नवी मुंबई, दि.१३: प्रतिनिधी ‘नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या विमानतळाचा पहिला टप्पा मार्च २०२५ पर्यंत प्रवाशांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना या विमानतळाच्या पाहणीदरम्यान दिली.
नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अधिकाऱ्यांकडून विमानतळाच्या निर्माण कार्याचा आढावा घेतला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचीही उपस्थिती होती. यावेळी या संपूर्ण प्रकल्पाच्या प्रतिकृती आणि सादरीकरणाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली. त्यानंतर सर्वांना या प्रकल्पातील पूर्णत्वाकडे चाललेल्या पहिल्या टप्प्यातील टर्मिनलची पहाणी केली.
आढावा घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधत सविस्तर माहिती दिली. मोहोळ म्हणाले, ‘नवी मुंबई विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास दरवर्षी 9 कोटी प्रवाशांना ये-जा करता येईल. यातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यावर या टर्मिनलवरून वर्षाला 2 कोटी प्रवासी ये-जा करू शकतील. इतकी प्रचंड क्षमतेचा जागतिक दर्जाचा हा विमानतळ संपूर्ण परिसराचा चेहरा-मोहरा बदलवून टाकणारा आहे.
‘नवी मुंबईचे हे विमानतळ भारतातीत अग्रणी मल्टीमॉडल ऍव्हिएशन हब म्हणून विकसित होत आहे. या विमातळामुळे मुंबईसह कल्याण, ठाणे, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आकाराला येत असलेल्या गतीशक्ती मिशनचे हा विमानतळ सर्वात चांगले उदाहरण आहे. या विमानतळावरून मुंबई पुणे एक्सप्रेस वे, महामार्ग, रेल्वे, उपनगरीय रेल्वे, मेट्रो आणि सागरी मार्ग, अशी सर्वप्रकारची कनेक्टिव्हीटी प्रवाशांना मिळणार आहे,’ असेही मोहोळ म्हणाले. नागरी उड्डाण विभागाचे सचिव वलनम, सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल, विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीव कुमार, नवीमुंबई आंतरराष्ठ्रीय विमानतळाचे अधिकारी, नागरी उड्डाण मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.