अमेरिकेला कोण वाचवेल?

    14-Jul-2024   
Total Views |
 Donald Trump
 
अमेरिकेत सध्या जे चालले आहे किंवा घडते आहे, ते सर्वकाही भयावह आणि चिंताजनकच आहे. दुसर्या देशांमध्ये दखल देऊन तेथील सत्ताकारणाला बाहुल्यासारखे खेळवणारा अमेरिका, स्वतःच एक खेळणे होऊन बसला आहे का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर, तर याची आणखी खात्री पटायला सुरुवात झाली आहे. दुसर्याला नामोहरम करण्याच्या सवयीमुळे अमेरिका आतून पोखरत चालली असल्याचे सध्याच्या घटनांवरून स्पष्ट होत आहे. यापूर्वी महासत्ता ओळखली जाणारी ही तीच अमेरिका आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
 
अमेरिकेत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याने, जगभरात एकच खळबळ उडाली आहे. पेन्सिल्व्हेनिया येथे प्रचार रॅलीला संबोधित करत असताना, त्यांच्यावर अज्ञात हल्लोखोराने गोळीबार केला. यात एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला स्पर्शून गेली. त्यानंतर ट्रम्प यांना सिक्रेट सर्व्हिसेसच्या सुरक्षारक्षकांनी घेराव घालत, सुरक्षितरित्या घटनास्थळावरून बाहेर काढले. याचदरम्यान, हल्लेखोराला जागीच ठार करण्यात आले.
 
गोळीबारात एका समर्थकाचाही मृत्यू झाला, तर दोनजण जखमी झाले. या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प जखमी झाले असून, त्यांच्या कानातून बाहेर पडणारे रक्त त्यांच्या चेहर्यावर दिसत होते. अशा स्थितीतही त्यांनी न घाबरता आपली मुठ, वर करून लोकांना ‘फाईट फाईट’ असे म्हणत लढत राहाण्याचे संकेत दिले. यानंतर ट्रम्प यांनी ट्विट करून “देवा अमेरिकेला वाचव” असे म्हटले आहे. या घटनेनंतर त्यांच्यावतीने निवेदन जारी करण्यात आले.
 
“मी यूएस सीक्रेट सर्व्हिस आणि सर्व कायदा अंमलबजावणी संस्थांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी बटलर, पेन्सिल्व्हेनिया येथे झालेल्या गोळीबाराला त्वरित प्रत्युत्तर दिले. रॅलीत मरण पावलेल्यांच्या कुटुंबाप्रती आणि जखमी झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाप्रती मी शोक व्यक्त करतो. अमेरिकेत असे काही घडू शकते, यावर विश्वास बसत नाही,” असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरने फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत, अमेरिकेला वाचवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प कधीही लढणे थांबवणार नसल्याचे म्हटले आहे. सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनीही ट्रम्प सुरक्षित असल्याचा आनंद असल्याचे सांगत, घटनेचा निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही “राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही,” असे ट्विट करत घटनेचा तीव्र निषेध केला.
 
दरम्यान, सध्या अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचे वारे वाहात आहेत. येत्या नोव्हेंबरमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीत, डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार तथा वर्तमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासमोर, रिपब्लिकन पक्षाकडून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कडवे आव्हान असणार आहे. सध्या अमेरिकेत प्रचारदेखील शिगेला पोहोचला असून, दोन्ही उमेदवारांकडून प्रचारसभा घेतल्या जात आहेत. मात्र, आता ट्रम्प यांच्यावर भर प्रचारसभेतच गोळीबार झाल्याने, अमेरिकेतील लोकशाही आणि कायदा-सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे, डोनाल्ड ट्रम्प यांना दुखापत गोळ्यांनी नाही, तर काचेच्या तुकड्यांनी झाल्याचेही सोशल मीडियावर म्हटले जात आहे. अधिक तपासानंतर सर्व काही स्पष्ट होईलच. मात्र, अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या माजी राष्ट्राध्यक्षांवर हल्ला झाल्याने, हा प्रचारातील महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.
 
सध्या बायडन यांच्याविरोधात वातावरण असल्याचे बोलले जात आहे. त्यात आता ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराने, बायडन विजयापासून दूर जाण्याची शक्यता आहे. मुळात बायडन यांनीही पडद्यामागून ट्रम्प यांना, वैयक्तिक प्रकरणांमध्ये गुंतवून त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जाते. त्यामुळे ट्रम्प यांना उमेदवारी मिळते की नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. बायडन वयोवृद्ध असून, त्यांचा विसरभोळेपणा वाढत चालल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. कारण, नुकतेच एका पत्रकार परिषदेत बायडन यांनी कमला हॅरिस यांना ’उपाध्यक्ष ट्रम्प’ असे संबोधले. तसेच, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना ’राष्ट्रपती पुतीन’ असे संबोधले. त्यामुळे ट्रम्प यांच्यासमोर बायडन किती तग धरू शकतात व अमेरिकेला नेमके कोण वाचवेल, हे येत्या काही महिन्यांत समजेलच...
 
७०५८५८९७६७

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.