पूजा खेडकर यांचा गंभीर आरोप! थेट जिल्हाधिकाऱ्यांविरोधात केली तक्रार
17-Jul-2024
Total Views |
पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत रोज नवनवीन खुलासे होत असताना आता त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशिक्षण काळात त्यांनी छळ केल्याचा आरोप खेडकर यांनी केला आहे.
पूजा खेडकर यांनी खोटं प्रमाणपत्र सादर करुन UPSC परिक्षा दिली आणि ती उत्तीर्ण करुन पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून रुजू झाल्या. मात्र, तिथे त्यांनी अवाजवी मागण्या केल्या. याशिवाय स्वत:च्या खाजगी गाडीला लाल दिवा लावून त्यावर महाराष्ट्र शासन असे लिहिण्यात आले होते. पूजा खेडकर यांच्या या अवाजवी मागण्या आणि त्यांच्या वागणूकीला कंटाळून अखेर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांना पत्र दिले. त्यात पूजा यांच्या या सर्व मागण्यांचा स्पष्टपणे उल्लेखही करण्यात आला. त्यानंतर महिनाभरात वाशिममध्ये त्यांची बदली करण्यात आली.
या सर्व घटनेनंतर हे प्रकरण सर्वत्र चर्चेत आलं आणि पूजा खेडकर यांच्या नियूक्तीबाबत रोज नवनवे खुलासे होत आहेत. आता मात्र, पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसेंविरोधात तक्रार केली आहे. प्रशिक्षण काळात त्यांनी छळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.