समाजहित चिंतणारा ‘श्रीकृष्ण’

    17-Jul-2024   
Total Views |
shreekrishna kulkarni



वयाच्या 82व्या वर्षीही समाजभान कायम ठेवून, केवळ समाजासाठी समर्पित वृत्तीने कार्यरत असलेल्या श्रीकृष्ण नारायण कुलकर्णी यांच्याविषयी...

स्वत:साठी जगणार्‍यांची, आपापल्या कुटुंबाचे हित पाहणार्‍यांची संख्याच या जगात अधिक. पण, समाजात अशीही काही ‘माणसं’ असतात, जी सर्वार्थाने ‘स्व’ सोडून समाजासाठीच एका समर्पण वृत्तीने कार्यरत असतात. हीच खरी परोपकाराची उदात्त भावना. याच समाजशीलतेच्या भावनेतून कार्यप्रवण एक व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीकृष्ण नारायण कुलकर्णी. जालन्यातील आपल्या राहत्या घराच्या जागेवर थेट स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन ‘सावरकर भवना’सारखी देखणी वास्तू निर्माण व्हावी, या हेतूने श्रीकृष्ण विशेष खटाटोप करत आहेत.

श्रीकृष्ण कुलकर्णी यांचा जन्म दि. 25 जानेवारी 1943 रोजी माटरगाव (शेगांव, जि. बुलढाणा) येथे झाला. त्यांना कुटुंबीय ‘नाना’ म्हणूनच संबोधतात. श्रीकृष्ण यांचे वडील तलाठी होते. 1948 म्हणजेच श्रीकृष्ण अवघे पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडील गेले, तेव्हा कोणीही नातलग पाहायलाही आले नाहीत. दोन वर्षे उधारी घेऊन कसेबसे जगावे लागले; अशी घरची बेताची परिस्थिती. पुढे त्यांनी शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, यवतमाळ येथे पूर्ण करून मॅट्रिक पूर्ण केले. आपल्या मोठ्या बहिणीच्या छत्रछायेखाली राहून त्यांनी चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर उर्वरित शिक्षण मामाच्या घरी राहून घेतले. परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत पुढे ते तलाठी झाले. आयटीआयचा दोन वर्षांचा कोर्स केला. तेव्हा त्यांना दोन ठिकाणी नोकरीची संधी मिळाली होती. त्यांना ‘पीडब्लूडी’मध्ये आपले करिअर करायचे होते. म्हणून त्यांनी हे क्षेत्र निवडले.

श्रीकृष्ण यांच्या आयुष्यातील एक प्रसंग म्हणजे त्यांच्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा गावातील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. स्मशानभूमीची अवस्था बर्‍यापैकी बिकट. त्याक्षणी अशी बातमी आली की, एका कुत्र्याने स्मशानातून वडिलांच्या जळत्या चितेचा पाय पळवला. त्याक्षणी श्रीकृष्ण यांनी ठरवले की, असा प्रसंग अन्य कोणासोबतही होऊ नये, यासाठी काहीतरी करायला हवे. 1999 साली आईचे निधन झाले, तेव्हा त्यांना ही गोष्ट आठवली आणि त्यांनी जालना येथील रामतीर्थ स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्याचे ठरवले. आज त्यांच्या प्रयत्नांमुळे रामतीर्थ स्मशानभूमीला आशिया खंडातील दुसर्‍या क्रमांकाची स्मशानभूमी म्हणून ओळख मिळाली आहे. संत गाडगे बाबांनी समाजाला स्वच्छतेचा संदेश दिला, हे सर्वांना ठाऊक आहे. त्याच गाडगेबाबांच्या विचारांवर चालत श्रीकृष्ण यांनी दि. 1 जुलै 2000 रोजी रामतीर्थ स्मशानभूमीची झाडलोट करायला सुरुवात केली. आजही ते दरवर्षी दि. 1 जुलैला न चुकता रामतीर्थ स्मशानभूमीची झाडलोट करण्याकरिता हजर असतात.

श्रीकृष्ण यांनी ‘पीएचडी’पर्यंतचे आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना गायक मोहम्मद रफी यांच्या सदाबहार गाण्यांवर ‘पीएचडी’ करायचीही इच्छा होती. मात्र, काही अडचणींमुळे, नियमांमुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी थेट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्यावर ‘पीएचडी’ करायचे ठरवले. त्यांचे 500हून अधिक अग्रलेख याकरिता त्यांनी अभ्यासले. तसेच त्यांनी मराठी विषय घेऊन पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

श्रीकृष्ण हे सावरकरप्रेमी. स्वातंत्रवीर सावरकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजाच्या कल्याणासाठी एखादी वास्तू निर्माण व्हावी, या हेतूने राहत्या घराच्या जागेवर वास्तू उभारण्याचे काम सुरू झाले आहे. दि.12 फेब्रुवारी रोजी वास्तूचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. त्यांच्या 2 हजार, 800 चौ.फूट जागेवर पाच खोल्यांचे घर पाडून त्याठिकाणी पाचमजली स्वातंत्र्यवीर सावरकर भवन उभे राहत आहे. ही वास्तू केवळ एक इमारत म्हणून उभी राहणार नसून, तेथे समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी निवास, अभ्यासिका, वाचनालय यांसह काळानुरूप आवश्यक सोयीसुविधाही देण्याचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर भवन ट्रस्ट’चा मानस आहे. जालन्यातील या सावरकर भवनाच्या पहिल्या मजल्यावर वाहनतळ, दुसर्‍या मजल्यावर 1 हजार, 200 चौ.फूटाचा हॉल, तिसर्‍या व चौथ्या मजल्यावर महिला वसतिगृह, पाचव्या मजल्यावर वाचनालय व अभ्यासिका असेल. सावरकरांसारख्या द्रष्ट्या नेत्याप्रमाणे आपणही समाजाचे देणे लागतो, आपणही समाजासाठी काहीतरी करायला हवे, अशी भावना श्रीकृष्ण यांच्या मनात जागृत झाली आणि त्या विचारांतून आज सावरकर भवन निर्माण होत असल्याचे ते सांगतात. श्रीकृष्ण हे इंजिनिअर असल्याने ते स्वत:सुद्धा या कामात कटाक्षाने लक्ष घालत आहेत.

श्रीकृष्ण हे बालपणापासून रा. स्व. संघाचे स्वयंसेवक. त्यामुळे समाजाकरिता आपण काहीतरी करायला हवे, या देशाचे आपण देणे लागतो, ही भावना त्यांच्यात पूर्वीपासूनच भिनलेली. निरनिराळ्या ठिकाणी समाजसेवा करणे आजही त्यांना आवडते. मधल्या काळात वृक्षारोपणाचा उपक्रम राज्यभरात राबविला गेला. तेव्हा त्यांनी बुलढाण्यात एकूण 700 झाडे, तर रामतीर्थ स्मशानभूमी परिसरात 500 झाडांची लागवड केली. आजही ही वृक्षं बहरलेली आहेत. श्रीकृष्ण यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे अनेक ठिकाणी त्यांना पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. अशा या वयाच्या 82व्या वर्षी समाजभान ठेवून, केवळ समाजासाठी जीवन समर्पित करणार्‍या श्रीकृष्ण नारायण कुलकर्णी यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेक शुभेच्छा.



ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक