टीजेऐसबी बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वृक्षारोपण
16-Jul-2024
Total Views |
ठाणे : टीजेएसबी सहकारी बँक अधिकारी व कर्मचारी संघ सलंग्न भारतीय मजदूर संघ ही संघटना दरवर्षी सामाजिक कर्तव्य म्हणून वृक्षारोपण कार्यक्रम त्यांच्या पाच राज्यांतील विविध विभागामध्ये राबवत असते. ठाणे विभागाचा वृक्षारोपण कार्यक्रम रविवारी (ता.१४ जुलै) पानखंडा, घोडबंदर रोड, येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत कुटुंब प्रबोधन कार्यकर्ते डॉ. विवेक वडके, भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, स्थानिक कार्यकर्ते राम ठाकुर, विशेष कार्यकारी अधिकारी पार्वतीताई उघाडे, टीजेएसबी बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक प्रदीप मांडवकर,संघटनेचे सहसचिव श्रीराम फाटक, मुख्य कार्यकारीणी सदस्य हर्षद कुटुंबळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
निसर्ग रक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या प्रदीप मांडवकर तसेच,६०० पेक्षा जास्त गड किल्ले फिरत वृक्ष संवर्धनाची जनजागृती करणाऱ्या सुनील शिंदे यांनी सर्वांना वृक्ष लागवड व संवर्धनाची गरज, व त्याबद्दल अतिशय उपयुक्त माहिती उपस्थितांसमोर विषद केली. डॉ. वडके व वाघुले यांनी असे स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल संस्थेचे तसेच सुट्टीच्या दिवशी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कर्मचारी वर्गाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रफुल्ल शिंदे यांनी केले. या कार्यक्रमास संघ परिवारातील कार्यकर्तेही सहभागी झाले होते. एकूण २०० झाडे लावण्यात आली, त्यातील काही झाडे सदस्यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या घरीही लावण्यासाठी नेली. कार्यक्रमाची व्यवस्था प्रफुल्ल शिंदे, केदार मोरे यांनी केली.