निसर्गाचे सान्निध्यसुख

    01-Jul-2024
Total Views |
nature love humanity
 
आज माणसाला रोजच्या धकाधकीच्या जीवनात, स्वत:ला काय हवे आहे हे पहायला वेळच नाही. मग कधी सहज कुठे बाहेर फिरालायला गेल्यावर, शहरात न दिसणार्‍या गोष्टींकडे आपली नजर वेधली जाते. निसर्ग सौंदर्याच्या अनेक गोष्टी, मानवी मनाला कायमच भुरळ घालत आले आहे. या गोष्टींसाठी मानवाने निसर्गाच्या सान्निध्यात सतत गेले पाहिजे. म्हणजे निसर्गाचे प्रेम देखील उमगेल. निसर्गाच्या प्रेमाचा हा आढावा...

निसर्गाने आपल्याला इतकं दिलं आहे की, आपण त्याची दुरूनही कल्पना करू शकत नाही. या धरेवर जीवन जगत आहे, ते केवळ निसर्गामुळेच. ब्रह्मांडात इतर अनेक ग्रह आहेत, परंतु येथील निसर्गाशिवाय तेथे जीवन शक्य नाही. त्यामुळे निसर्ग हा आपल्या जीवनाचा अतुल्य आधार आहे. पृथ्वीवर स्थळानुसार निसर्ग आपले रूप बदलतो, आणि त्यानुसार ती जागा व तेथील परिस्थिती आपल्याला साधनसामग्री पुरवते, तसेच आपल्या मनाला, डोळ्यांना सुख पुरवते. आज यशस्वी लोक निरोगी आणि उत्तम जीवन जगण्याचे उद्दिष्ट ठेवत आहेत.
 
निसर्गाच्या जवळ राहण्याचे फायदे, अनेकांना त्यांचे सध्याचे गजबजलेल्या नागरीतले शहरी निवासस्थान बदलून, उद्यानाजवळच्या घरात किंवा अर्धवट विकसित शहरी उपनगरात जाण्याची इच्छा निर्माण करू शकतात. सूर्याच्या पहिल्या किरणांपासून ते चंद्राच्या चांदण्यांपर्यंत, मोकळ्या माळरानातून, बागांमधून जंगल आणि पर्वतांपर्यंत, नदीच्या मधुर संगीतापासून, समुद्रात उसळणार्‍या लाटांपर्यंत, बसलेल्या पक्ष्यांचा किलबिलाट, माळरानात असलेले सावली देणारे एकच झाड, यासारखे आपल्या आजूबाजूला जे जे काही नैसर्गिक संसाधने उपलब्ध आहे, ते ते सारे आपण अनुभवले पाहिजे. त्याचा आनंद आपसूक मिळतोच. कारण, जोपर्यंत आपल्याला त्या अमूल्य सौंदर्याचे महत्त्व कळत नाही, आणि जोपर्यंत आपण त्याच्या सौंदर्याचे कौतुक करायला शिकत नाही, तोपर्यंत ती आपल्यासाठी जपून ठेवावी, अशी खास बाब होऊ शकत नाही.

एखाद्या चित्रकार, कवी, लेखक, कलावंताच्या भावना, त्या शांततामय वातावरणात निसर्गाच्या कुशीत आल्यावरच जागृत होतात. तेव्हाच त्यांना त्या ऊर्मी, कागदावर उतरवता येतात. त्याशिवाय जीवनात विविधता आणि विशालता येत नाही. यांत्रिक जीवन जगताना माणसाला कंटाळा आला की, निसर्गाच्या कुशीत जाऊन शांततेचा दीर्घ श्वास घ्यावासा वाटतो. असे का? कारण यंत्रे आपला श्वास गुदमरून टाकतात, आणि आपली मती बधिर करतात. आजच्या तंत्र युगात माणूस नैसर्गिक गोष्टींकडे अधिक आकर्षित होत आहे, आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी करतानाही तो, नैसर्गिक वस्तू किंवा नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या वस्तूंना महत्त्व देतो. जेव्हा आपण नैसर्गिक उत्पादनांना इतकं महत्त्व देत चाललोय, मग निसर्गाला का नाही? या सर्व गोष्टी या धरेवर निसर्ग आहे तोपर्यंतच मिळतात.

ते गोलगोल चकचकीत पाण्याचे थेंब आकाशातून बाहेर पडतात, आणि इतका दूरवरचा प्रवास करत सरळ जाऊन त्या खडबडीत मातीला भिडतात, हे सगळेच किती मोहक असते. आपल्यापैकी बरेच जण, त्या मातीशी खेळले आहेत. तो सुंदर मृद्गंध आपल्याला वेड लावून गेला आहे. कधी आनंददायी झुळझुळ, तर कधी बेलगाम झोडणारा तो वारा, तुमच्या सर्व चिंता आणि मूड स्विंग्स काढून हवेतच उडवून टाकतो, आणि तुम्हाला सर्वबाजूने आनंदी कंपने देतो, तेव्हा काय ते संमोहन असते? जेव्हा तुम्ही प्रभातकाळी उठता, तेव्हा सर्वात साजिरी गोष्ट तुम्हाला पहिल्यांदा दिसते, ती म्हणजे सूर्य.

जो हळूहळू आपला सुंदर प्रकाश, फक्त तुमचा भाव उद्दीपित करण्याकरिता त्या रात्रीच्या काळोखाला गिळून अमर्याद पसरवू लागतो, तत्क्षणी तुमचा इंस्टाग्राम फोटो बनून जातो. जेव्हा तुम्ही झाडाखाली शांतपणे बसता, आणि आजूबाजूची शांतता तुम्हांला आतून जाणवते, तेव्हा मुग्ध झाल्यासारखे वाटत नाही का? जेव्हा तो निळा समुद्र अनेक अडथळ्यांसह मैलोन्मैल प्रवास करतो, आणि फक्त त्या वाळूला स्पर्श करण्यासाठी, आपल्या कवेत खेचण्यासाठी उचंबळतो तेव्हाचा तो क्षण किती उत्तेजित भासतो. जेव्हा कळी उमलू लागते तेव्हा असे वाटते की, आपणही फुलणार आहोत. निसर्गराजासारखे मुक्त आणि पूर्णपणे जगलेले जीवन, हेच जगण्यासाठी योग्य आहे.

पण आजच्या गरजांची आणि उद्दिष्टांची पूर्तता करणे, रोजची भाकरी मिळवणे, जीवनशैली टिकवणे, आणि समाधानी सांस्कृतिक संमेलने या व्यस्त वेळापत्रकात लोक त्यांना नेमके काय करायचे आहे ते विसरू लागले आहेत. म्हणूनच तुमच्या दैनंदिन उन्मादी कामांपासून निसर्गात विश्रांतीचे क्षण घालवणे आवश्यक आहे. यामुळे मनाची, शरीराची आणि आत्म्याची शांती मिळते. एवढेच नाही तर, रोजच्या जगण्यापलीकडे एक सुंदर जीवन आहे, आणि ते जीवन जगण्यासाठी कौशल्याची गरज आहे, हे आपल्या मुलांनाही कळायला लागते. जेव्हा आपण त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जातो, तेव्हाच ते नैसर्गिक कौशल्य अंगी बाणवता येते. पक्षी घरटी कसे बांधतात, प्राणी आपल्या बाळांची काळजी कशी घेतात, निष्ठा आणि इमान कसे जगता येते, अटीशिवाय प्रेम कशाला म्हणतात, अशी अनेक रोजची कौशल्ये आणि जीवनमूल्ये निसर्गाच्या जवळ गेल्याने माणसाला कळायला लागतात.
 
प्रामाणिकपणे सांगायचे तर, निसर्गाच्या सान्निध्यात राहणे, मानवासाठी महत्त्वाचे आहे. कारण, आपण निसर्गाचेच तर आहोत. एखादी व्यक्ती जे काही करते ते सारे निसर्ग आणि नैसर्गिक सवयींमध्ये असते. उदाहरणार्थ, बहुतेक मानव-प्राणी जन्मजात अंतःप्रेरणेने सुसज्ज असतात, जे त्यांच्या संकल्पनेच्या आधीपासून निसर्गाच्या अस्तित्वात असलेल्या अंतःप्रेरणेशी जुळलेले आहेत.
निसर्ग हा एक प्रकारचे मापक यंत्र आहे, कारण ते लोकांना त्यांच्या अस्तित्वाशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. निसर्ग म्हणजे, जीवनम्हणजे काय याची सतत आठवण करून देणारा जगन्नियंता असतो, हे वेगळे सांगायची गरज नाही.

“हे विसरू नका की पृथ्वीला तुमचे अनवाणी पाय स्पर्शायला आवडतात आणि धुंद वारे तुमच्या केसांशी खेळायला उत्सुक असतात.” - खलील जिब्रान
(क्रमश:)

डॉ. शुभांगी पारकर