पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांची सुरक्षा आणि ‘चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर’ परियोजनेची सुरक्षा जर पाकिस्तानला करता येत नसेल, तर योजनेच्या आणि चिनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चीन आपले सैन्य पाकिस्तानमध्ये तैनात करेल, असा नुकताच चीनने पाकिस्तानला धम भरला. यावर चीनचा मांडलिक असलेला पाकिस्तान काय बोलणार? चीनची हाँजी हाँजी करण्याशिवाय पाकिस्तानच्या हातात उरले तरी काय?
पाकिस्तान हा चीनच्या आर्थिक मदतीवर जगतोय. आता तर काय पाकिस्तानची आर्थिक आणि राजकीय स्थिती दयनीयतेच्याही पलीकडे गेली आहे. मात्र, ‘गिरे तोभी टांग उपर’ ही पाकिस्तानची शैली असल्याने पाकिस्तान जगासमोर स्थिरतेचे उसने अवसान आणत आहे. जगाला काहीही दाखवले तरी प्रत्यक्षात पाकिस्तानचे तीनतेरा वाजलेले आहेतच. महागाई आणि त्याहीपेक्षा पाकिस्तानने जन्मजात पोसलेला दहशतवाद, हाच पाकिस्तानवर उलटलेला आहे. त्यामुळे अस्थिरता आणि दहशतवाद यात चिरडून निघत असलेला पाकिस्तान आज आणखीन गर्तेत जात आहे. त्यातच बलुचिस्तान आणि सिंध पाकिस्तानमधून फुटून निघण्यासाठी कायमच आक्रमक भूमिका घेत आहेत. बलुचिस्तानमध्ये तर नागरिक पाकिस्तानच्या विरोधात उघड उघड रस्त्यावर उतरत असतात. पाकिस्तानच्या डोक्यावर चीनचा वरदहस्त आहे. त्यामुळे बलुचिस्तानमध्ये चिनी नागरिकांवरही हल्ले करण्यात आले. मागे मार्च महिन्यात ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’च्या दहशतवादी हल्ल्यात दासू हायड्रो पावर प्रोजेक्टमध्ये काम करणारे पाच चिनी इंजिनिअर मारले गेले. तसेच बलुचिस्तानमध्ये चीन आणि पाकिस्तानच्या संयुक्त विद्यमाने होणार्या कामांवरही हल्ले केले झाले.
चीनच्या मदतीने सुरू असलेले कोणतेही काम आम्हाला नकोच, असे म्हणत बलुचिस्तानमध्ये आंदोलनेही झाली. त्यांनी चिनी कर्मचार्यांवर हल्लाही केला. बलुचिस्तानचा चीनला विरोध का? तर विकासाच्या नावावर मदत म्हणून बलुचिस्तानमध्ये चीनने कामे सुरू केली. पण, त्या सगळ्या कामांमध्ये चीनने कर्मचारी म्हणून स्थानिकांना संधी दिली नाही. तसेच चीनने सुरक्षिततेच्या आणि गोपनीयतेच्या नावाखाली बलुचिस्तानमध्ये ठिकठिकाणी सुरक्षा यंत्रणा बसवली. त्यामुळे बलुची नागरिकांना त्यांच्याच देशात तुरूंगात राहिल्यासारखे वाटते. चिनी कंपन्या बलुचिस्तानाच काम करतात. मात्र, नमाज किंवा रोजा दरम्यान या कंपन्यांनी त्यांच्या मुस्लीम कर्मचार्यांना रजा किंवा विश्राम नाकारला. पाकिस्तानने स्वत:ला मुस्लीम राष्ट्र घोषित केले. पाकिस्तानचा कायदा- कानून, संस्कृती आणि लोकजीवन मुस्लीम विश्वासावरच आधारित आहे. या पार्श्वभूमीवर चीन पाकिस्तानमध्ये कंपन्या उघडून पकिस्तानच्या मुस्लीम विश्वासासाारखे वागत नाही, असेही स्थानिक बलुची नागरिकांना वाटते.
यामुळे बलुचिस्तानमध्ये लोक चीनला समर्थन करत नाहीत. ते चीनच्या पाकिस्तानमधील कामांना जमेल तसा विरोध करतात. मात्र, पाकिस्तान त्यांच्याच नागरिकांच्या या संतापाकडे शिताफीने दुर्लक्ष करत असतो. उलट पाकिस्तान या नागरिकांचेच दमन करतो. त्यांची आंदोलने हिंसकपणे चिरडून टाकतो. चीनविरोधात कुठे काही होऊ नये, यासाठी पाकिस्तान काळजी घेतो. पण, यामुळेच बलुचिस्तानमध्ये चीन आणि चिनी कर्मचार्यांविरोधातल्या भावनांना खतपाणी मिळाले. दुसरीकडे आपले नागरिक पाकिस्तानमध्ये सुरक्षित नाहीत. त्यामुळे चीन संतापला आहे. असेच राहिले तर पाकिस्तानमध्ये काम करण्यासाठी कोण चिनी नागरिक स्वेच्छेने तयार होईल? हे चीनला माहिती आहे. त्यामुळेच पाकिस्तानने चिनी नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अन्यथा चीन पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सैन्य पाठवेल, असे चीन म्हणत आहे. मात्र, पाकिस्तानमधील विकासाच्या नावाखाली सुरू केलेली कामे बंद करणार, असे चीन म्हणत नाही. कारण, चीनसाठी पाकिस्तान हे भारत आणि इतर आशियाई देशाविरोधात वापरता येणारी छावणी आहे. तसेच पाकिस्तानला विकासाच्या नावाने कर्ज देऊन कधीतरी पाकिस्तानलाही ‘एक चीन, एक देश’ या अंतर्गत समाविष्ट करण्याची चीनची तयारी सुरू आहे. थोडक्यात, पाकिस्तानची चिनीस्तान होण्याची प्रक्रिया सुरू आहे.