लांडगा, कुत्रा की ’डॉल्फ’ ?

    15-Jul-2024   
Total Views |
maharashtra wolf
                                                                                                                                 (छाया - सिद्धेश ब्राम्हणकर)


पाळीव प्रजातींकडून वन्यप्रजातींवर होणार्‍या आक्रमणाची अनेक उदाहरणे राज्यात दिसून येतात (maharashtra's wolf). मात्र, यामधील दखल घेऊन त्यावर उपाययोजनात्मक काम करावे लागणार आहे ते म्हणजे ‘वूल्फ-डॉग’ किंवा ‘डॉल्फ’वर. लांडगा आणि भटके कुत्रे यांच्या संकरामुळे जन्मान आलेल्या या प्राण्याने मूळ जंगली लांडग्यांच्या जनुकीय साखळीला धक्का पोहोचवण्यास सुरुवात केली आहे (maharashtra's wolf). त्याविषयी ऊहापोह करणारा हा लेख... (maharashtra's wolf)


मुंबई (अक्षय मांडवकर) - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात दि. ९ जुलै रोजी घडलेली घटना. तालुक्यातील कामती खुर्द येथील कुणाल आणि गौरव दावणे यांना आपल्या शेतातील घराच्या शौचालयाच्या बाहेर एक प्राणी बसलेला आढळून आला. शांतपणे बसलेला हा प्राणी कुत्रा असल्याचे दावणे कुटुंबीयांना वाटले. अनोळखी कुत्रा चावेल, म्हणून कुणाल दावणे यांनी जवळ जाऊन त्याचे निरीक्षण केले. तेव्हा शौचालयाच्या पायीवर बसलेला हा प्राणी कुत्रा नसून चक्क लांडगा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच वन विभागाला याची माहिती दिली. वनकर्मचार्‍यांनी ’जीआयबी फाऊंडेशन’च्या स्वयंसेवकांच्या मदतीने या लांडग्याला पकडले आणि उपचारासाठी पुण्यातील ’रेस्क्यू’ संस्थेच्या उपचारकेंद्रात दाखल केले. याठिकाणी पशुवैद्यकांनी या प्राण्याची तपासणी केली असून हा प्राणी लांडगा आणि कुत्रा यांचा संकर असल्याची शक्यता त्यांच्याकडून वर्तविण्यात आली आहे. यानिमित्ताने लांडग्यासारख्या संकटग्रस्त प्रजातीचे महाराष्ट्रातील अस्तित्त्व धोक्यात आले आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
लांडगा हा श्वानकुळातील प्राणी आहे. कुत्रा (डॉग), लांडगा (वुल्फ), खोकड (फॉक्स) आणि कोल्हा (जॅकल) हे सर्व प्राणी ‘कॅनिडे’ या कुळात मोडतात. लांडगा, कुत्रा आणि कोल्हा या श्वानकुळातील तिन्ही प्राण्यांमध्ये लांडगा हा आकाराने मोठा असतो. जगात लांडग्यांच्या ’लाल लांडगा’ (रेड वुल्फ), ’पूर्व लांडगा’ (अल्गोनक्विन लांडगा), ’राखाडी लांडगा’ (ग्रे वुल्फ), ’आफ्रिकन सोनेरी लांडगा’ (आफ्रिकन गोल्डन वुल्फ) आणि ’इथोपियन लांडगा’ अशा पाच प्रजाती सापडतात. ’लाल लांडगा’ हा उत्तर अमेरिकेत, ’पूर्व लांडगा’ हा कॅनडामध्ये, ’राखाडी लांडगा’ हा युरोप आणि उत्तर अमेरिकेत, ’आफ्रिकन सोनेरी लांडगा’ आणि ’इथोपियन लांडगा’ हा आफ्रिकेत आढळतो. या सर्व मुख्य प्रजातींच्या वेगवेगळ्या उपप्रजाती जगातील विविध भागात विखुरलेल्या आहेत. भारताचा विचार केल्यास देशात राखाडी लांडगाच्या दोन उपप्रजाती आढळतात. हिमालयीन प्रदेशात आढळणारी उपप्रजात ही ’हिमालयीन लांडगा’ किंवा ’तिबेटी लांडगा’ (कॅ. ल्युपस चँको) म्हणून ओळखली जाते. तर दख्खनच्या पठारावर आढळणार्‍या प्रजातीला ’भारतीय राखाडी लांडगा’ (कॅ. ल्युपस पॅलिपीस) म्हणून ओळखतात. ’भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्या’अंतर्गत प्रथम श्रेणीत लांडग्याला संरक्षण देण्यात आले आहे. तसेच ’इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ने (आययूसीएन) लांडग्यांना ’संकटग्रस्त’ (एनडेंजर्ड) म्हणून घोषित केले आहे. भारतात लांडग्यांची संख्या अंदाजे दोन ते तीन हजारांच्या घरात आहे. तर महाराष्ट्रात त्यांचे अधिवासक्षेत्र ४० हजार, ११४ चौ. किमी क्षेत्रात पसरलेले असून त्यांची संख्या ४०० एवढी गंभीर आहे.


महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, धुळे आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने लांडग्यांचा वावर आहे. मात्र, पुणे, सातारा आणि सोलापूर या भागातील लांडग्यांच्या काही कळपांमध्ये भटक्या कुत्र्यांचा समावेश असल्याची नोंद पुण्यातील ’दी ग्रासलॅण्ड ट्रस्ट’ आणि ’रेस्क्यू’ या वन्यजीव बचाव संस्थेने केली आहे. काही ठिकाणी भटके कुत्रे हे लांडग्यांच्या कळपासोबत वावरताना दिसले आहेत, तर काही ठिकाणी एकाच शिकारीवर ताव मारतानादेखील हे दोन्ही प्राणी आढळून आले आहेत. भटक्या कुत्र्यांचे अशा स्वरुपाचे आक्रमण हे मूळ जंगली लांडग्यांना तीन प्रकारे प्रभावित करताना दिसते. एक म्हणजे शिकारीसाठी स्पर्धेत वाढ, दुसरे म्हणजे ’कॅनाईन डिस्टेंपर’चे संक्रमण आणि तिसरे म्हणजे संकर (हायब्रिटायजेशन). यामधील ’कॅनाईन डिस्टेंपर’ आणि संकर, या दोन्ही प्रकारांकडे गांभीर्याने पाहाणे आवश्यक आहे. ’कॅनाईन डिस्टेंपर’ हा संसर्गजन्य रोग आहे. हा रोग प्रामुख्याने लसीकरण न झालेल्या भटक्या कुत्र्यांकडून जंगली वन्यजीवांमध्ये संक्रमित होतो. हे संक्रमण लांडग्यांच्या मज्जासंस्थेवर प्रभाव पाडते. प्रौढ लांडग्यांपेक्षा पिल्लांमध्ये हे संक्रमण वेगाने पसरते. याचे संक्रमण झाल्यावर प्रौढ लांडग्यांमध्ये सुरुवातीस लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र, कालांतराने लक्षणांचा प्रभाव वाढतो. लांडगा थकतो, त्याला आकडी येते, शरीर थरथर कापण्यास सुरुवात होते. यामुळे अशक्तपणा येतो. पिल्लांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने पिल्लांचा कळपच मृत्यूमुखी पडतो.


श्वान कुळातील प्रजातींमध्ये दोन वेगवेगळ्या प्रजातींचे एकमेकांसोबत होणार्‍या संकराची अनेक उदाहरणे जगभरात आहेत. कोल्हा आणि भटके कुत्रे यांचे होणारे संकर हे सर्वसामान्यपणे उघडकीस आले आहे. महाराष्ट्रामधून भटके कुत्रे आणि लांडग्यांचा संकराची उदाहरणे गेल्या काही महिन्यांमध्ये समोर आली आहेत. अशा स्वरुपात संकरित झालेल्या लांडग्यांचे दोन प्रकार प्राथमिक निरीक्षणाअंती पाहावयास मिळतात. ज्यामध्ये वर्तनात झालेले बदल आणि शारीरिक बदल, असे दोन प्रकार आपण ढोबळमानाने पाडू शकतो. काहीवेळा संकरित लांडग्यांचे वर्तन हे त्यांचा मूळ वर्तनाशी समरुप म्हणेज हिंस्र स्वरुपाचे असते. मात्र, त्याच्या अवयवाची ठेवण आणि रंगसंगती ही कुत्र्यांसारखी असते. तर दुसर्‍या प्रकारात शारीरिक ठेवण ही मूळ जंगली लांडग्यासारखीच असते. परंतु, वर्तन हे कुत्र्यांसारखे मैत्रीपूर्ण झाल्यासारखे दिसते. राज्यात अशा दोन्ही प्रकारचे लांडगे निदर्शनास येत आहेत. संकराची ही परिस्थिती मूळ जंगली लांडग्याच्या जनुकीय साखळीला धक्का पोहोचवत आहे. वनक्षेत्र आणि गवताळ प्रदेशांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढलेला वावर पाहाता, भविष्यात राज्यात मूळ जंगली लांडगे शिल्लक राहातील का, हा प्रश्न उपस्थित करण्याची आता वेळ आली आहे.

संकरित लांडग्यांचे विभक्तीकरण गरजेचे !
’द ग्रासलॅण्ड ट्रस्ट’, ’अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अ‍ॅण्ड एन्व्हार्यंमेंट’ आणि ’नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स इन्स्टिट्यूट’ने मिळूनमहाराष्ट्रातील लांडग्यांच्या जनुकीय साखळीचा अभ्यास केला. पुणे जिल्ह्यातील लांडग्यांचे केस आणि विष्ठेच्या तपासणीअंती त्या विशिष्ट लांडग्याच्या दोन पिढ्या या कुत्रा आणि लांडग्याच्या संकर असल्याचे आमच्या लक्षात आले. राज्यात मूळ जंगली लांडगे शिल्लक राहिले आहेत का? हे तपासण्यासाठी राज्यभरातील लांडग्यांच्या गुणसूत्रांची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यासाठीचा संशोधन प्रकल्प आम्ही प्रस्तावित केला आहे. याशिवाय संकरित लाडग्यांना मूळ जंगली लांडग्यांपासून वेगळे करणे गरजेचे आहे. त्यांना बंदिस्त अधिवासात ठेवून मूळ जंगली लांडग्यांना संरक्षित करणे आवश्यक आहे. - मिहीर गोडबोले, संस्थापक, द ग्रासलॅण्ड ट्रस्ट



धोक्यांचे दोन प्रकार !
गेल्या आठवड्यात सोलापूरमधून बचाव केंद्रात दोन लांडगे दाखल झाले आहेत. हे दोन्ही लांडगे भटक्या कुत्र्यासोबत झालेल्या संकराचा प्रकार असल्याचे आमच्या प्रथमदर्शनी लक्षात आले आहे. कारण, एका लांडग्याचे वर्तन हे कुत्र्यासारखे आहे, तर दुसर्‍या लांडग्याची शरीर वैशिष्ट्ये ही कुत्र्यासारखी आहेत. त्यामुळे आम्ही दोन्ही लांडग्यांच्या रक्ताचे नमुने हे बंगळुरु येथील ’नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स इन्स्टिट्यूट’मध्ये (एनसीबीएस) तपासणीकरिता पाठवित आहोत. यापूर्वी पुण्यामधून ’कॅनाईन डिस्टेंपर’ने ग्रस्त असलेले लांडग्याचे पिल्लू बचाव केंद्रात दाखल झाले होते. रक्ताच्या तपासणीअंती हे पिल्लू ’कॅनाईन डिस्टेंपर’ने ग्रस्त असण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. सद्यपरिस्थितीत आमच्या निरीक्षणानुसार संकर आणि ’कॅनाईन डिस्टेंपर’चे संक्रमण हे लांडग्यांना भटक्या कुत्र्यांपासून असणारे प्रमुख धोके आहेत. भटक्या कुत्र्यांना लांडग्यांच्या कळपापासून दूर करण्यासाठी प्रचंड मोठ्या यंत्रणेची गरज लागणार आहे. शिवाय, मूळ जंगली लांडग्यांच्या अस्तित्त्वासाठी संवर्धन प्रजनन प्रकल्पासारखे प्रयोगही करणे आवश्यक ठरणार आहे. - नेहा पंचमिया, संचालक, रेस्क्यू-पुणे

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.