उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीत अटीतटीची लढाई

    18-Jul-2024   
Total Views |
uttar pradesh by election
 
उत्तर प्रदेशातील अनपेक्षित निकाल हा केवळ उत्तर प्रदेशच नव्हे, तर देशभरातील भाजप कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक होता. त्यामुळे १० जागांवर होणार्‍या पोटनिवडणुकीमध्ये विजय मिळविण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सज्ज झाले आहेत. त्यासाठी पक्ष आणि संघटनेत करावयाचे आवश्यक बदलही करण्यास त्यांनी प्रारंभ केला आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला यंदा उत्तर प्रदेशातून अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर, आता भाजपच्या पराभवाचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता राज्यातील दहा विधानसभा जागांवर होणार्‍या पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ही पोटनिवडणूक भाजपसाठी महत्त्वाची ठरणार आहे. कारण, या निवडणुकीतील विजय भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यास अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. उत्तर प्रदेशातील अनपेक्षित निकाल हा केवळ उत्तर प्रदेशच नव्हे, तर देशभरातील भाजप कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक होता. त्यामुळे दहा जागांवर होणार्‍या पोटनिवडणुकीमध्ये विजय मिळविण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सज्ज झाले आहेत. त्यासाठी पक्ष आणि संघटनेत करावयाचे आवश्यक बदलही करण्यास त्यांनी प्रारंभ केला आहे.

अर्थात, योगी आदित्यनाथ यांना विरोधी पक्षांकडून नेहमीच लक्ष्य केले जाते. एवढेच नव्हे तर समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि खासदार अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणुकीत ‘पीडीए’ आणि ‘इंडिया’ आघाडीच्या विजयानंतर समाजवादी पक्ष २०२७च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा सफाया करेल, असा दावा केला आहे. अयोध्येने भारतीय राजकारणाला नवी दिशा दिल्याचे अखिलेश यादव म्हणाले. अर्थात, हा विजय अयोध्येतील नसून फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील आहे. मात्र, ‘नॅरेटिव्ह’च्या लढाईमध्ये सपा आणि ‘इंडी’ आघाडीने त्याचा व्यवस्थित वापर करण्यास प्रारंभ केला आहे. कारण, अयोध्येतूनच भारतीय राजकारणामध्ये हिंदुत्व हा मुद्दा केंद्रस्थानी आला होता. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा अयोध्येत पराभव झाला, असा सोयीस्कर दावा करण्यास त्यांनी प्रारंभ केलेला दिसतो. त्यामुळेही उत्तर प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये विजय मिळवणे भाजपसाठी आवश्यक झाले आहे.

अर्थात, पोटनिवडणुकीत मुख्य लढत भाजप आणि समाजवादी पक्षातच होईल. पण, राहुल गांधी काँग्रेसकडून लढत आहेत आणि मायावतीही बसपाकडून लढत आहेत. जरी दहा जागांवर पोटनिवडणूक होत असली, तरी सर्वात मनोरंजक लढत मिल्कीपूर विधानसभेच्या जागेवर होणार आहे. कारण, अयोध्येचा संदर्भ त्यास आहे. समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद लोकसभेत पोहोचल्यामुळे फैजाबाद लोकसभेतील मिल्कीपूर विधानसभेची जागा रिकामी झाली आहे. अखिलेश यादव ज्या प्रकारे अवधेश प्रसाद यांना अयोध्येचे खासदार म्हणून ‘प्रोजेक्ट’ करून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यास शह देण्यासाठी मिल्कीपूरमध्ये भाजपनेही जिंकण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोटनिवडणुकीसाठी मंत्र्यांची एक ‘टास्क फोर्स’ तयार केली आहे. या ‘टास्क फोर्स’मध्ये उत्तर प्रदेशच्या ३० मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.

मिल्कीपूर पोटनिवडणूक दिल्लीत अखिलेश यादव यांच्याइतकीच लक्ष वेधून घेणारे अवधेश प्रसाद यांच्यासाठी परीक्षेसारखी आहे. अवधेश प्रसाद मिल्कीपूरमधील फैजाबादच्या जागेसारखा करिष्मा दाखवू शकतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असेल. ज्या दहा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे, तेथे सध्या चुरशीची लढत होत असल्याचे दिसते. समाजवादी पक्षाचे आमदार खासदार झाल्यामुळे दहापैकी चार जागा रिक्त झाल्या आहेत, तर पाच जागा एनडीएकडे आहेत. सपा आमदार इरफान सोलंकी यांना दोषी ठरवल्यामुळे कानपूरची सिसामाऊ विधानसभा जागा रिक्त झाली आहे. २०२२ मध्ये पाच जागांवर सपाचा वरचष्मा असल्याचे दिसते. अखिलेश यादव कन्नौजमधून खासदार झाल्यामुळे मैनपुरीची करहल ही जागा रिक्त झाली आहे. झियाउर रहमान बुर्के हे मुरादाबादच्या कुंडरकी मतदारसंघाचे आमदार होते, जे आता खासदार झाले आहेत, ती जागा सपासाठीही महत्त्वाची आहे. फुलपूर, माझवान आणि गाझियाबाद याच जागा भाजपकडे राहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी मुझफ्फरनगर लोकसभेतील मीरापूरचीही जागा सोपी नाही. २०२२ मध्ये सपा आणि रालोदमध्ये युती झाली होती. आता मात्र लोकसभा निवडणुकीत जयंत चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर समीकरणे बदलली आहेत आणि परिस्थितीही बदलली असेल. मुझफ्फरनगर लोकसभा जागा गमावलेल्या भाजपला रालोद कितपत उपयुक्त ठरेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कारण, मीरापूरमध्ये समाजवादी पक्षाचा मोठा प्रभाव मानला जातो. त्यामुळे येथेही तुल्यबळ लढत होऊ शकते.

लोकसभा निवडणुकीपूर्वी अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्यात समन्वय स्थापित होण्यास बराच काळ गेला. समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील जागावाटप निश्चित होईपर्यंत अखिलेश यादव यांनी राहुल गांधींच्या न्याययात्रेत सामील होण्यासही नकार दिला होता. परंतु, निवडणुकीनंतर बरेच काही बदलले आहे. अखिलेश यादव हे उत्तर प्रदेशात केंद्रस्थानी आले आहेत, तर राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते बनले आहेत. त्यामुळे काँग्रेसचाही उत्साह द्विगुणित झाला आहे. अशा स्थितीत पोटनिवडणुकीसाठी जागांबाबतही सौदेबाजी सुरू झाली आहे. काँग्रेसने स्वत:साठी चार जागांची मागणी केल्याचे ऐकिवात आहे, मात्र समाजवादी पक्ष सध्या त्यासाठी तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे. माढवण, फुलपूर, मीरापूर आणि कुंडरकी विधानसभा मतदारसंघ अशा चार जागा काँग्रेसने सपाकडे मागितल्याचे समजते. पण, समस्या अशी आहे की झियाउर रहमान बुर्के हे मुरादाबादच्या कुंडरकी जागेवरून आमदार होते आणि तिथल्या मुस्लीम लोकसंख्येमुळे समाजवादी पक्षाचा खूप प्रभाव आहे - काँग्रेसने कितीही दावा केला तरी उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचा वरचष्मा राहणार असल्याचे दिसते.

उत्तर प्रदेशात बसपाकडे फक्त एकच आमदार आहे, तर २०१४ प्रमाणे लोकसभा निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. मायावतींना लोकसभेपेक्षा पोटनिवडणुकीत जास्त रस असल्याचे दिसते. कदाचित, भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद नगिना लोकसभा मतदारसंघातून संसदेत पोहोचल्याचा हा परिणाम असावा. चंद्रशेखर आझाद यांनीही सर्व जागांवर पोटनिवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. पोटनिवडणुकीत बसपाची विशेष उत्सुकता हेच मुख्य कारण आहे असे दिसते आणि त्यासाठी मायावतींनी त्यांचा पुतण्या आकाश आनंदला पुन्हा आघाडीवर आणले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मायावतींनी आकाश आनंद यांना अपरिपक्व असल्याचे सांगून बसपाच्या राष्ट्रीय संयोजकपदावरून हटवले होते. मात्र, निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर त्यांनी त्यांना पुन्हा उत्तराधिकारी म्हणून घोषित करून राष्ट्रीय समन्वयक बनवले. त्यामुळेच विधानसभा पोटनिवडणूक म्हणजे आकाश आनंदसाठी कसोटीच आहे. या पार्श्वभूमीवर मायावतींकडून आकाश आनंद यांना किती ‘फ्री-हॅण्ड’ मिळतो, यावरही त्यांची कामगिरी अवलंबून आहे.

उत्तर प्रदेश भाजपमध्ये बरेच काही मतभेद असल्याचे वृत्त काही विशिष्ट प्रसारमाध्यमांनी गेल्या तीन ते चार दिवसांपासून चालविले होते. ते पाहून राजकीय वर्तुळातील एका वर्गाने जोरदार पतंगबाजीदेखील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात केली. मात्र, ते कथित वादळही पक्ष नेतृत्वाने कौशल्याने शांत करून प्रत्येकास आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सज्ज होण्याचे निर्देशही दिल्याचे समजते.