सराफा व्यवसाय सांभाळत असताना निर्माण झालेली देव-देवतांच्या पुरातन मूर्त्याजतनाची आवड आजही जोपासणार्या नाशिकच्या संजय भास्कर विसपुते यांच्याविषयी.....
जिल्ह्यातील चाळीसगाव येथे १९६४ साली संजय भास्कर विसपुते यांचा जन्म झाला. वडील कृषी विभागात नोकरीला, तर आई गृहिणी. आईला हस्तकलेची प्रचंड आवड होती. पारोळा तालुक्यातील बहादरपूर हे संजय यांचे मूळ गाव. कुलाबा, धुळे, बहादरपूर अशा अनेक ठिकाणी वडिलांच्या बदल्या होत असल्यामुळे इयत्ता सहावीपर्यंत संजय यांना शाळाही बदलाव्या लागल्या. इयत्ता सातवीत असताना वडिलांची बदली झाली आणि तिथेच गंगाराम सखाराम हायस्कूलमधून त्यांनी इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
वडील भले शासकीय नोकरीला होते, परंतु परंपरागत सराफा व्यवसायही जोडीला होताच. गडकिल्ले, वस्तुसंग्रहालय पाहाण्याची संजय यांना विशेष आवड होती. शालेय वयात असताना मिळालेली सुंदर नाणी ते जतन करू लागले. पुढे वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला. संजय यांनी स्वतः सराफा व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. अनेकजण आपल्याकडील असलेल्या पुरातन वस्तू, मूर्ती, नाणी घेऊन येत असत. मात्र, ज्या गोष्टी आवडल्या त्या वितळवून नष्ट न करता त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय संजय यांनी केला. १९८२ सालापासून संजय ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चे काम करू लागले.
हिंदीचीही आवड त्यांना निर्माण झाली. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी हिंदीचे धडेही दिले. विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये संजय सक्रिय झाले. लालकृष्ण अडवाणींच्या राम मंदिर रथयात्रेवेळी त्यांच्याकडे अंमळनेरची जबाबदारी होती. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी पूर्ण वेळ सराफा व्यवसायाला देण्याचे ठरवले. अंमळनेरमध्ये संजय यांना ‘अंगठी आणि ब्रेसलेट स्पेशालिस्ट’ म्हणून ओळखले जायचे.
जुन्या चांदीच्या वस्तू, नाणी अशा गोष्टी त्यांच्याकडे विक्रीसाठी आल्या, तर त्यातील चांगल्या वस्तू ते ठेवून घेत. कपड्याच्या, लाकडाच्या वस्तूही ते जतन करू लागले. तांबे, पितळ, लोखंडाच्या किंवा मिश्र धातूंच्या भग्न मूर्त्या लोक नदीत किंवा मंदिरात सोडून देतात. अशा मूर्त्या कलात्मक आणि प्राचीन असल्याने त्याचे जतन करण्यास सुरुवात झाली. यामध्ये मुख्यत्वे गणपती, महादेव, विठ्ठल, विष्णु, बाळकृष्णाच्या विविध छटांमधील मूर्त्यांचा समावेश होता.
व्यासमुनींची दुर्मीळ मूर्तीही त्यांच्याकडे आहे. प्रत्येक देव-देवतेच्या वेगवेगळ्या भावमुद्रा आहेत. त्यांचा अभ्यास करण्यासाठी अशा मूर्त्यांची मदत होते. संस्कृतीचे ज्ञान लोकांना मिळावे, त्यातून त्यांनी प्रेरणा घेऊन त्यांनीही अशा कलाकृतींचे जतन करावे, या हेतूने संजय यांनी ही आवड जोपासली आहे. अशा गोष्टींचे जतन करून त्या लोकांसमोर मांडणे महत्त्वाचे आहे. त्यासाठीच त्यांनी अशा मूर्त्यांचा संग्रह सुरू केला. सोन्या-चांदीबाबत मोठे बंधू, रत्नशास्त्रातील माहिती मामांकडून मिळाली, तर पुरातन वस्तू संग्रहाची आवड आईकडून निर्माण झाली. आजही मूर्त्या बनतात, मात्र त्या कितपत शास्त्रोक्त पद्धतीने बनविलेल्या असतील, हे सांगता येत नाही.
विविध आकाराचे भांडे, समई, दिवे, धातूचे प्राणी, अडकित्ते, चुन्याच्या डब्या, पंचायतन अशा अनेक दुर्मीळ वस्तू त्यांच्याकडे संग्रही आहे. १२व्या शतकातील दुर्मीळ ताम्रपटसुद्धा त्यांच्याकडे आहे. सध्या संजय यांच्याकडे एक ताम्रपट, विविध देवदेवतांच्या २०० पेक्षा अधिक मूर्त्या, ३० पेक्षा अधिक नंदी, दोन भगवान महावीरांच्या मूर्त्या, दोन इंचापासून दीड फूटापर्यंतचे ७० ते ८० अडकित्ते, पानाचे १५ ते २० डबे, चुन्याच्या ३० ते ४० डब्या, ३० ते ४० प्राणी, दिवे, समया ५० ते ६०, विविध प्रकारचे कलश, १५ ते २० तलवारी, खंजीर २० ते २५, हत्तीचे अंकुश, गुप्ती संग्रही आहेत. ३००च्या आसपास छत्रपती शिवरायांची नाणीसुद्धा आहेत. आतापर्यंत संजय यांनी सहा ते सात प्रदर्शने भरविली आहेत. सध्या संजय नाशिकला स्थायिक असून येथेही ते रा. स्व. संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत. सगळ्या संग्रही वस्तू ठेवायला घरात जागादेखील नाही. भविष्यात या सर्व वस्तू योग्यपणे संग्रही ठेवाव्या, जेणेकरून इच्छुकांना त्यावर अभ्यास करता येईल, असा संजय यांचा मानस आहे.
“आजूबाजूच्या परिसरात कोणालाही देव्हार्यातील मूर्ती खंडित करायची असेल, तर आता ते मला आणून देतात. जुन्या मूर्त्यांचा शास्त्रोक्त अभ्यास करून नव्या मूर्त्या बनविल्या पाहिजे. ज्या वस्तूत कलात्मकता दिसली, ती मी जतन करतो. छंदातून स्वतःही मोठे व्हा आणि इतरांनाही करा. छंद जोपासले तर नक्कीच सकारात्मक परिणाम होणार. एखादी मूर्ती किंवा वस्तू आवडली, तर ती वेळ पडल्यास पैसे देऊन विकत घ्यावी लागते. तरुण पिढीने या पुरातन वारशाकडे लक्ष दिले, तर त्यांना त्यातून खूप ज्ञान मिळवता येईल. पुरातन काळातील तंत्र अभ्यासण्यासाठी जुन्या वस्तूंची आवश्यकता आहे. नव्या पिढीला धर्माचे आणि शास्त्राचे ज्ञान दिले जात नसल्याने ते या प्रवाहापासून दूर आहे. प्रत्येकाने एकतरी छंद जोपासा, ज्यामुळे आत्मिक समाधान लाभेल,” असे संजय सांगतात. पुरातन वस्तूंचा संग्रह करून नव्या पिढीसमोर आदर्श ठेवणार्या संजय विसपुते यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
७०५८५८९७६७