आज मंगळवार दि. 16 जुलै. महान विदूषी अणि सेवाव्रती, प्रचंड संघटन कौशल्य आणि तितक्याच निःस्वार्थी लक्ष्मीबाई केळकर अर्थात वंदनीय मावशींची तिथीनुसार जयंती. वंदनीय लक्ष्मीबाई केळकर यांनी कार्यकर्तृत्वाने महिला शक्तीला राष्ट्रशक्ती बनवण्याचा मार्ग प्रशस्त केला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कालसुसंगत विचारकार्याचे हे चिंतन...
2020च्या कोरोना महामारीत जग थिजून गेले. सर्वत्र मृत्यूचे तांडव माजले. कोरोनाला घाबरून जीवाच्या भीतीने भलेभले घरी बसले. मात्र, राष्ट्र सेविका समितीच्या भगिनी देशसमाजाच्या कल्याणासाठी कोरोना काळातही कार्यरत होत्या. सामुदायिकरीत्या स्वयंपाक बनवून ताजे सकस अन्न वितरीत करणे ते कोरोना रुग्णांची थेट सेवा करणे शिवाय, कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे अंतिम संस्कार करणे, यात भगिनी कुठेही मागे नव्हत्या. ‘देश हमे देता हैं सब कुछ, हम भी तो कुछ देना सिखे’ ही सर्वोच्च भावना नेहेमीच समितीच्या भगिनींच्या मनात आहे.
आजही वस्तीपातळीवर समाजासमोर अनेक समस्या आहेत. त्या समस्या केवळ समाजाच्या नाहीत, तर आपल्या कुटुंबाच्याच आहेत, असे मानत समितीच्या सेविका त्या समस्या सोडवण्यासाठी काम करत असतात. ‘लव्ह जिहाद’, ‘ड्रग्ज जिहाद’ या समस्यांच्या विरोधात काम करताना, जीवाची पर्वा न करणार्या समितीच्या सेविका जागोजागी आहेत. उदाहरणच द्यायचे तर दक्षिण आसामच्या सुपर्णा डे, उत्तर आसामच्या नीता बा आणि पद्मा बा, महाकौशलच्या शशी दीदी, दिल्लीच्या पूनम दीदी आणि हरियाणा धार्मिक कार्यविभागाच्या तारा दीदी अशा कितीतरी जणींनी देव-देश-धर्म-संस्कृतीसाठी आपले अवघे आयुष्य समर्पित केले आहे. तर अशा या ‘राष्ट्र सेविका समिती’ची स्थापना करणार्या वंदनीय लक्ष्मीबाई केळकर अर्थात वंदनीय केळकर मावशींची कार्यस्मृती अशी वास्तवात जिवंत आहे. त्यामुळेच तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंतर अत्यंत सेवाभावी आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात अग्रेसर असलेले, महिलांचे एकमेव संघटन म्हटले की, एकच नाव आहे ते म्हणजे ‘राष्ट्र सेविका समिती.’ मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व यांचा विशाल संगम म्हणजे वंदनीय केळकर मावशी.
आजही समाजात सकारात्मक कार्य करण्यासाठी स्त्रीशक्ती उत्सुक आहे. प्रयत्नशील आहे. मात्र, बहुतेकदा त्यांच्या कार्यविचारात कुणाची ना कुणाची साथ हवी, पाठिंबा हवा, असे त्यांना वाटत असते. तसेच आपले ध्येय आपण एकटे पूर्ण करू शकू का? प्रस्थापित बांधवांशिवाय आपल्या मनातील विचार पूर्णत्वास जाऊ शकतील का? या असल्या विचारांनी स्त्रियांच्या मनातले भव्यदिव्य कार्य मनातच राहते. या पार्श्वभूमीवर जगभरातल्या मातृशक्तीसाठी वंदनीय मावशींचे विचारकार्य म्हणजे दीपस्तंभच आहे. राष्ट्र सेविका समितीची स्थापना कशी झाली? त्या संदर्भातली ती घटना आठवली की, प्रचीती येते. बंधू हिंदुत्वासाठी संघटित होत आहेत. देव-देश-धर्मासाठी सर्वोच्च कार्य करण्यास तयार होत आहेत. या कामी समाजभगिनी म्हणून मातृशक्तीचा सहभाग असायलाच हवा, असे वाटून वंदनीय मावशींनी यासंदर्भात पूजनीय डॉ. केशव हेडगेवार यांच्याशी संवाद साधला. यावर पू. हेडगेवार म्हणाले, ”सध्या तरी तरुणांसाठी संघशिक्षेचा विचार आहे.
महिलांसाठी तसा विचार केला नाही.” संघ संस्थापकांच्या विधानांनी त्या निराश झाल्या नाहीत की, ’आता काय करायचे? संघ संस्थापकांनी महिला संघटनेसंदर्भात प्रत्यक्ष थेट काही म्हटले नाही. मग, आपणही तो विचार सोडून देऊ. आपण एकट्या काय करणार? छे!’ असा विचार त्यांच्या मनातही आला नाही. उलट, आत्मशक्तीची ज्योत प्रज्वलित असलेल्या वंदनीय मावशी म्हणाल्या, ”...म्हणजे स्त्रियांनी स्वतः हा विचार करावा का?” यावर पू. हेडगेवार म्हणाले, “हो!” दोन महान व्यक्तिमत्त्वांचा हा संवाद. पू. हेडगेवारांना, ’स्त्रियांनी स्वत: हा विचार करावा का?’ हा वंदनीय मावशींनी विचारलेला प्रश्न. काय नव्हते या प्रश्नात? स्त्रीशक्तीचे भान, समस्त मातृशक्तीच्या संघटननिर्मितीचा विश्वास आणि मुख्य म्हणजे, भारतीय स्त्रीशक्तीच्या परमोच्च कर्तव्याचा जागर. यानंतर, वंदनीय मावशींनी ‘राष्ट्र सेविका समिती’ची स्थापना केली. करोडो महिलांमध्ये राष्ट्राप्रति, धर्माप्रति समर्पित भावना निर्माण करणार्या राष्ट्र सेविका समितीची स्थापना अशी झाली. वंदनीय मावशींनी काही लौकिक अर्थाने तथाकथित उच्चशिक्षण घेतलेले नव्हते. त्यांच्या आयुष्यात सगळेच ऋतू सुखाचे नव्हते. कष्ट, दुःख आणि जबाबदार्या या त्यांनाही होत्याच. सगळ्यांमध्येही त्यांचे आत्मतेज, समाजबंध आणि देशाप्रतिची निष्ठा कायम होती.
आपण पाहतो की, भौतिकतेमुळे भारतीय समाजामध्येही परिवर्तन होत आहे. कर्तृत्ववान स्त्रीची व्याख्या करताना उच्चपदस्थ नोकरी किंवा विविध भौतिक क्षेत्रांत यश मिळवणारी महिला हीच कर्तृत्ववान महिला असेच म्हटले जाते, तर गृहिणी म्हणजे घराच्या चौकटीत अडकलेली, संसाराच्या रगाड्यात असलेली बाई असेच काहीसे विचार समाजात आहेत. या परिप्रेक्षात वंदनीय मावशींनी नेतृत्व आणि कर्तृत्वासोबतच मातृत्वाच्या महत्त्वाचाही गुणगौरव केला आहे. ‘एक सुसंस्कारित राष्ट्रप्रेमी समाजशील माता कुटुंबच नव्हे, तर समाज आणि हिंदूराष्ट्राच्या निर्मितीमध्येही मोलाची भूमिका निभावेल,’ असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळेच, ‘समिती का?’ या प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणाल्या होत्या की, ”स्त्री हीच राष्ट्राची आधारशक्ती आहे, या जाणिवेतून स्त्रीजीवनाच्या स्वतंत्र दृष्टिकोनातून तेजस्वी अशा हिंदूराष्ट्राला पुन्हा जन्म देण्याच्या मातृभावनेतून अखिल देशव्यापी शिस्तबद्ध संघटित सामर्थ्य उभे करावयाचे, ही राष्ट्र सेविका समितीच्या कामाची रूपरेषा आहे.” समितीसंदर्भातील त्यांचे विचार आजच्या स्त्रीभानाचा आरसाच आहेत. त्यांच्या मते, ‘जबाबदारी’ आणि ‘कर्तव्य’ यांची गल्लत करू नये. स्त्री म्हणून कुटुंब, समाज आणि राष्ट्र याबद्दल प्रत्येक स्त्रीने आपले कर्तव्य आनंदाने निभावावे.
वं. मावशी त्यांचे वैयक्तिक आयुष्यही याच विचारांनी जगल्या आहेत.
त्यांचे जीवनचरित्र पाहिले तर बालपणापासून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची तेजस्विता दिसून येते. पारतंत्र्याच्या काळात इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये देवादिकांवर टीका आणि येशू ख्रिस्ताचे गुणगाण होणार, हे ओघानेच आले. वंदनीय मावशी लहान असताना जेव्हा या शाळेत गेल्या, तेव्हा त्या लहान वयातही त्यांना या सगळ्यांचा भयंकर संताप आला. स्वधर्माची निंदा, देवादिकांवर टीका त्यांना सहन झाली नाही आणि त्यांनी त्या शाळेत जायचेच नाकारले. त्याकाळी हुंडा देणे-घेणे ही प्रथा सामान्यच होती. मात्र, लक्ष्मीबाई या प्रथेविरोधात होत्या. हुंडा देऊन विवाह करू नये, असे त्यांचे मत. त्यामुळेच त्याकाळी बर्याच मोठ्या वयात म्हणजे वयाच्या 14व्या वर्षी त्यांचा विवाह पुरुषोत्तमराव केळकर यांच्याशी झाला आणि त्या वर्ध्याला आल्या. पुरुषोत्तमरावांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. तिच्यापासून त्यांना अपत्ये झाली होती. पण, वंदनीय मावशींनी त्या लहान वयातही सगळे घर सांभाळले. आईविना पोरक्या अपत्यांना आईची उणीव कधीही जाणवू दिली नाही. पती अनेकदा गंभीर आजारी असायचे. जमेल त्या प्रयत्नांतून त्यांनी पतीला आजारातून बरे केले. पण, काळाने घाला घातलाच. पतीचे निधन झाले. घराचा पूर्ण डोलारा त्यांना सांभाळावा लागला. जाऊबाई आणि सगळ्या परिवाराला एकत्र बांधत, त्यांनी घराची धुरा सांभाळली. ‘शेतीभातीचे काम एक विधवा काय सांभाळणार’ असे म्हणणार्यांना काही न बोलता, अतिशय संयत आणि हुशारीने त्यांनी आपले घर, शेतीभाती सांभाळली. मुलांवर चांगले संस्कार केले. त्या काळात विधवांना कोणत्याही मंगलकार्यात आमंत्रित केले जात नसे. मात्र, वंदनीय मावशी रामायणावर प्रवचन द्यायच्या. विधवांनाही जगण्याचा हक्क आहे, हे समाजासमोर ठासून सांगायच्या आणि तसे वागायच्याही. अस्वच्छ सवर्णापेक्षा स्वच्छ हरिजन केव्हाही घरातल्या किंवा शेतीतल्या कामात कामास ठेवावा, हा निर्णय कुटुंबात पालन करणार्या वंदनीय मावशी! तो काळ होता 1930-35चा.
असो. स्त्री म्हटले की करुणा, दयामाया वगैरे भावना, गुण असणारच. पण, या सगळ्याआड स्त्रीशक्तीचे शौर्यतेजही असते. करुण, भावनाप्रधान कर्तव्याआड हे तेज कमी होता कामा नये. या परिक्षेपात वंदनीय मावशींच्या जीवनातली ती घटना आजही समस्त स्त्रीशक्तीसाठी प्रचंड प्रेरणादायी आहे. ऑगस्ट 1947चा दुसरा आठवडा. त्यावेळी पाकिस्तानातील सिंधमध्ये जाण्यासाठी उत्सुक असणार्या तिथल्या मुस्लिमांच्या हिंसेचा क्रूर नंगानाच सुरू होता. प्रचंड रक्तपात... अक्षरशः हिंदूंचे शिरकाण सुरू होते. अशावेळी भारतातून नियोजित पाकिस्तानमधील सिंधमध्ये जाण्याची हिंमत कोण करणार? या पार्श्वभूमीवर सिंधच्या जेठा देवानी या समिती सेविकेचे पत्र वंदनीय मावशींना आले होते. त्या पत्रात लिहिले होते की, “आता आम्हाला सिंध सोडावाच लागेल, हे बिलकूल स्पष्ट आहे. कारण, आता आमची मातृभूमी मुसलमानांची भोगभूमी बनणार आहे. आपल्या प्राणप्रिय भारतभूचे विभाजन होण्याआधी आपण एकदा तरी आमच्या इथे यावे. फाळणीच्या या अतिकठीण समयी आपल्यासारखे प्रेमदायी, धैर्यदायी मातेच्या उपस्थितीमध्ये आमचे दुःख थोडे कमी होईल आणि भविष्यात कर्तव्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुम्ही आमची इच्छा पूर्ण कराल काय?”
समितीच्या सेविकेने पत्र लिहिले. त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली. पण, त्यांची इच्छा पूर्ण करणे हे दिव्यच होते. कारण, त्यावेळी सिंधमध्ये चाललेला हिंसेचा रक्तपात आणि नंगानाच. हिंसा करणार्या त्या धर्मांधांच्या मते, वंदनीय मावशी तर केवळ एक हिंदू स्त्रीच असणार होत्या. मात्र, 13 ऑगस्ट रोजी सिंधमधील महिलांना, राष्ट्र सेविका समितीच्या सेविकांना धीर देण्यासाठी वंदनीय मावशी कराचीला गेल्या. कराची विमानतळावर त्या आणि त्यांच्यासोबत समितीच्या वेणूताई आणि आणखी दोनतीन हिंदू भारतीय उतरले. विमानतळावरच नियोजित पाकिस्तानी मुस्लिमांचा जत्था होता. ते ‘खून से लिया पाकिस्तान, लढके लेंगे हिंदुस्थान’ अशा घोषणा देत होते. पण, जराही न भिता वंदनीय मावशी कराचीतल्या त्या भीषण परिस्थितीतून मार्गक्रमण करत तिथल्या सेविकांच्या घरी गेल्या. आईच्या मायेने त्यांना धीर दिला. फाळणीच्या वेळी भारतातील मुस्लीमबहुल वस्तीत जाणेही लोकांनी सोडलेले. तिथे वंदनीय मावशी प्रत्यक्ष पाकिस्तानच्या कराचीत, तेही त्यांच्या स्वातंत्र्यदिनी गेल्या. नुसती कल्पना करा, सिंधच्या त्या सेविकांना काय वाटले असेल? नुसता विचार करूनही वंदनीय मावशींचे धैर्य, निडरता आणि राष्ट्र सेविका समितीच्या सेविकांविषयीचे स्नेहमय नाते चटकन डोळ्यांसमोर आणि मनातही उभे राहते. या अशावेळी वंदनीय मावशी कराचीला गेल्या. समितीच्या त्या भगिनींना धीर दिला. ‘तुम्ही एकट्या नाही, हिंदू सज्जनशक्ती तुमच्यासोबत आहे, नव्हे अख्खा हिंदुस्थान तुमच्यासोबत आहे.’ ही घटना डोळ्यांसमोर उभी राहिली की, निःशब्द व्हायला होते. आजही समितीच्या भगिनी वंदनीय मावशींच्या या उदात्त विचारकार्याची धुरा धैर्याने जोपासत आहेत.
अनेक महिला स्वबळावर संघटन उभे करतात. संस्था स्थापन करणे सोपे, मात्र संस्था-संघटनांचे संघटन बळ वाढवणे कठीण काम. सामाजिक क्षेत्रात विविध स्तरांवर महिलाशक्ती संघटनशक्तीसाठी काम करते. संघटनशक्तीचा बीजमंत्र वंदनीय मावशींनी दिला आहे. त्यासंदर्भातली आठवणही सांगण्यासारखी आहे. मा. बाळासाहेब देवरस सहकार्यवाह झाले, ते वंदनीय मावशींना, सर्व क्षेत्र प्रचारकांसह भेटले. म्हणाले, “आपल्यासमोर सर्व हिंदुस्थान आहे. कुठे-कुठे समितीच्या शाखा काढायच्या ते सांगा. जिथे संघाची शाखा लागेल, तिथे आपण समितीची शाखा निर्माण करू. हे राष्ट्रनिर्माणाचे काम आहे.” यावर वंदनीय मावशी म्हणाल्या, “नाही. तुम्ही एक करा की, जिथे शाखा आहे, तिथल्या सुसंस्कृत आणि सुरक्षित घरांचा संपर्क करून द्या. आपल्या सेविका तिथे जातील आणि संपर्क करून समितीच्या शाखा निर्माण करतील.” किती मोठी घटना! कारण, दुर्दैवी आणि कटू आहे. पण, सत्य आहे की, आजही महिला संघटना पुरुष संघटनांच्या प्रभावळीतून बाहेर आली नाही. पुरुष संघटनेचा एक गट म्हणून त्या काम करतात. पण, वंदनीय मावशींनी संघटन संपर्क आणि सेवेचा हा मंत्र दिला. पुढे माता जिजाऊ, राजमाता अहिल्या होळकर आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या नावाने प्रचंड सेवाभावी वास्तू वंदनीय मावशींनी उभ्या केल्या. त्यासाठी सेविकांची साथ होतीच. काही वास्तू तर अक्षरशः वैयक्तिक कर्ज काढूनही त्यांनी उभ्या केल्या. वंदनीय मावशींच्या नावावर आज देशभरात कितीतरी सेवाभावी उपक्रम, वास्तू आहेत. स्वतंत्र विचारांच्या धनी असलेल्या वंदनीय मावशी नेहमीच सातोळकर महाराजांचे एक वचन सांगत की, ‘अबला म्हणजे जिच्या बलाची तुलनाच होऊ शकत नाही.’
मावशींच्या विचारातल्या अशा अतुलनीय बलाची स्त्रीशक्ती आज सर्वत्र आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. नावे तरी किती जणींची घ्यावीत? समाजकारण, राजकारण, धर्मकारण,विज्ञान, न्यायव्यवस्था, कायदा- सुव्यवस्था, संरक्षण यंत्रणा. आज सर्वत्र महिलाशक्ती कार्यरत आहे. मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाचा सुरेख संगम साधत ही स्त्रीशक्ती अतुलनीय कार्य करत आहे. त्या कार्याला सुरक्षित, सहज वर्तमान आणि भविष्य लाभावे, यासाठी बीज रोवले ते वंदनीय मावशींनी.
त्यांचे विचारकार्य आठवताना मनात शब्द उमलतात-
अबलांना या करण्या सबला
देह तुझा गं सदैव झिजला
राष्ट्रोन्नतीचा मार्ग दाविला
फिटेल कधी का हे तव हे ऋण
प्रणाम घे हा कोटीकरांचा
कृतज्ञतेने करितो वंदन!
9594969638