आत्मवस्तू, ब्रह्मवस्तू समजण्यासाठी कितीही ग्रंथांचे वाचन केले अथवा विद्वानांची तार्किक भाषणे ऐकली तरी ते पुस्तकीज्ञान आणि श्रवणचातुर्य याद्वारे ‘ब्रह्मज्ञान’ प्राप्त होणार नाही. कारण उघड आहे. आत्मज्ञान हा पुस्तकीज्ञानाचा अथवा श्रवणज्ञानाचा विषय आहे. मात्र, हेही नाकारता येणार नाही की सद्ग्रंथवाचन, विद्वानांची भाषणे यातून आत्मज्ञान अनुभूतीसाठी आत्मज्ञानी पुरुषाला शरण गेले पाहिजे. त्याची सेवा करून, त्याच्यासाठी कष्ट करून आत्मानुभूतीची गुरुकिल्ली जाणून घेता येते. परमार्थात आत्मज्ञानी पुरुषाच्या सहवासात महत्त्व आहे.
आज परमार्थविषयक अध्यात्मज्ञान अभ्यासाची अनेक साधने उपलब्ध आहेत. संतांनी या विषयी खूप लिहून ठेवले आहे. अनेक विचारवंत, लेखक, ग्रंथकार, प्रवचनकार, कीर्तनकार त्यांना गवसलेले आध्यात्मिक सत्य जगापुढे मांडत आले आहेत. आनंदमय आत्मवस्तू किंवा चैतन्यमय ब्रह्मवस्तू हेच आपले खरे स्वरूप असून ते नित्यप्राप्त आहे. तरीही, लोक आत्मज्ञानाबाबतीत आहे तिथेच आहेत, असे निरीक्षण नोंदवून स्वामींनी श्लोक क्रमांक 137 पासून माणसाच्या ठिकाणी ‘मी पणा’चा अहंकार असल्याने ते पुरातन ज्ञान त्याला समजत नाही, म्हणजेच त्याचे रहस्य जाणून घेता येत नाही. असे सांगायला सुरुवात केली आहे. ते ‘जुने ठेवणे’ असलेले आत्मज्ञान न मिळण्यामागील जी कारणे स्वामींनी सांगितली आहेत, त्यात मीपणाचा गर्व हे महत्त्वाचे आहे.
ज्ञानार्जनात येणारा दुसरा अत्यंत महत्त्वाचा अडथळा ‘देहबुद्धीचा’ असल्याचे स्वामींनी सांगितले आहे. मानवी जीवनात देहबुद्धीचा निश्चय इतका पक्का असतो की, तो ओलांडून जाणे कठीण असते. तिसरा अडथळा म्हणजे, सामान्य माणूस अमरत्व, चैतन्य, आनंद हे आत्म्याचे सारे गुण नाशवंत देहाला चिकटवतो व देहच सत्य आहे असे समजतो. समर्थांनी त्याला ‘भ्रम’ म्हटले आहे. भ्रम म्हणजे जी वस्तू जशी मुळात नाही तशी ती कल्पून तेच सत्य आहे, असे जगाला सांगत सुटणे. देहासंबंधीच्या या भ्रमामुळे ज्ञान संपादनात अडथळा येतो. यापुढील अडथळा सांगताना समर्थ म्हणतात की, काही माणसे कपाळकरंटी असतात. त्यांना विश्वात ठासून भरलेले चैतन्य अनुभवास येत नाही. या अभाग्यांना निसर्गातील चैतन्य न दिसता सगळीकडे पाषाणच दिसतात. आत्मज्ञान प्राप्त न होण्याचे आणखी एक कारण म्हणजे जीव सत्त्व, रज, तम या त्रिगुणांत गुरफटला आहे. त्यातून सुटता न आल्याने माणसाची वृत्ती गुणातीत होऊ शकत नाही. त्यामुळे या पुरातन ज्ञानापासून जीव वंचित राहतो.
वरील सर्व कारणांचा साकल्याने विचार केला तर आत्मज्ञान मिळवणे किती कठीण आहे याची कल्पना येते. मीपणा, गर्व, ताठा, अहंकार, देहबुद्धी, भ्रम, त्रिगुणांचे वर्चस्व हे सर्व अडथळे पार करून आत्मज्ञान मिळवण्यासाठी काही उपाय आहे काय? यावर आता स्वामी पुढील श्लोकात आपले विचार मांडत आहेत. या श्लोकाने, ’जुने ठेवणे मीपणे आकळेना’ ही शेवटची ओळ असलेला श्लोकगट येथे पूर्ण होत आहे. ज्ञानार्जनावर उपाय सांगताना समर्थ म्हणतात-
म्हणे दास सायास त्याचे करावे।
जनीं जाणता पाय त्याचे धरावे।
गुरूअंजनेवीण तें आकळेना।
जुनें ठेवणें मीपणें ते कळेना॥141॥
स्वामींनी या श्लोकात शेवटच्या ओळीत छोटा बदल केला आहे. यापूर्वीच्या श्लोकांतून ‘मीपणें आकळेना’ असे आहे, पण प्रस्तुत श्लोकात ‘मीपणें तें कळेना’ अशी रचना स्वामींनी केली आहे. कारण, या श्लोकाच्या तिसर्या ओळीत ‘तें आकळेना’ अशी उचित शब्दयोजना केल्याने हा फरक करावा लागला.
यापूर्वी आपण पाहिले की, आत्मवस्तू, ब्रह्मवस्तू समजण्यासाठी कितीही ग्रंथांचे वाचन केले अथवा विद्वानांची तार्किक भाषणे ऐकली तरी ते पुस्तकीज्ञान आणि श्रवणचातुर्य याद्वारे ‘ब्रह्मज्ञान’ प्राप्त होणार नाही. कारण उघड आहे. आत्मज्ञान हा पुस्तकीज्ञानाचा अथवा श्रवणज्ञानाचा विषय आहे. मात्र, हेही नाकारता येणार नाही की सद्ग्रंथवाचन, विद्वानांची भाषणे यातून आत्मज्ञान अनुभूतीसाठी आत्मज्ञानी पुरुषाला शरण गेले पाहिजे. त्याची सेवा करून, त्याच्यासाठी कष्ट करून आत्मानुभूतीची गुरुकिल्ली जाणून घेता येते. परमार्थात आत्मज्ञानी पुरुषाच्या सहवासात महत्त्व आहे. त्या आत्मज्ञानी पुरुषाला मोठ्या कष्टाने शोधून काढावे, त्याचे पाय धरावे, त्याला शरण जावे. शिष्याने निर्मळ मनाने, विरक्तमनाने, निष्ठापूर्वक, सद्गुरूवर पूर्ण विश्वास ठेवावा, असे स्वामींनी दासबोधात म्हटले आहे.
मुख्य सच्छिण्याचे लक्षण।
सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण।
अनन्यभावे शरण।
त्या नाव सच्छिष्य॥(5.3.19)
समर्थ अशा आत्मज्ञानी सद्गुरुला ‘जाणता‘ असे संबोधतात. जाणत्या पुरुषाकडून ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवल्यास ज्ञान सहजपणे प्राप्त होते. त्या जाणत्याने आत्मज्ञानाची अनुभूती घेतली असल्याने ज्ञानप्राप्तीसाठी बारीकसारीक प्रश्नांची उत्तम जाण त्याला असते. त्यामुळे असा गुरू आपल्या शिष्याला संशयाच्या जाळ्यातून बाहेर काढतो, त्याला अतींद्रिय आत्मज्ञानाची अनुभूती मिळवून देतो.
सर्वसाधारणपणे रोजच्या व्यवहारी जगात आपल्यापेक्षा ज्ञानी माणसाकडून आपण काही गोष्टी शिकून घेत असतो. एखाद्या भौतिक विद्येत अथवा कलेत प्रावीण्य मिळवायचे असेल, तर त्यात तज्ज्ञ असलेल्या व्यक्तीकडून ते शिकून घ्यावे लागते. चित्रकला, गायनकला, संगीत, वाद्यवादन हे त्यातील अनुभवी व्यक्तींकडून शिकावे लागते. संगीत, तालज्ञान, तबला प्रथम श्रवणसौख्य देते, एवढे माहीत असते. नंतर, पुढे त्यात प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तीकडून बारकावे समजून रागदारीचे ज्ञान मिळत जाते. सूक्ष्म फरक जाणल्याने रागदारीतील दादरा, कल्याण, भूप, धनाश्री, भैरवी वगैरे रागांची ओळख होऊन सवयीने त्यात पारंगतता मिळवता येते. विज्ञान संशोधनातही संशोधनातील जाणत्याकडून, सूक्ष्मदृष्टीने शिकून घ्यावी लागते. अभ्यासकांनी ते रहस्ये महत्प्रयासाने शोधून काढलेली असतात. ती रहस्ये शब्दांत मांडता येत नाहीत, म्हणून ती प्रत्यक्षात शिकावी लागतात. हे जसे व्यवहारात घडते, ते पारमार्थिक ज्ञानाबाबत घडते.
भौतिक ज्ञानापेक्षा आत्मज्ञान अतिसूक्ष्म व अतींद्रिय असल्याने त्यासाठी ज्ञात्याची म्हणजेच ‘जाणत्याची’ आवश्यकता निश्चितच असते. यासाठी स्वामींनी या श्लोकात एक दृष्टान्त देऊन ते स्पष्ट केले आहे. पूर्वी असुरक्षिततेच्या कारणांनी लोक धन जमिनीत पुरून अथवा भिंतीत गाडून ठेवत. धन जवळ असूनही ते कोणाला दिसत नसे. पण, दिव्यअंजन डोळ्यांत घातलेल्या व्यक्तीला मात्र ते गुप्त धन दिसते. त्याचप्रमाणे आत्मज्ञान प्रत्येकाच्या ठिकाणी गुप्तपणे नित्यप्राप्त असूनही गुरुअंजनाशिवाय ते शिष्याला दिसत नाही. प्राप्त होत नाही. यासाठी जाणत्याला शरण जाऊन त्याच्यासाठी कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी महत्प्रयासाने गुरू तुकाराम चैतन्य यांचा शोध घेतला.
गुरुंनी शिष्याची परीक्षा पाहण्यासाठी शिष्याला अतोनात कष्ट दिले. पण, ते गोंदवलेकर महाराजांनी बालवय असूनही सहन केले. गुरु माझी देहबुद्धी घालवण्यासाठी ते कष्ट शरीराला देत आहेत, हे महाराजांनी जाणले होते. अखेरीस गुरू तुकाराम चैतन्यांनी महाराजांना ब्रह्मसाक्षात्कार घडवून आणून अतींद्रिय ज्ञानाची प्रचीती दिली. या श्लोकातील पहिल्या दोन ओळींच्या समर्थनार्थ गोंदवलेकर महाराजांचे उदाहरण समर्पक मानता येईल. गुणांवेगळी वृत्ती धारण करायचा साधकाने प्रयत्न केला, तरी अतींद्रिय आत्मस्वरूप पाहण्याची ज्ञानदृष्टी सद्गुरू देत असतात, हे विसरून चालणार नाही. ती ज्ञानदृष्टी हे गुरुअंजन होय!
7738778322