ऑस्ट्रेलियाचा शहरी कोल्हा

    15-Jul-2024   
Total Views |
Urban foxes spotted Sydney and Melbourne inner suburbs


ऑस्ट्रेलियातील सिडनी शहराच्या पूर्व उपनगरात अलीकडे जंगली कोल्ह्यांच्या दर्शनाने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एका खासगी सीसीटीव्हीमध्ये अलीकडेच पॉट्स पॉईंटमधील गल्लीतून फिरणारा लाल कोल्हा टिपला गेला. सिडनीच्या वॉक्लुसमध्ये रहिवासी घरात असताना कोल्ह्याने तीन कोंबड्या आणि दोन सशांची शिकार केली. एवढंच नाही तर, फॉक्स स्कॅन सिडनी आणि मेलबर्नमध्ये ‘फॉक्स रिपोर्ट्स’ या संकेतस्थळावरील डेटा तपासल्यास असे लक्षात येते की, सिडनीमध्ये बेव्ह्यू, केलीव्हिल आणि ब्लेकहर्स्ट यांसारख्या भागात कोल्ह्यांची खूप जास्त संख्या नोंदवली गेली, तर मेलबर्नमध्ये, बिर्ररुंग मार आणि दक्षिण मेलबर्नसारख्या प्रदेशांमध्ये समान ट्रेंड दिसला आहे.

‘व्हिक्टोरियन सरकारी संशोधना’चा अंदाज आहे की, मेलबर्नमध्ये प्रति चौरस किमीमध्ये 16 कोल्हे आहेत. म्हणजेच, प्रति दहा किमीच्या परिघात सुमारे पाच हजार कोल्हे आहेत. 2022 च्या ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, कोल्ह्यांची राष्ट्रीय संख्या 1.7 दशलक्ष इतकी आहे. कोल्हे सिडनी आणि मेलबर्नसह विविध शहरी भागांत आढळून येतात. आता तर हे कोल्हे कुत्र्यांनाही जुमानताना दिसत नाही. तेव्हा, कोल्ह्यांच्या या अनुकूलतेमुळे शहरांमध्ये आणि जंगलांमध्येही समस्या निर्माण होताना दिसतात.

पण, असे असूनही कोल्ह्यांची संख्या खरोखर वाढते आहे की नाही, हे अस्पष्ट आहे. वनस्पती आणि प्राणी अ‍ॅप असलेल्या ’ळछर्रीीींरश्रळीीं’ मधील डेटानुसार 2022 मध्ये 957 लाल कोल्ह्यांच्या नोंदी आढळल्या आहेत आणि 2023 मध्ये ही संख्या 1,158 पर्यंत वाढली आहे. परंतु, तज्ज्ञांच्या मते, कोल्ह्यांची ही संख्या संख्यावाढीची विश्वसनीय मानके नाहीत. वीण हंगामामुळे कोल्ह्यांची हालचाल आणि दृश्यमानता वाढते. लहान कोल्हे विखुरतात, तर प्रौढ कोल्हे अधिक प्रादेशिक बनतात. वाढलेली जागरूकता, सोशल मीडियाचा प्रभाव आणि रिपोर्टिंगमुळे कोल्ह्यांची संख्या वाढल्याचे वाटू शकते. तसेच मर्डोक विद्यापीठातील वन्यजीव पर्यावरणशास्त्रज्ञ शहरी कोल्ह्यांची संख्या खरोखरच वाढत असल्याचे ठामपणे स्थानिक वृत्तवाहिन्यांना सांगतात. कोल्हे शहरी वातावरणात अधिक प्रभावीपणे वावरायला शिकले आहेत, हे लक्षात घेऊन ती त्यांची बुद्धिमत्ता आणि अनुकूलता आहे, हे लक्षात येते.
शहरातील महापालिकेच्या इमारती, गोल्फ कोर्स आणि जलमार्गाजवळील दाट झाडीतदेखील हे कोल्हे दिसून येतात. येथे त्यांना अन्न आणि आश्रय दोन्ही मिळते. सिडनीतील मूळ प्रजातींना कोल्ह्यांचा थेट धोका नसला तरी ते झुडपांतील महत्त्वाचे शिकारी आहेत. मार्टिनच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, कोल्हे हे जंगली मांजरीनंतरचे दुसरे शिकारी आहेत. कोल्हे उंदीर, सरडे, वालबीज, कांगारू, कासव आणि पक्षी यांची शिकार करतात, त्यामुळे काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.आता ऑस्ट्रेलियन मुख्य भूभागाच्या 80 टक्के भागात कोल्ह्यांचे वास्तव्य असल्याने, स्थानिक परिषदांना त्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या कोल्ह्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी फ्युमिगेशन, ट्रॅपिंग, डिटेक्टर डॉग, थर्मल स्कोप आणि बंदूक यासह विविध पद्धती वापरल्या जातात. ‘सेंटर फॉर इनव्हेसिव्ह स्पीसीज सोल्युशन्स’चे गिलियन बस्नेट सुचवतात की, अन्नाचा अपव्यय कमी करून आणि कचर्‍याची सुरक्षितपणे विल्हेवाट लावली जाईल, याची खात्री करून प्रत्येकजण फॉक्स नंबर नियंत्रित करण्यासाठी योगदान देऊ शकतो.

असे हे शहरी कोल्हे भरपूर अन्न शोधतात. प्रभावी व्यवस्थापनासाठी विविध धोरणांची आवश्यकता असते. अन्नधान्यासंदर्भातील कचरा कमी करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वपूर्ण आहे. अन्न कचरा कमी करणे आणि कचरा सुरक्षित करणे, हे कोल्ह्यांचे अन्नस्रोत मर्यादित करण्यास मदत करू शकते. कोल्ह्याच्या दर्शनाचे सार्वजनिक अहवाल त्यांच्या लोकसंख्येचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यात मदत करतात. अधिकारी आणि जनता यांच्यातील सहयोगात्मक प्रयत्न आवश्यक आहेत. हे पर्यावरणीय परिणाम कमी करण्यास आणि ऑस्ट्रेलियाची जैवविविधता राखण्यास मदत करेल.

ऑस्ट्रेलियन शहरांमध्ये कोल्ह्यांच्या वाढत्या संख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिकारी आणि जनतेच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. या प्राण्यांना सामावून घेताना मूळ वन्यजीवांचे संरक्षण करणे, हे एक नाजूक आणि महत्त्वाचे काम आहे.


उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव. रामनारायण रुईया महाविद्यालयातून 'बी. एम. एम.' पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास.