छगन भुजबळ शरद पवारांच्या गटात जाणार. छगन भुजबळांची महायूतीत कोंडी होतेय, अशा अनेक बातम्या आज सकाळी सकाळी माध्यमांमध्ये यायला लागल्या. याचं कारण होतं छगन भुजबळांनी अचानक घेतलेली शरद पवारांची भेट. शरद पवारांची अपॉईनमेंट न घेता गेलेल्या भुजबळांना तब्बल दीड तासांनी त्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुन्हा दीड तास चाललेल्या या भेटीत नेमकं काय शिजतंय, अशी चर्चा सुरु झाली. कुणालाच कानोकान खबर नसलेली ही भेट नेमकी कशासाठी आहे? आणि अशा अचानक घेतलेल्या भेटीमागे नेमकं कारण काय? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. शेवटी छगन भुजबळांनीच या भेटीमागचं गुढ उकललं आणि माध्यमांनी केलेले सर्व दावे खोडून काढले. तर छगन भुजबळांनी अचानक घेतलेल्या शरद पवारांच्या भेटीमागे नेमकं कारण काय? आणि त्यांच्यात काय चर्चा झाली? याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
मंत्री छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या. भुजबळ सिल्वर ओकवर शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. अर्थातच त्यांनी पवारांची अपॉईनमेंट न घेतल्याने तब्बल दीड तास वाट बघितल्यानंतर त्यांची भेट घडून आली. पण त्याआधीच इकडे भुजबळांच्या शरद पवार गटात जाण्याचा चर्चा सुरु झाल्या होत्या. मग निश्चितच माध्यमांच्या प्रतिनिधींनी सुप्रिया सुळेंना याबद्दल प्रश्न विचारला. तर त्यांनी आपल्याला याबद्दल काहीच माहिती नसल्याचं म्हटलं. "राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण येणार हा संघटनेचा निर्णय असेल. तो कुणा एका व्यक्तीचा निर्णय नसेल," असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
त्यानंतर यावर चंद्रशेखर बावनकुळेंनीही आपली प्रतिक्रिया दिली. "भुजबळ हे महायूतीचे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. त्यामुळे महायूतीला धोका निर्माण होईल, असा कुठलाही निर्णय ते घेणार नाहीत. महायूती कशी एकत्र राहील यासाठी ते नेहमीच प्रयत्न करतात," असं ते म्हणाले. यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीसुद्धा भुजबळ नाराज असल्याचा दावा खोडून काढला. त्यामुळे भुजबळ पवारांना नेमके कशासाठी भेटले, हे कुणीही सांगू शकत नव्हतं.
आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी महायुती सरकारने ९ जुलै रोजी सह्याद्री अतिथिगृहावर सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीला येण्यासंदर्भात शेवट्या क्षणापर्यंत अनुकूल असलेल्या महाविकास आघाडीने सायंकाळी सहा वाजता एक पत्र लिहून बैठकीला येणार नसल्याचं कळवलं. भुजबळ-पवारांच्या भेटीच्या एक दिवस आधी भुजबळांनी बारामतीतील मेळाव्यात शरद पवारांचं नाव न घेता टीका केली होती. "राज्य सरकारने आयोजित केलेल्या बैठकीला विरोधी पक्षातील सर्व नेते येणार होते. परंतू, ५ वाजता बारामतीहून एक फोन गेला आणि सर्व विरोधी पक्षातील नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला," असा गौप्यस्फोट भुजबळांनी केला. त्यामुळे भुजबळांचा रोख शरद पवारांकडेच असल्याचं सर्वत्र बोललं गेलं. या गौप्यस्फोटानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी त्यांनी घेतलेल्या पवारांच्या भेटीमुळे आणखी तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली.
शेवटी दीड तास चाललेल्या पवारांसोबतच्या बैठकीनंतर भुजबळांनी स्वत: पत्रकार परिषद घेत या सर्व चर्चांवर पडदा टाकला. राज्यातील समाजासमाजात तेढ निर्माण झाल्याने स्फोटक वातावरण तयार झालंय. त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नात शरद पवारांनी स्वत: लक्ष घालावं, अशी विनंती केल्याचं भुजबळांनी सांगितलं. या भेटीविषयी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, "मी कुठलाही मंत्री, आमदार किंवा कुठलीही पक्षीय भुमिका घेऊन आलेलो नाही, असं मी पवार साहेबांना सांगितलं. तुम्ही महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम राबवलं आणि आता राज्यात काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक परिस्थिती निर्माण झालीये. त्यामुळे राज्यात शांतता निर्माण व्हायला हवी ही एक जेष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देत असताना असाच मराठवाडा पेटला होता. त्यावेळी तुम्ही तो शांत केला, याची त्यांना आठवण करुन दिली. पण आज अशी परिस्थिती असताना तुम्ही आला नाहीत." असा सवाल भुजबळांनी पवारांना केला.
यावर शरद पवारांचं म्हणणं होतं की, "जरांगेंना भेटल्यावर मुख्यमंत्र्यांनी काय चर्चा केली, कोणती आश्वासनं दिली, हे आम्हाला माहिती नाही. तुम्ही ओबीसी नेत्यांचं उपोषण सोडायला गेल्यावर तुम्ही त्यांना काय सांगितलं हेसुद्घा आम्हाला माहिती नाही. पण येत्या एक दोन दिवसांत मी मुख्यमंत्री शिंदेंशी बोलतो आणि २-४ लोकं एकत्र बसून हा प्रश्न कसा सोडवता येईल, यावर चर्चा करायला मी तयार आहे," असं आश्वासन पवारांनी दिल्याचं भुजबळांनी सांगितलं.
या सर्व घडामोडीनंतर आता हा प्रश्न उपस्थित होतो की, सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकण्यामागे खरंच शरद पवारांचाच हात होता का? आणि मराठा आरक्षणापासून कायम नामनिराळे राहणारे शरद पवार आता भुजबळांच्या विनंतीला मान देऊन तरी यावर काही अधिकृत भूमिका घेणार का? भुजबळांच्या भेटीचं सार्थक होणार का? की, यावेळीही शरद पवार आरक्षणाच्या प्रश्नापासून नामानिराळे राहतील?
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....