IAS अधिकारी पूजा खेडकर यांची कार जप्त! आईदेखील अडचणीत
15-Jul-2024
Total Views |
पुणे : वादग्रस्त शिकाऊ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. केंद्र सरकारने याप्रकरणाचा तपास एका अधिकाऱ्याकडे सोपवला असून खोटी वस्तुस्थिती मांडल्याच्या आरोपात तथ्य आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
पूजा खेडकर यांनी अपंग आणि ओबीसी असल्याचे सांगत यूपीएससीची परीक्षा दिली होती. त्यानंतर पुण्यात रुजू होण्याच्या आधीच पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मेसेज केला आणि स्वतंत्र केबिन, गाडी आणि निवासस्थानाची मागणी केली. पूजा खेडकर यांनी स्वत:च्या खाजगी ऑडी गाडीला लाल दिवाही लावून मागितला. ती गाडी आता पुणे पोलिसांनी जप्त केली आहे.
दरम्यान, पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा हातात पिस्तुल घेतलेला एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. त्यामुळे परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरचा गैरवापर केल्याप्रकरणी पूजाची आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याशिवाय मनोरमा खेडकर यांच्यावर मुळशीतील जमीन हडप केल्याचा आरोप आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांच्यासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्यासह त्यांचे पालकही चौकशीच्या कक्षेत आले आहेत. तसेच पूजा खेडकर एम्समध्ये वैद्यकीय चाचणीला का आली नाही, याचाही तपास सुरू आहेो त्यामुळे आता पूजा खेडकर चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत.