उच्च शिक्षण ते सेवाव्रती..

    30-Jun-2024   
Total Views | 142
murari baban joshi



शासकीय सेवेत राहून शिक्षणाचे महत्त्व पटलेल्या मुरारी यांनी आपल्या मुलांनादेखील उच्च शिक्षण दिले. सेवानिवृत्त झाल्यावर जनसेवेला समर्पित मुरारी यांच्याविषयी...

मुरारी यांचा जन्म डोंबिवलीत झाला. त्यांचे संपूर्ण बालपण डोंबिवलीत गेले. मुरारी यांच्या आईचे वडील, नागो म्हात्रे हे वारकरी संप्रदायातील होते. त्यामुळे मुरारी यांच्या घरात नेहमीच अध्यात्मिक वातावरण राहिले आहे. मुरारी यांनादेखील भजन, कीर्तनाची आवड आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय होता. डोंबिवलीतील ते सर्वात जुने व्यापारी होते. तीन भाऊ, दोन बहिणी अशी पाच भावंडे आणि आईवडील, असा परिवार जुन्या डोंबिवलीत वास्तव्याला होता. आतादेखील त्यांचा परिवार त्याच ठिकाणी राहात आहे. मुरारी यांचे वडील बबन हे फारसे शिकलेले नव्हते. पण, त्यांची आई हंसाबाई, या जोशी हायस्कूलमधून अंतिम वर्ष उत्तीर्ण झालेली पहिली महिला होती. आईकडून घेतलेले शिक्षणाचे बाळकडू, मुरारी यांनी आपल्या मुलांनादेखील दिले. मुरारी यांनी डोंबिवली शहरातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, राणाप्रताप विद्यालयातून, त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. तर त्यांनी बारावपर्यंतचे शिक्षण वाणिज्य शाखेतून, जोंधळे महाविद्यालयातून पूर्ण केले. पदवी शिक्षणासाठी त्यांनी बिर्ला महाविद्यालयात प्रवेशअर्ज दाखल केला. पदवीच्या प्रथम वर्षासाठी त्यांनी प्रवेशही घेतला. पण त्याचवेळी नोकरीसाठी त्यांचे एका बाजूला प्रयत्न चालू होते.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत नोकरीसाठी अर्ज केला होता. माजी मंत्री तथा स्थानिक राजकीय नेते नकुल पाटील यांच्या प्रयत्नांनी, मुरारी यांना महापालिकेतील पाणीपुरवठा विभागातील ’व्हॉल्वमन’ खात्यात काम मिळाले. काम मिळाले खरे, पण त्यातून फारसे वेतन मिळत नव्हते. पण हातात दुसरे काही काम नसताना मिळणारे ते वेतनसुद्धा, त्यावेळी मोठेच वाटायचे. पाच वर्षे ’व्हॉल्वमन’ म्हणून तुंटपुंज्या वेतनावर का होईना, काम केल्यावर त्यांची प्रतिक्षा संपली. महापालिकेकडून त्यांना कायमस्वरुपी तत्वावर नियुक्त केले गेले, आणि ते पाणीपुरवठा विभागात डोंबिवलीत लिपिक पदावर रूजू झाले. पुढे ते पाणीपुरवठा विभागातील कल्याण मुख्यालयात उपअभियंता, यांच्या अधिपत्याखाली तांत्रिक विभागात कार्यरत होते. तसेच मलनिस्सारण विभाग, आरोग्य विभाग कल्याण, पाणीपुरवठा विभाग डोंबिवली, मलनिस्सारण डोंबिवली, आस्थापना, एफ वॉर्ड, वरिष्ठ लिपिक, त्यानंतर साहाय्यक आयुक्त या प्रभागांचा कार्यभार सोपविण्यात आला होता. मात्र, विहित वयोमानानुसार ते महापालिका सेवेतून निवृत्त झाले.

महापालिकेतून निवृत्त होऊन आता त्यांना एक वर्ष होत आले आहे. निवृत्तीनंतर आता ते आपली बांधकाम व्यवसायाची आवड जपत आहेत. त्या व्यवसायाशी निगडित घेतलेल्या पदवी अभ्यासक्रमाचा बांधकाम व्यवसायात त्यांना फायदा होत आहे. साहाय्यक आयुक्त पदावर ते रूजू झाले, पण लवकरच निवृत्त झाल्याने त्यांना या पदावर फार काळ काम करता आले नाही. या पदावर राहून जनसेवा करण्याची त्यांची खूप इच्छा होती. त्यांना तशी संधीही मिळाली. पण, काम करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे लोकांच्या समस्या सोडविता आल्या नाहीत. प्रशासनाने जबाबदारी टाकली आहे, ती निभावयाची आहे एवढे माहीत होते. साहाय्यक आयुक्त पद मिळाल्याने आनंद झाला असला, तरी समस्या सोडविता आल्या नाहीत, ही खंत मनाला सतत कोठेतरी बोचत असल्याचे मुरारी सांगतात. मुरारी यांनी कडोंमपात काम करताना, प्रामाणिकपणे करता येईल, तेवढेच काम केले. त्यामुळे काम करताना अडचणी आल्या नाहीत.

सेवानिवृत्तीच्या काळात लोकांची सेवा करण्याची इच्छा आहे. “लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आता प्रयत्न करणार आहे. आता पुष्कळ वेळ माझ्याकडे आहे. त्यामुळे तो लोकांसाठी देणार आहे,” असेही त्यांनी सांगितले. मुरारी हे 1994 साली विवाहबद्ध झाले. आजवरच्या प्रवासात त्यांना पत्नी कविता यांची मोलाची साथ लाभली. कविता या गृहिणी आहेत. मुरारी यांच्या घरी शिक्षणासाठी पोषक असे वातावरण होते, तरी नोकरीमुळे त्यांनी पदवीच्या प्रथम वर्षानंतर शिक्षण अर्धवट सोडून दिले. पण, शिक्षण हे जीवनात महत्त्वाचे असून, हा शिक्षणाचा संस्कार त्यांनी आपल्या मुलांमध्ये रूजविला. त्यामुळेच त्यांची दोन्ही मुले आज डॉक्टर आहेत. महापालिका कर्मचार्‍याने आपल्या दोन्ही मुलांना डॉक्टर केल्याने, त्यांचे महापालिका क्षेत्रातही सर्वच स्तरांवर मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. मोनिका 2022 साली एमबीबीएस झाली. त्यानंतर बहिणीच्या पाऊलांवर पाऊल ठेवून, निषाददेखील 2023 साली एमबीबीएसच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाला. महाविद्यालयामध्ये ‘टॉप टेन’मध्ये तो आलेला आहे.

सरकारी नोकरीसारखी अतिमहत्त्वाची सेवा बजाविताना मुरारी यांनी तब्बल 39 वर्षे कडोंमपाला आपले योगदान दिले. त्यानंतरही समाजाप्रती असलेले ऋण ही भावना मनात ठेवत, त्यांचा आजवरचा प्रवास हा इतरांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121