उजव्या दिशेने फ्रान्स

    01-Jul-2024   
Total Views |

france nationalist ideology


जगभरात राष्ट्रवादी विचारसरणी असलेल्या पक्षांचा बोलबाला वाढत आहे. याला युरोपही अपवाद राहिलेला नाही. उदारमतवादी आणि डाव्यांचा गड असलेल्या युरोपमध्ये राष्ट्रवादी विचारसरणीच्या पक्षांचा उदय होत आहे. नेदरलॅण्ड्स, इटलीनंतर आता फ्रान्समध्ये घेण्यात आलेल्या मध्यावधी निवडणुकीत दक्षिणपंथी राजकीय पक्षांनी मोठे यश मिळवले. त्यांच्या या विजयाच्या युरोपच्या राजकारणावर होणार्‍या परिणामांचे आकलन...

मागच्या महिन्यात, युरोपियन युनियनच्या 27 देशांत निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत सत्ताबदल झाला नसला तरी, ’युरोपियन युनियन’ राष्ट्रवादी उजव्या विचारांच्या पक्षांना लक्षणीय यश मिळाले. इटलीच्या पंतप्रधान जार्जिया मेलोनी यांच्या, ’ब्रदर्स ऑफ इटली’ या पक्षाला सर्वाधिक मते मिळाली. जार्जिया मेलोनी या इटलीच नाही, तर संपूर्ण युरोपमध्ये उजव्या राजकारणाचा चेहरा आहेत. इटलीनंतर फ्रान्समध्ये राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. वैचारिकदृष्ट्या मध्यममार्गी मानल्या जाणार्‍या इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांचा पक्ष असलेल्या रेनेसां पार्टीला, युरोपियन युनियनच्या निवडणुकीत मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले.

युरोपियन युनियनच्या निवडणूक निकालाचे पडसाद, फ्रान्सच्या राजकारणावर पडले. निवडणूक निकाल जाहीर होताच, राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी तीन वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असलेल्या फ्रान्सची संसद (असेंबली नॅशनल) बरखास्त करून, मध्यावधी निवडणुकांची घोषणा केली होती. अशाप्रकारे अचानक निवडणुका घोषित करून मोठा जुगार खेळला होता, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले होते. या निवडणुकीतील निकालामुळे मॅक्रॉन यांच्या खुर्चीला काहीही धोका नाही. फ्रान्समध्ये अर्ध-राष्ट्रपती प्रणालीने देशाचा कारभार चालतो. या प्रकारात राष्ट्रपती आणि पंतप्रधान, हे दोघेही आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत व्यवहार हाताळतात. पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख असतात, तर राष्ट्रपती हे राष्ट्राचे प्रमुख असतात.
 
दोन्ही निवडणुका या वेगवेगळ्या घेतल्या जातात. राष्ट्रपतींची निवड सुद्धा थेट जनतेतून होते. तर संसदेत ज्या पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळेल, त्यांचा नेता पंतप्रधान होतो. राष्ट्रपतींचा कार्यकाळ पाच वर्षांच्या असल्याने, संसद बरखास्त झाली तरी राष्ट्रपती आपल्या पदावर कायम राहतात. फ्रान्समध्ये यावेळी मॅक्रॉन यांच्या रेनेसां पक्षाचे, गॅब्रिएल अटल हे पंतप्रधान आहेत. या निवडणुकीत रेनेसां पक्षाच्या संभावित पराभावामुळे, गॅब्रिएल अटल यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागेल. मॅक्रॉन मात्र आपला कार्यकाळ पूर्ण करतील. त्यामुळे निवडणुकीत संभावित पराभव दिसत असला, तरी आपली नैतिकता सिद्ध करण्यासाठी मॅक्रॉन यांनी मध्यावधी निवडणुकीचा घाट घातला. पण, त्यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटा पडला असल्याचे दिसत आहे.

पहिल्या फेरीतील निवडणुकीत उजव्या विचारधारा असलेल्या, मरिन ले पेन यांच्या नेशनल रैली (आरएन) पक्षाला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. फ्रान्समधील सर्वेक्षण संस्थांनुसार, आरएन पक्षाला 33.2 टक्के ते 33.5 टक्के मते मिळतील, तर डाव्या विचारसरणीच्या न्यू पॉप्युलर फ्रंटला 28.1 टक्के ते 28.5 टक्के, तर मॅक्रॉनच्या उदारमतवादी आघाडीला 21 टक्के ते 22.1 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. या मतांच्या टक्केवारीच्या आधारे, 577 जागांच्या फ्रान्सच्या संसदेत, दुसर्‍या टप्प्यानंतर आरएनला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. फ्रान्समधील शासनप्रणालीप्रमाणेच निवडणूकप्रणालीसुद्धा किचकट आहे. फ्रान्सच्या संसदेचा सदस्य होण्यासाठी, एकूण मतांच्या 50 टक्के मते मिळवणे आवश्यक आहे. पहिल्या फेरीतील निवडणुकीत, 50 टक्के मते किंवा त्याच्या मतदारसंघातील एकूण मतदारांच्या किमान एक चतुर्थांश मते मिळवतो, तो विजयी मानला जाईल. ही अर्हता पूर्ण करण्याएवढी मते न मिळाल्यास, दुसर्‍या फेरीतील मतदान होते.

दुसर्‍या फेरीत ज्या उमेदवारांना पहिल्या फेरीत 12.5 टक्क्यांहून कमी मतदान मिळाले असेल, त्यांची उमेदवारी बाद केली जाते. त्यामुळे दुसर्‍या फेरीत विजेता मिळायला सोपे जाते. फ्रान्समध्ये पहिल्या फेरीत विजय मिळणे, हे क्वचितच घडते. पण, सर्वेक्षणातील अंदाजानुसार, नॅशनल रॅलीतील काही उमेदवार हे पहिल्याच फेरीत विजय मिळवतील. दुसर्‍या महायुद्धानंतर ही पहिली वेळ आहे, ज्यामध्ये राष्ट्रवादी उजव्या विचारसरणीचा पक्ष फ्रान्समध्ये सत्तेच्या जवळ पोहोचत आहे. ला पेन यांच्या पक्षाला रोखण्यासाठी, फ्रान्समध्ये डाव्या आणि मॅक्रॉन यांच्या मध्यममार्गी आघाडीने, दुसर्‍या फेरीत एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू केली आहे. मॅक्रॉन यांनी उजव्या विचारसरणीच्या पक्षांना रोखण्यासाठी, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी राष्ट्रवादी विचारांच्या पक्षाला रोखण्यासाठी डावे आणि मॅक्रॉन एकत्र येऊ शकतात. यामुळे निश्चितच नॅशनल रॅलीच्या जागा कमी होऊ शकतात. पण, नॅशनल रॅलीला फ्रान्समध्ये पहिल्या क्रमाकांचा पक्ष होण्यापासून रोखणे, आता जवळपास अशक्य आहे.

नॅशनल रॅलीच्या बरखास्त झालेल्या संसदेत 88 जागा होत्या. पण, यावेळी त्यांच्या जागांचा आकडा हा 250 पेक्षा अधिक असू शकतो. त्यामुळे मॅक्रॉन यांनी मध्यावधी निवडणुका घेऊन खेळलेला राजकीय जुगार, त्यांच्यावरच उलटताना दिसत आहे. मॅक्रॉनच नाही, तर युरोपमधील डावे आणि उदारमतवादी पक्षांना पराभवाचा सामना करावा लागत आहे. उदारमताच्या नावाखाली बेकादेशीर घुसखोरांना दिलेला आश्रय, त्यातून निर्माण झालेला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, यांमुळे युरोपमधील जनमत हे डाव्यांच्या विरोधात जात आहे. युरोपमध्ये उजव्या विचारसरणीच्या पक्षाचा झालेला उदय हा त्याचेच द्योतक आहे. त्यामुळे आता डाव्यांना आणि उदारमतवाद्यांनासुद्धा आपले राजकीय अस्तित्त्व वाचवण्यासाठी घुसखोरांना लगाम घालावा लागणार आहे. नाहीतर, त्यांचे राजकीय अस्तित्त्व धोक्यात येईल.





श्रेयश खरात

वाणिज्य शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC), अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यासक. इतिहास, अर्थकारण, राजकारण आणि क्रिकेट इत्यादी विषयांची आवड.