विश्वासघात

    16-Jul-2024   
Total Views |
uddhav thackeray shankaracharya swami


ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ’मातोश्री’वर नुकतीच भेट घेतली. किमान त्यानिमित्ताने का होईना, हिंदुहृदयसम्राटांच्या अस्तित्त्वाने पावन झालेल्या ‘मातोश्री’ला कोणा संतमहंताचा पदस्पर्श झालाच तर! शंकराचार्यांनी ‘मातोश्री’ला भेट देण्यात गैर काहीच नाही. पण, यावेळी बोलताना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, “उद्धव ठाकरेंबरोबर विश्वासघात झाला. त्यांच्या विश्वासघाताने आम्ही दुःखी आहोत. जोपर्यंत ते पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत आमचे दुःख दूर होणार नाही.” त्यामुळे शंकराचार्यांनी केलेले हे राजकीय विधान चर्चेचा विषय ठरले नसते, तरच नवल! शंकराचार्य पुढे असेही म्हणाले की, “ज्याला जनता बहुमत देते, तो त्याच्या वेळेपर्यंत कायम ठेवला पाहिजे. सरकार मध्येच मोडून जनमताचा अनादर करणे, ही चांगली गोष्ट नाही. राजकारणाशी आमचा काही संबंध नाही, पण विश्वासघाताला पाप म्हटले आहे. यावर कोण बोलणार? राजकारणी बोलणार का? यावर धर्मगुरूच बोलतील.” एवढेच नाही, तर “कोणाचे हिंदुत्व खरे आहे, हे जाणून घेतले पाहिजे. जो विश्वासघात करतो, तो हिंदू असू शकत नाही. जो विश्वासघात सहन करतो, तो हिंदू असला पाहिजे. कारण, त्याचा विश्वासघात झाला आहे. ज्यांनी विश्वासघात केला, ते हिंदू कसे असू शकतात? महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे की, उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला आहे.” शंकराचार्यांबद्दल धर्मप्रमुख म्हणून मान, आदरभाव आहेच. पण, उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वविरोधी काँग्रेस आणि पवारांची कास धरून महाराष्ट्राच्या जनमताचा 2019 साली विश्वासघात केला, याची कदाचित शंकराचार्यांना पूर्ण कल्पना तरी नसावी किंवा ऐकीव सहानुभूतीवर त्यांचे विधान आधारित असावे किंवा आणखीन काही. अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला, हे जर शंकराचार्यांना मान्य असेल, तर पाच वर्षांपूर्वी भाजपशी ठाकरेंनी काडीमोड घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केले, तेव्हा जनमताचा अनादर झाला नाही का? ते पाप नव्हे काय? शंकराचार्य म्हणतात तसे, विश्वासघात करणारे (उद्धव ठाकरे) हिंदू नव्हेत का? आणि मुख्यमंत्रिपदी ठाकरे पुन्हा विराजमान झाले, तर न झालेल्या विश्वासघाताचे परिमार्जन होईल की पुन्हा हिंदुत्वावर आघात?


हिंदुत्वावर आघात


असे हे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचे ‘राजकीय मत’ सर्वस्वी भुवया उंचावणारेच. यापूर्वीही राम मंदिराच्या बांधकामावर आणि उद्घाटनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने शंकराचार्य चर्चेत आले होते. पण, तेव्हाचा विषय हिंदू धर्माशी, परंपरांशी निगडित असल्याने शंकराचार्यांनी त्यांचे मतप्रदर्शन करणेही एकवेळ मान्य. पण, उद्धव ठाकरेंच्या विश्वासघाताला हिंदू धर्म आणि नंतर पापाशी जोडून शंकराचार्यांनी असे नेमके काय साधले, हे तेच जाणो. आता विषय हिंदुत्वाचाच असेल, तर ठाकरेंनी 2019 साली भाजपसोबत निवडणुका लढवून बहुमताचा आकडा गाठला. पण, ठाकरेंना त्यावेळी हिंदुत्वापेक्षा मुख्यमंत्रिपदाची खुर्चीच अधिक खुणावत होती. म्हणूनच हिंदुत्ववादी मित्रपक्ष असलेल्या भाजपला झिडकारून ठाकरेंनी हिंदूंना ‘दहशतवादी’ म्हणणार्‍यांसोबत सत्ता स्थापन केली. एवढेच नव्हे, तर कोरोना काळात हिंदू मंदिरांचे दरवाजे बंद करण्यापासून, अझान स्पर्धा आयोजित करण्यापर्यंत ते अगदी याकुब मेमनची कबर सजवण्यापर्यंत ठाकरेंच्या मविआ सरकारने अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाची एकही संधी सोडली नाही. धक्कादायक म्हणजे, पालघरचे निष्पाप साधू मारले गेले, तेव्हाही मुख्यमंत्रिपदी असलेल्या ठाकरेंनी त्याकडे सोयीस्कर कानाडोळा केला. मग शंकराचार्यांच्याच तर्कानुसार हिंदूंकडे दुर्लक्ष करणारे, मंदिरांना टाळे लावणारे, साधूंच्या हत्येवर मूग गिळून बसलेले ठाकरे विश्वासघातकी नव्हेत का? सत्ता असूनही ठाकरेंनी हिंदूंना न्याय दिला नाहीच, उलट शरद पवारांच्या नादी लागून उरलेसुरले हिंदुत्वही ते गमावून बसले. अशा या ‘आमचे हिंदुत्व हे शेंडी-जानव्याचे नाही’ म्हणून वारंवार अभिमानाने मिरवणार्‍या ठाकरेंप्रति खुद्द शंकराचार्यांनी कळवळा व्यक्त करावा, म्हणजे झोडणार्‍यालाच झोळीत घेण्याचा प्रकार! शंकराचार्यांसारख्या हिंदू धर्मात अत्यंत मानाचे स्थान असलेल्या धर्माचार्‍यांनी अशाप्रकारे हिंदूविरोधी राजकीय शक्तींचे समर्थन करणे, हे अशा शक्तींना अधिक बळ देण्यासारखेच! त्यामुळे ‘आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही’ हा खोटा दावा करणारे ठाकरे आता ‘शंकराचार्यांनाही आमचेच हिंदुत्व मान्य’ म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेण्याची एकही संधी सोडणार नाहीत. तेव्हा, हिंदुत्वावरच आघात करणार्‍यांप्रति हिंदूंकडूनच असे सहानुभूतीदर्शन होणार असेल, तर अशा शक्ती आणखीन सोकावतील, यात तीळमात्र शंका नाही!


विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची