वैज्ञानिक दृष्टिकोन देणारा ‘साय भाय’

    10-Jul-2024   
Total Views |
ninad amol gosavi


समाजमाध्यमांवर ‘साय भाय’ बनून समाजाला वन्यजीवविषयक शास्त्रीय ज्ञानाची लस देणार्‍या निनाद अमोल गोसावी या अवलियाविषयी..

सरीसृप किंवा उभयचर म्हटले की, काहींना हे जीव पाहून अंगावर शिसारी येते, तर काहींना ते किळसवाणे वाटतात. मात्र, जगात अशीही काही माणसं आहेत, की ज्यांना या जीवांप्रति झपाटलेपण आहे. सांगलीतील अशाच एका होतकरू तरुणाने बेडकांचा आवाज टिपून त्यांच्यावर संशोधन करण्याचा विडा उचलला आहे. वन्यजीवांच्या आवाजशास्त्राकडे या मुलाचा कल असून, चाकोरीबाहेरचे काम करण्याचा तो प्रयत्न करतोय. सोबतच समाजमाध्यमांवर ’साय भाय’ बननू लोकांना विज्ञान प्रबोधनाचे धडेदेखील देतो. वन्यजीव संशोधन आणि प्रबोधनामधल्या कुवार रानवाटावर चोखंदळपणे प्रवास करणारा हा मुलगा म्हणजे निनाद अमोल गोसावी.

निनादचा जन्म 19 ऑगस्ट, 1993 रोजी सांगलीत झाला. शालेय जीवनातच त्याला वन्यजीवांची गोडी लावली ती सांगलीतील एका संस्थेने. त्यापूर्वी निनादच्या मनी विज्ञानदृष्टीची रुजवण त्याच्या आजीने केली. पेशाने मुख्याध्यापिका असणार्‍या त्याच्या आजीने वैज्ञानिक दृष्टिकोन देणार्‍या पुस्तकांचा खजिना निनादला दिला. ही पुस्तकं वाचूनच विज्ञानाची आवड त्यांच्या मनी रुंजी घालू लागली. या आवडीला खतपाणी घालण्याचे काम केले ते ’बर्ड साँग एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च’ या संस्थेने. सांगलीतील या संस्थेच्या उन्हाळी निसर्ग शिबिरांमध्ये निनाद सहभागी होऊ लागला. संस्थेचे आणि शिबिराचे प्रमुख शरद आपटे यांनी त्याच्यासमोर वन्यजीव निरीक्षणाचे विश्व खुले केले. पक्षिनिरीक्षणाच्या माध्यमातून निनादची वन्यजीवांची ओळख झाली. इयत्ता दहावीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत या आवडीला एक दिशा मिळाली. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणही त्याच दृष्टीने सुरू झाले. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षणात वर्षभराचा खंड पडला. मात्र, या खंडामुळेच निनादच्या वन्यजीवांप्रतिच्या आवडीला शास्त्राची जोड मिळाली.

शिक्षणात पडलेल्या या खंडाचा निनादने सदुपयोग करुन घेतला. आपटेंसोबत सांगली आणि आसपासच्या भागातील गवाताळ प्रदेश आणि जंगलं पालथी घालून पक्षिनिरीक्षण केले. मात्र, यावेळी या पक्षिनिरीक्षणाला जोड होती, ती म्हणजे ध्वनिमुद्रणाची. आपटेंमुळेच निनादला पक्ष्यांचे आवाज ध्वनिमुद्रित करण्याचा नाद लागला. पक्ष्यांचे आवाज कसे ओळखावे आणि ते कशा पद्धतीने ध्वनिमुद्रित करावे, ही कला त्याने अवगत केली. वर्षभरानंतर त्याचे विज्ञान विषयात पदवीचे शिक्षण सुरू झाले. आता त्याला नाद लागला तो बेडकांचा. पावसाळ्यात रात्री सांगलीच्या आसपास बेडकांचा शोध घेण्याचा प्रवास सुरू झाला. या प्रवासाला बेडकांविषयीच्या अज्ञानाची जोड होती. मग पुस्तक आणि शास्त्रीय निबंध वाचून या अज्ञानावरील उतारा सुरू झाला. यातून बेडकांच्या आवाजांविषयीचा अभ्यास अपुरा असल्याचे उमगले. ध्वनिमुद्रणाची कला अवगत होतीच, म्हणूनच निनादने बेडकांचे आवाज शास्त्रीय दृष्टिकोनातून टिपण्यास सुरुवात केली. यातूनच बेडूक आणि एकंदरित वन्यजीवांच्या ‘इकोलॉजी’च्या अभ्यासाविषयीची गरज त्याच्या लक्षात आली. मग त्याने आपले पदव्युत्तर पदवीचे शिक्षण प्राणीशास्त्र विषयात पूर्ण केले.

पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणानंतर निनादने प्रत्यक्षात संशोधनात्मक कामाला सुरुवात केली. निखिल गायतोंडे यांच्या शोधाकार्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आंबोलीतील ’कॅसलरॉक नाईट फ्रॉग’ या बेडकाच्या प्रजातीवर संशोधन केले. यावेळी त्याला संशोधनाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी तांत्रिक माहिती कशी गोळा करावी, तिचे कशा पद्धतीने संकलन करावे, याविषयीचे ज्ञान मिळाले. पुढे आंबोलीतच सापडणार्‍या ’डान्सिंग फ्रॉग’ या प्रदेशनिष्ठ बेडकावर त्याने संशोधन केले. निनादने या बेडकांची संख्या आणि त्याच्या ’फूट फ्लॅगिंग’ या पाय उडवण्याच्या अनोख्या वर्तनाचा अभ्यास केला. या अभ्यासातून त्यांच्या लक्षात आले की, ’नॉर्दन डान्सिंग फ्रॉग’कडून केले जाणारे ’फूट फ्लॅगिंग’चे हे वर्तन केवळ मादीला रिझवण्यासाठी नसून ते दुसर्‍या नराला आपल्या हद्दीची जाणीव करुन देण्यासाठी आहे. निनादने निखिल मोडक यांच्या सहकार्याने गोव्यातील नेत्रावलीच्या जंगलातून बेडकाच्या नव्या प्रजातीचादेखील शोध लावला. या प्रजातीचे नाव ’नेत्रावली लिपिंग फ्रॉग’, असे आहे. ’नेचर कॉन्झर्वेशन फाऊंडेशन’सोबत कोकणातील उभयचर आणि सरीसृपांवर काम करण्याचा अनुभव निनादला आहे.

सध्या निनाद आपला खासगी व्यवसाय सांभाळत वन्यजीव संशोधन आणि विज्ञान प्रबोधन, अशा दोन्ही क्षेत्रात कार्यरत आहे. कृष्णमेघ कुंटे यांनी सुरू केलेल्या ‘एम्फीबियन्स ऑफ इंडिया’ या संकेतस्थळाचा अभिरक्षक (क्युरेटर) म्हणून निनाद काम करत आहे. सोबतच डॉ. ओमकार यादव यांच्यासमवेत सांगलीतील बेडकांच्या आवाजांची नोंद करुन त्यांच्या आवाज देण्याच्या विविध पद्धतींचे अवलोकनही तो करत आहे. महत्त्वाचे म्हणजे, सध्या तो ’पीएचडी’साठीचे संशोधन करत आहे. कोकणात झाडांवर राहणारे साप आणि सरड्यांच्या अधिवासावर काजू, रबर, आंबा या बागायतींचा कशा पद्धतीने परिणाम पडत आहे, यावर त्याचे संशोधन सुरू आहे. निनाद समाजमाध्यमांवर ’साय भाय’ नावाने वन्यजीवांचे विज्ञान समजवणारे रिल्स तयार करत आहे. भविष्यात वन्यजीवांच्या आवाजशास्त्रामध्येच काम करण्याची इच्छा असणार्‍या बहुगुणी निनादला पुढील वाटचालीकरिता दै. ’मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!


अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.