धुमसता बंगाल...

    03-Jun-2024   
Total Views |
bengal violence


प. बंगालमध्ये मतदारांना धमकावणे, हाणामारी, दगडफेक यांसारख्या प्रकारांना यंदाच्या निवडणुकाही अपवाद ठरल्या नाही. जयनगर लोकसभा मतदारसंघात तर एका पत्रकाराला मारहाण करून त्याला जखमी करण्यात आले. मतदान सुरू असताना धगधगणारे बंगाल निवडणुकीनंतर तरी शांत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काही झाले नाही. कारण, बंगालमध्ये जंगलराज जोरात असून, त्याच्या सुत्रधार आहेत खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीची शेवटची फेरी पार पडली, तरी हिंसचार सुरूच होता. संदेशखाली, कोलकाता अशा अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले झाले. जानेवारी २०२४ पासून हिंसाचाराचा सामना करत असलेल्या संदेशखालीमध्ये पुन्हा एकदा पोलीस आणि महिलांमध्ये हिंसाचार उफाळून आला. महिलांवर बंगाल पोलिसांनी बळाचा वापर केला. निवडणुकीनंतर तृणमूलचे कार्यकर्ते संदेशखालीत जाऊन तेथील महिलांना धमकावण्याचे प्रयत्न करत आहेत. ‘४ जूननंतर सर्वांना विधवा बनवू,’ अशी धमकी महिलांना दिली जात आहेत, असे आरोप भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी व्हिडिओ शेअर करत केले आहेत. निवडणुकीच्या दिवशीही संदेशखालीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. निवडणुकीदरम्यान भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या डोक्यालाही हल्ल्यात दुखापत झाली होती. पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी राज्य सरकारला या हिंसाचारावर कारवाई करण्यास सांगितले. हल्ले सुरूच राहिल्यास राजभवनाचे दरवाजे उघडणार असल्याचे त्यांनी म्हटले. कोलकाता येथे भाजपच्या एका पोलिंग एजंटला टीएमसी कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. नैहाटी येथील भाजप कार्यकर्त्याच्या घराबाहेर तर चक्क बॉम्ब ठेवण्यात आला होता. प. बंगालमधील हिंसाचाराच्या भीतीमुळे निवडणूक आयोगाने निकालानंतर १५ दिवसांपर्यंत राज्यातून केंद्रीय सुरक्षा दलांना न हटविण्याचा निर्णय घेतला. आधी कम्युनिस्ट आणि आता ममता. हिंसाचार बंगालला काही नवीन नाही. जो पक्ष सत्तेत येतो, तो आपली सत्ता टिकविण्यासाठी लोकशाहीला पायदळी तुडवत विरोधकांना राजकारणातून नाही, तर जीवानिशी संपविण्याचा प्रयत्न करतो. आता सत्ता तृणमूलचीच आहे. मात्र, येत्या ४ जूननंतर ममतांच्या हुकुमशाहीच्या अंताला सुरूवात होणार, हे नक्की!

नाटकी केजरीवाल...


पूर्वीच्या काळी राजे-महाराजे युद्धभूमीवर जाताना जितका गाजावाजा करत नसतील तितका गाजावाजा अरविंद केजरीवाल यांनी केला. दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी जामिनानंतर केजरीबाबूंची तुरुंगात पाठवणी झाली. मात्र, जितकी चिंता आणि काळजी मद्यपींची होती, तितकीच त्यांना आपले उमेदवार निवडून येतील की नाही, याची. त्यामुळे पराभवाच्या छायेत असलेल्या उमेदवारांना विजयाच्या छायेत आणण्यासाठी केजरीबाबूंनी चांगलीच कंबर कसली. त्यासाठी त्यांनी चक्क कोर्टाकडे अंशकालीन जामीन देण्याची मागणी केली. आता मुख्यमंत्री असल्याने लाजेखातर केजरीबाबूंना सुट्टी मिळाली. पण, त्यात त्यांनी उमेदवारांचा प्रचार करण्याआधी त्यांचाच प्रचार सुरू झाला. तोही नकारात्मक. अभिषेक मनु सिंघवींसाठी राज्यसभेचे कवाड खोलण्यासाठी त्यांनी आपच्याच राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनाचा राजीनामा मागितला आणि सुरू झाला नवा संघर्ष. केजरीवालांच्या घरी मालीवाल यांना मारहाण झाली. देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी निघालेल्या केजरीवालांना घरातील मारहाण थांबविता आली नाही ना ठोस अशी कारवाई करता आली. प्रचार संपल्यानंतर पुन्हा जामीन वाढविण्याची मागणी केली खरी, पण ती मान्य झाली नाही. त्यामुळे केजरीवालांची रवानगी तिहाडमध्ये झाली आहे. जाण्याआधी केजरीवालांनी देश वाचविण्यासाठी तुरुंगात जात असल्याचे सांगितले. तसेच, ‘एक्झिट पोल’वर विश्वास न ठेवण्याचा सल्लाही दिला. बरं यांना दिल्ली ना प्रदूषणापासून वाचविता आली आणि ना महिलांवरील अत्याचार थांबविता आले. पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री भ्रष्टाचारात बरबटलेले असतानाही केजरीवाल कोणती देशसेवा करायला तुरूंगात चालले आहे, हे त्यांचे त्यांनाच माहिती. ‘एक्झिट पोल’वर विश्वास ठेवू नका म्हणत असताना, पंजाबमध्ये विश्वास कसा ठेवला याचे उत्तर केजरीवाल देणार नाही. कोणत्याही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकले, असे म्हणणार्‍या केजरीवालांना आता खर्‍या अर्थाने कायदा, न्यायालय अशा गोष्टी समजत असतील. आधी उठ लवकर, घे पत्रकार परिषद आणि झाडा आरोपांच्या फैरी असा धडाका लावला होता. आता हेच केजरीवाल आरोपीच्या पिंजर्‍यात उभे ठाकले आहेत. त्यामुळे पराभवाचे दार समोर असताना ही आदळआपट होणारच, त्यात काही नवल नाही.



पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.