ट्रम्प यांच्यावरील हल्ला : अमेरिकेवर हिंसाचाराचे सावट

    16-Jul-2024   
Total Views |
former president donald trump american rally


अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि आताही या निवडणुकीच्या शर्यतीत असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळाबाराच्या घटनेने अमेरिकन निवडणुकांवरील हिंसाचाराचे सावट अधिक गडद केले आहे. त्याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...

अमेरिकेतील राजकारणात जे दृश्य दिसते, त्याला जनमत फसते. दि. 13 जुलै रोजी पेन्सिल्विनियातील बटलर येथे अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. एक गोळी कानाला चाटून गेल्यानंतर ज्या त्वरेने ट्रम्प खाली वाकले आणि तेथील सुरक्षारक्षकांनी हल्लेखोराला मारल्यानंतर ज्या निग्रहाने त्यांनी रक्तबंबाळ चेहर्‍यासह हाताची मूठ आवळून उपस्थित जनसमूहाला आपला लढा चालू ठेवण्याचा आदेश दिला, त्यामुळे अमेरिकेच्या निवडणुकीचे पारडे फिरले. अमेरिकेत राजकीय हिंसाचार जुना नाही. आतापर्यंत अमेरिकेच्या चार अध्यक्षांच्या हत्या झाल्या असल्या, तरी 1981 साली अध्यक्ष रोनाल्ड रिगन यांच्या हत्येच्या अयशस्वी प्रयत्नानंतर अध्यक्षांना लक्ष्य करण्यात हल्लेखोरांना यश आले नव्हते.

डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदाचे उमेदवार असले, तरी ते माजी अध्यक्षदेखील आहेत. ट्रम्प यांचा हल्लेखोर समोरच्या इमारतीवर चढताना लोकांनी पाहिला आणि त्याबाबत सुरक्षायंत्रणांना सूचित केले. त्यानंतर सुमारे दीड मिनिटांनी त्याने ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडल्या. ज्या इमारतीवर तो चढला, त्याच इमारतीत सुरक्षायंत्रणांचे नेमबाजही होते. पण, त्यांना इमारतीच्या छतावर उभे करण्यात आले नव्हते. ही गोष्ट जसा अमेरिकेच्या सुरक्षाव्यवस्थेचा निष्काळजीपणा दाखवते, तशीच तेथील दुभंगलेली राजकीय व्यवस्थादेखील दाखवते. ट्रम्प यांच्यावर झालेला हल्ला हा एका व्यापक कटाचा भाग असल्याची चर्चा सुरू झाली असून, त्यावर रिपब्लिकन पक्षाच्या मतदारांचा विश्वास बसला, तर आश्चर्य वाटायला नको. दुसरीकडे डेमोक्रॅटिक पक्षाच्या समर्थकांमध्ये ‘हे सर्व ट्रम्प यांनी घडवून आणले आहे’ अशी चर्चा सुरू झाली. या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांकडून ट्रम्प यांना ‘हुकुमशहा’, ‘हिटलर’, ‘देशासाठी असलेला धोका’ ते ‘गुन्हेगार’ अशा नावांनी पुकारण्यात येत होते. त्यामुळे त्यांना संपवण्याचा प्रयत्न करावासा कोणाला वाटल्यास आश्चर्य वाटायला नको. अशाच प्रकारची वक्तव्ये ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांकडून बायडन आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांबाबत केली जातात. अमेरिकेत ज्या सहजतेने बंदुकी उपलब्ध आहेत, ते पाहता अशा घटनांचे राजकीय हिंसाचारात रुपांतर झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांचे नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले. दुर्दैवाने ‘वॉशिंग्टन पोस्ट’ आणि ‘न्यूयॉर्क टाइम्स’सारख्या वृत्तपत्रांनी ज्याप्रकारे या घटनेचे मथळे छापले, त्यावरून असे वाटावे की, हा हत्येचा प्रयत्न नसून ट्रम्प यांचाच कांगावा आहे. या हल्ल्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा एक कार्यकर्ता मारला गेला, तर दुसरा जखमी झाला. हल्लेखोराच्या घरामध्ये स्फोटकांचा साठा मिळाला. त्यानंतर या माध्यमांनी हल्याचा तोंडदेखला निषेध करत या हल्ल्याला ट्रम्प यांचीच चिथावणीखोर भाषा कारणीभूत असल्याचा दृष्टिकोन पसरवायला सुरुवात केली. अर्थात, त्याचा किती उपयोग होईल, हे सांगता येत नाही. दि. 27 जून रोजी डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात पहिली अध्यक्षीय जुगलबंदी झाली. त्यात अध्यक्ष जो बायडन यांना वारंवार अडखळले. गोंधळले.

डोनाल्ड ट्रम्पही 77 वर्षांचे असले, तरी 81 वर्षांच्या बायडन यांच्या तुलनेत त्यांची देहबोली आश्वासक होती. हल्ल्यात जखमी झाल्यावर एक दिवसाचीही विश्रांती न घेता, डोनाल्ड ट्रम्प दि. 15 जुलै ते दि. 18 जुलै यांदरम्यान विस्कॉन्सिनमधील मिलवाकी येथे पार पडणार्‍या रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय मेळाव्याला उपस्थित राहिले. या मेळाव्यात रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होणार असून, त्यापूर्वी ट्रम्प यांनी 39 वर्षांच्या जेम्स डेव्हिड वान्स यांची उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. 2022 साली ओहियो राज्यातून पहिल्यांदाच सिनेटर झालेले वान्स अमेरिकेतल्या औद्योगिक पट्ट्याचे प्रतिनिधित्व करतात. गेल्या काही दशकांत अमेरिकेतील अनेक उद्योग बंद पडले किंवा चीनमध्ये स्थलांतरित झाले. त्यामुळे या पट्ट्यामधील बेकारी आणि गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली.

वान्स यांनी 2016 साली ‘हिलबेली एलेजी’ या नावाने आत्मचरित्र लिहिले. त्यात या पट्ट्यामध्ये बालपण घालवताना त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट, त्यांच्या आईला दारू आणि अमली पदार्थांचे लागलेले व्यसन आणि सभोवतालच्या परिस्थितीचे वर्णन आहे. या अडचणींवर मात करून ते सैन्यात गेले आणि इराकमध्ये सेवा बजावली. सैन्यातून बाहेर आल्यावर त्यांनी सुप्रसिद्ध येल विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यांच्या पत्नीचे नाव उषा असून ती भारतीय वंशाची आहे आणि प्रसिद्ध वकील आहे. तिच्या आग्रहास्तव वान्स यांनी लग्नात हिंदू पद्धतीनेही काही विधी पार पाडले. वान्स यांचे आत्मचरित्र प्रचंड लोकप्रिय झाले आणि त्यावर ‘नेटफ्लिक्स’ने एका चित्रपटाचीही निर्मिती केली. असे म्हटले जाते की, पारंपरिकरित्या श्रमिकांच्या डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान करणार्‍या अमेरिकेच्या औद्योगिक पट्ट्याने 2016 साली डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या पट्ट्यात ट्रम्प यांच्या बाजूने वातावरणनिर्मिती करण्यात वान्स यांच्या पुस्तकाचाही वाटा होता.

असे असले तरी, 2016 साली वान्स यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केला होता. कालांतराने वान्स यांना औद्योगिक पट्ट्यातील ट्रम्प यांच्या लोकप्रियतेची जाणीव झाली आणि ते ट्रम्प यांचे कट्टर समर्थक बनले. अमेरिकेतील ख्रिस्ती मूलतत्त्ववादी हे रिपब्लिकन पक्षाचे सर्वात मोठे समर्थक आहेत, असे मानले जाते. 2016 साली अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी या समूहाच्या माईक पेन्स यांना उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवडले होते. या निवडणुकीत त्यांनी वान्स यांची निवड करून त्यांच्यासाठी अमेरिकेच्या औद्योगिक पट्ट्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. वान्स तरुण आहेत. त्यांचे भारताशी नाते आहे. यातून ट्रम्प यांच्यादृष्टीनेही भारत आणि अमेरिकेतील वाढत्या मैत्रीचे महत्त्व प्रतीत होते.

रिपब्लिकन पक्षाने अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर सुमारे महिनाभराने म्हणजेच दि. 19 ऑगस्ट ते दि. 22 ऑगस्ट यांदरम्यान डेमोक्रॅटिक पक्षाचा राष्ट्रीय मेळावा पार पडेल. त्यात अध्यक्ष जो बायडन यांची उमेदवारी निश्चित करण्यात येईल. दि. 10 सप्टेंबर रोजी ट्रम्प आणि बायडन यांच्यात एबीसी वाहिनीवर जुगलबंदी होईल. त्याच आसपास जे. डी. वान्स आणि कमला हॅरिस या उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्येही एक जुगलबंदी होईल. त्यानंतर दि. 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून जानेवारी 2025 मध्ये नवीन अध्यक्ष कार्यभार स्वीकारतील.

जगभरात हे वर्ष ‘निवडणुकांचे वर्ष’ म्हणून ओळखले जात आहे. गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये जगाला ‘कोविड 19’, आर्थिक संकटे, युद्धे आणि महागाई अशा अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. त्याचा परिणाम निवडणुकांच्या निकालावर होताना स्पष्टपणे दिसत आहे. भारतात नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपला सलग तिसर्‍यांदा विजय मिळाला असला, तरी भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या. ब्रिटनमध्ये सत्ताधारी हुजूर पक्षाचा धुव्वा उडाला. फ्रान्समध्ये पार पडलेल्या संसदीय निवडणुकीत अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पक्षास मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.

दक्षिण आफ्रिकेतही आफ्रिकन नॅशनल काँग्रेसला मोठे नुकसान सोसावे लागले. पण, तरीही सर्व ठिकाणी निवडणुका कोणत्याही हिंसाचाराविना पार पडल्या. पण, अमेरिकेत मात्र निवडणुकांवरील हिंसाचाराचे सावट अधिक गडद झाले आहे. मनाविरुद्ध निकाल लागल्यास रस्त्यांवर उतरून हिंसाचार करणार्‍या नागरिकांना कसे थांबवायचे, हे अमेरिकेपुढचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे, हे नक्की!


अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.