'इस्लाम खतरे में हैं’ हे वाक्य आपण भारतीयांनी न जाणो किती वेळा ऐकले असेल. पण, आता पुन्हा ‘इस्लाम खतरे में हैं’ असे काही ‘इस्लामिक स्कॉलर’ म्हणत आहेत. त्यांच्या मते, आता इस्लाम ‘क्रिकेटमुळे खतरे मे हैं.’ त्यांच्या मते, क्रिकेट हे इस्लामविरोधातले बौद्धिक युद्ध असून पाश्चिमात्य देशांनी हे युद्ध सुरू केले आहे. यावर आपण काय म्हणणार म्हणा!
‘इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत’ या दहशतवादी संघटनेच्या ‘अल अजिम’ या माध्यमाने जाहीर केले की, क्रिकेट हा खेळ नसून पाश्चिमात्यांनी इस्लामविरोधात सुरू केलेले बौद्धिक युद्ध आहे. त्यांचे म्हणणे आहे की, भाषा, प्रांत, संस्कृती आणि देश या व्यतिरिक्त मुसलमान आहोत म्हणून भाऊ आहोत, ही दृढ संकल्पना इस्लाममध्ये आहे. मात्र, या संकल्पनेशिवायही मुस्लीम देशातील लोकांमध्येही क्रिकेटमुळे एकता वाढते आहे. क्रिकेट खेळताना समोरच्या देशाचा संघ पराजित व्हावा, या भावनेतून देशातील नागरिकांमध्ये संघभावना, देशभावना वाढते. देशभक्ती, राष्ट्रवाद वाढतो. त्यामुळे ‘केवळ मुस्लीम म्हणूनच एक आहोत’ या इस्लामच्या संकल्पनेला छेद द्यायचा प्रयत्न होत आहे. ‘इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत’ या दहशतवादी संघटनेचे हे म्हणणे काहीअंशी खरेच आहे म्हणा!
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही क्रिकेटप्रेमी देशांचे उदाहरण घेऊ. दोन्ही कट्टर इस्लामिक आणि सुन्नी मुस्लीमबहुल लोकसंख्या असलेले देश. शरीया कायदा आणि कुराण दोघांसाठीही सर्वोच्च. मात्र, सगळ्या जगाने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या क्रिकेटप्रेमींची भर स्टेडियममधली हाणामारी पाहिली. दोन्ही देशांतील नागरिकांनी समोरचा मुस्लीम असूनही त्याच्याविरोधात त्यांच्या त्यांच्या देशाच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. ‘मुस्लीम आहोत आपल्यात कोणतीच स्पर्धा किंवा वैरभाव नको. आपण इस्लामने बांधलेले बंधू आहोत,’ असे या दोन्ही देशांच्या नागरिकांना वाटले नाही. क्रिकेटमुळे इस्लामिक जनतेत ही अशी फूट पडली, असे तथाकथित ‘इस्लामिक स्कॉलर्स’चे म्हणणे आहे.
क्रिकेट हे इस्लामविरोधातले हत्यार कसे, हे सांगताना ‘अल अजिम’ या माध्यमाने पुढे म्हटले की, पाकिस्तानमध्ये क्रिकेट हे हत्यार पाश्चिमात्य देशांनी वापरले. तिथे क्रिकेटच्या माध्यमातून इमरान खान हा क्रिक्रेटपटू प्रसिद्धीच्या झोतात आला. लोकप्रिय झाला. इमरान लोकप्रिय झाल्यानंतर राजकारणात सक्रिय झाला आणि पाकिस्तानचा पंतप्रधानही झाला. पंतप्रधान झाल्यावर पुढे पाकिस्तान राजकीयदृष्ट्या अस्थिर झाला. आर्थिक तंगीही वाढली. क्रिकेटच्या माध्यमातून इमरानला लोकप्रिय बनवून सत्तेत आणून पाकिस्तानसारख्या मुस्लीम देशाला अस्थिर करण्याचे कटकारस्थान पाश्चिमात्य देशांनी रचले. क्रिकेट हे पाश्चिमात्यांचे हत्यार आहे, हे सांगताना पाकिस्तान आणि इमरान खान वगैरेंचे जे उदाहरण या ‘इस्लामिक स्कॉलर्स’नी दिले.
पण, यात काही तथ्य असेल का? खरेच ‘इस्लामिक ब्रदरहूड’ शक्तिशाली संकल्पना अस्तित्वात आहे का? की केवळ 57 इस्लामिक देशांच्या आंतरराष्ट्रीय राजकारणापुरती ही संकल्पना जीवंत आहे? आज जगभरातील मुस्लीम देशांतर्गत संघर्षाने होरपळले तरी आहेत किंवा दहशतवादाने त्रस्त तरी आहेत. इराण-इराक संघर्ष असू दे की, आफ्रिका खंडातले मुस्लीम देश असू देत, मुस्लीम राष्ट्रांमध्ये आपसातच शीतयुद्ध सुरू आहे इतकेच काय? मुस्लिमांचे एक वेगळे राष्ट्र हवे, असे म्हणत भारतापासून वेगळ्या झालेल्या पाकिस्तानचे पुढे काय झाले? तर, ‘इस्लामिक ब्रदरहूड’ऐवजी ‘कल्चरल ब्रदरहूड’ मानत बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा झाला. आता तर याच सांस्कृतिक ऐकतेतून पाकिस्तानचे चार तुकडे होण्याच्या मार्गावर आहेत.
दुसरीकडे क्रिकेटच्या माध्यमातून खूप संघशक्ती वगैरे वगैरे वाढते, असे म्हणावे तर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना सुरू असताना, आपल्या भारतातील अनेक मुस्लीम वस्त्यांमध्ये (सन्माननीय अपावादही अनेक आहेतच!) काय परिस्थिती असते? याचा अनुभव सगळे जण घेतच असतात. थोडक्यात, क्रिकेटमुळे देशभावना वाढते आणि ‘इस्लाम खतरे मे’ येतो वगैरे हे म्हणणे सत्य नाहीच! ‘संविधान खतरे मे हैं’, ‘भारताची लोकशाही खतरे मे हैं’ सारखे नारे जितके तथ्यहीन, तितकेच ‘क्रिकेटमुळे इस्लाम खतरे मे हैं’ म्हणणे तथ्यहीन. पण, गैरमुस्लीम नकोत, महिलांना शिक्षण नको, संगीत नको, नृत्य नको, सिनेमा नको वगैरे म्हणत म्हणत आता क्रिकेटही नको म्हणणारे म्हणत आहेत, ‘इस्लाम खतरे मे हैं...’ यावर आपण काय म्हणणार?
9594969638