‘आयुषी’संग रंगल्या मनमोकळ्या गप्पा...

Total Views |
Aayushi Bhave

२०१८ मध्ये ‘श्रावणक्वीन’ झालेली आयुषी भावे हिने मॉडेलिंगसोबतच अभिनयातही आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. याशिवाय, ‘रूपनगर के चित्ते’, ‘जोगी’ या हिंदी चित्रपटांतही ती झळकली होती. मूळत: नृत्यांगना असणार्‍या आयुषीने अभिनय क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली. सध्या ती ‘१०:२९ की आखरी दस्तक’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत असून याच निमित्ताने आयुषी भावे सोबत ‘दै. मुंबई तरुण भारत’ने साधलेला सुसंवाद.

माझ्या आगामी ’१०:२९ की आखरी दस्तक’ या मालिकेचे कथानक जरा निराळे आहे. आजवर मी ज्या मालिकांमध्ये कामं केली, वेगळ्या भूमिका केल्या, त्या सासू-सुनांच्या नात्यांवर आधारित होत्या. पण, आता ही नवी मालिका ‘हॉरर’ आणि ‘थ्रिलर’ या दोन्हींचा मिलाफ असून, यात मी आजवर न साकारलेली भूमिका करण्याची संधी मला मिळाली आहे. या मालिकेत मी बिंदू ही भूमिका साकारत असून, या पात्रात आणि आयुषी म्हणजेच माझ्यात केवळ नृत्य हाच आम्हाला जोडणारा समान धागा आहे. त्याव्यतिरिक्त माझ्यात आणि त्या पात्रामध्ये कोणतेही साम्य नाही. बिंदू ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना बुचकळ्यात पाडणारी आहे,” असे आयुषीने तिच्या नव्या मालिकेतील व्यक्तिरेखेबद्दल सांगताना कायम प्रयोगशील भूमिका आणि नवी आव्हाने कलाकार म्हणून स्वत:ला देण्याची वृत्ती असल्याचेही ती म्हणाली.

आयुषी भावे हिने अभिनेता सुयश टिळक याच्यासोबत २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली होती. आजवर सासू-सुनांच्या मालिकांमध्ये काम केल्यामुळे वैयक्तिक जीवनात त्याचा कसा परिणाम झाला, असे विचारले असता आयुषी म्हणाली की, “माझ्या वैयक्तिक जीवनातील वैवाहिक जीवन हे फार निराळे आहे. मालिकांमधील कोणतीच गोष्ट ही खर्‍या जीवनात वापरण्याचा काही संबंध आला नाही. उलट, बर्‍याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या. एक कलाकार म्हणून मला मालिका करण्यात फार रस असल्यामुळे एक माणूस म्हणून मला अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टी या काळानुरूप अधिक समजत गेल्या.”

कलाकार जरी असले तरी त्यांना त्याचे वैयक्तिक, वैवाहिक जीवन आहे. पण, अभिनेत्री आणि त्यातही कला किंवा मनोरंजन क्षेत्रातीलच साथीदार असल्यावर काय बदल झाला, असे विचारले असता आयुषी म्हणाली की, “नशिबाने लग्न झाल्यावर कोणतीही नकारात्मक गोष्ट माझ्यासोबत घडली नाही. उलट, सासरची मंडळी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. सुयशदेखील या क्षेत्रातील असल्यामुळे हे क्षेत्र कसं चालतं. मालिकाविश्वात काम कसं चालतं, याची माहिती त्याला असल्यामुळे आमच्यात समंजसपणा अधिक घट्ट होत गेला आणि एकमेकांवरचा विश्वासही वाढत गेला,” अशी कबुली आयुषीने दिली.
 
 

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.