी २०२४ प्रदर्शनाचा' उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी या योजनेची घोषणा केलीये. या योजनेमार्फत बारावी, डिग्री आणि डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणारे. तर ही योजना नेमकी काय? या योजनेचे निकष कोणते? आणि या योजनेसाठी कोण पात्र असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.
 
यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात महायूती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. पण लाडकी बहिण झाली आता लाडक्या भावांचं काय? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंनी लाडक्या भावांसाठीही मोठी घोषणा केलीये. या योजनेची माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आम्ही महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरु केली असून दहमहा त्यांच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार आहेत. लवकरच बहिणींच्या खात्यात हे पैसे वळते होतील. पण काही लोक म्हणाले की, लाडकी बहिण झाली आता लाडक्या भावांचं काय? तर आता लाडक्या भावांसाठीही आम्ही एक योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत १२ उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्याला दरमहा ६ हजार, डिप्लोमा पूर्ण केलेल्यांना ८ हजार आणि डिग्री पूर्ण केलेल्यांना ९ हजार रुपये प्रतिमहिना देण्यात येणार आहे," असं त्यांनी सांगितलं.
 
राज्यातील युवक आपलं शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या प्रमाणात नोकरीच्या शोधात बाहेर पडतात. पण यातील बहुतांश विद्यार्थ्यांकडे नोकरीचा किंवा व्यवसायाचा अनुभव नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढताना दिसतीये. यामध्ये विशेषत: बारावी पास, आयटीआय, पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अशा युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' राबवण्यात येतीये. याच योजनेचं रुपांतर आता लाडका भाऊ योजनेत करण्यात आलंय.
 
आता 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' किंवा लाडका भाऊ योजनेमार्फत कोणते लाभ मिळणार? तर या योजनेद्वारे तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळांच्या माध्यमातून रोजगार इच्छूक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करुन देणारे उद्योजक यांना जोडलं जाईल. याचाच अर्थ रोजगार इच्छूक उमेदवारांना प्रशिक्षणातून प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल आणि उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक मनुष्यबळ प्राप्त होईल.
 
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय काय करावं लागेल? तर सर्वात आधी या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या योजनेसाठीच्या संकेतस्थळावर नोंदणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर विना अनुभवी रोजगार इच्छूक पात्र उमेदवारांना आस्थापना, उद्योग किंवा महामंडळात प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने इतका असेल. या सहा महिन्यात उमेदवारांना शासनामार्फत वेतनही दिलं जाईल. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना प्रमाणपत्र दिलं जाईल. याशिवाय प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराची इच्छा असल्यास संबंधित उद्योग त्याला रोजगार देण्याचा निर्णयही घेऊ शकतो.
 
आता या योजनेसाठी कोणते उमेदवार पात्र असतील? तर उमेदवाराचं वय किमान १८ ते ३५ वर्षे असावं. बारावी, आयटीआय, पदवी, पदविका आणि पदव्युत्तर विद्यार्थी यासाठी ऑनलाईन नोंदणी करु शकतात. परंतू, ज्यांचं शिक्षण सुरु आहे असे विद्यार्थी या योजनेत सहभागी होऊ शकत नाही. त्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. त्याची आधार नोंदणी असावी. उमेदवाराचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असावे. तसेच पात्र उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
 
या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार शासनामार्फत विद्यावेतन दिलं जाईल. यामध्ये १२ वी पास उमेदवाराला दरमहा ६ हजार रुपये, आयटीआय किंवा डिप्लोमा पूर्ण केलेल्यांना ८ हजार आणि डिग्री पूर्ण केलेल्यांना १० हजार रुपये प्रतिमहिना देण्यात येईल. युवकांमधील बेरोजगारीचे प्रमाण कमी होऊन त्यांना नोकरी मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात आणि त्यांना नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्या, यासाठी पहिल्यांदाच अशा प्रकारची योजना सुरु करण्यात येतीये.
 
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....