कलेची साधना करत, आपले अवघे आयुष्य नृत्यक्षेत्राला बहाल केलेल्या कृपा तेंडूलकरच्या नृत्याचा तल्लीन करणारा हा प्रवास...
वयाची अवधी साडेतीन वर्षांची असल्यापासूनच कृपाची पाऊलं कथ्थक शिकता शिकता थिरकू लागली. खरेतर कृपाच्या आईला नृत्याची विलक्षण आवड होती. पण, त्यांनी ती आवड आपल्या मुलीच्या रुपाने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि कृपानेही त्यांना साथ दिली. कृपाच्या बालपणापासून तिच्या आईचा एक निर्धार होता की, आपल्या मुलीवर शास्त्रीय संगीताचे संस्कार झाले पाहिजे आणि त्यानुसार कृपाने अगदी लहान वयातच गुरू श्री शिला मेहता यांच्याकडून कथ्थकचे धडे घेण्यास सुरुवात केली. आईवडिलांनी कृपाच्या पायातील ताल हेरून, तिला नृत्यक्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी प्रोत्साहन अन् प्रशिक्षणाचीही जोड दिली. शालेय शिक्षण घेत असतानाच, कृपा कथ्थकच्या एक-एक पायर्या पुढे चढत होती. तसेच, तिसरी इयत्तेत असताना कृपाने नृत्यात प्रथम पारितोषिक पटकाविले. तेव्हापासूनच कार्यक्रमांमध्ये आणि विविध स्पर्धांमध्ये कथ्थक नृत्याचे सादरीकरण कृपा करतेय. लहान वयापासूनच कृपावर ‘परफॉर्मिंग आर्ट्स’चे संस्कार घडत गेल्यामुळे, रंगमंचाच्या भीतीने तिच्या मनात कधी डोकावलेच नाही.
प्रत्येकाच्या जीवनात त्यांचे पहिले गुरू हे आईवडील असतात आणि त्यांच्याकडून आपल्याला शिस्तीचे धडे मिळतात. कृपाच्या बाबतीतही काही वेगळे नाहीच. घरात एखादे कार्य असो किंवा इतर काहीही कामे असो, नृत्याचा वर्ग बुडवायचा नाही, याची सवय कृपाला पालकांनी लावली. त्यामुळे अभ्यासासोबत कलेलाही तितकाच वाव घरातूनच मिळत गेल्यामुळे, कथ्थक नृत्यातही आपण करिअर घडवू शकतो, यावर कृपा ठाम होती. कृपाला पाचवीत असताना सरकारची ‘सीसीआरटी’ ही शिष्यवृत्तीदेखील मिळाली. दहावीत असताना परीक्षेमुळे कृपाला नाईलाजास्तव काही काळ नृत्यापासून दूर राहावे लागले. परंतु, घरासमोरच नृत्य वर्ग. त्यामुळे कानांवर सतत घुंगरांचा सुमधूर नाद ऐकू येत असे. मग काय ‘नृत्यापासून कधीच दूर जायचे नाही,’ हा निर्धार कृपाने केला.
दहावी झाली आणि नृत्यापासून लांब जाण्याची वेळ येऊ नये, म्हणून कृपाने डहाणूकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला आणि महाविद्यालयीन शिक्षण सुरू केले. पण, कृपा महाविद्यालयापेक्षा अधिक वेळ नृत्य वर्गातच रमली. अभ्यास, नृत्य हे वेळापत्रक पाळत, कृपाने बारावी उत्तीर्ण केली आणि पुढे ‘सीए’ करण्याचा विचार तिच्या मनात डोकावला.पण, ‘सीए’साठी दिवसाचे 12 तास अभ्यास करावा लागणार, हे ऐकल्यावरच ती भांबावली आणि 12 तास अभ्यास करण्यापेक्षा 24 तास नृत्य करण्याला तिने प्राधान्य देत, याच क्षेत्रात करिअर करण्याचा मनाशी पक्का निर्धार केला. त्यामुळे नृत्याची साथ न सोडता, कृपा अशा महाविद्यालयाच्या शोधात होती, जिथे तिला अभ्यासासोबतच तिची कला जपण्याची संधी हवी होती. आणि रुईया महाविद्यालयासमोर तिचा हा शोध संपला आणि ‘बॅचलर्स इन मास मीडिया’च्या अभ्यासक्रमात तिने प्रवेश घेत ‘जाहिरात’ विषय घेऊन पदवीचे शिक्षण पूर्ण केले. रुईया महाविद्यालय हे कलेला प्राधान्य देणारे असल्यामुळे, कृपाचे नृत्यही अधिक खुलत गेले आणि कथ्थकसाठी कृपाला अखेर मोठे व्यासपीठदेखील लाभले.
रुईयात असताना ‘नाट्यवलय’, ‘युथ फेस्टिवल’मध्ये कृपा आवर्जून सहभाग घेत असे. त्याशिवाय कृपा कथ्थक नृत्याचे कार्यक्रमदेखील सादर करत होती. सोबतच तिने ज्या नृत्य वर्गामध्ये कथ्थकचे शिक्षण घेतले, तिथूनच तिचा नृत्य शिक्षिकेचादेखील एक नवा प्रवास सुरू झाला. ‘बीएमएम’ झाल्यानंतर कृपाने ‘मास्टर्स इन डान्स’मध्ये पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतल आणि पुणे विद्यापीठातून तीन वर्षांची पदव्युत्तर पदवी कृपाने संपादन केली. या तीन वर्षांत आपल्यापेक्षाही उत्तम आणि सरस नृत्य करणारे लोक आहेत, हे पाहिल्यावर तिच्यात कुठेतरी नकळतपणे आलेला ‘मी’पणा झाकला गेला आणि नृत्य क्षेत्रातील दिग्गजांचा सहवास लाभल्यानंतर एक कलाकार म्हणून आपल्यात काय गुण असावे, याची जाणीव झाली.
पुण्यात असताना कथ्थक नृत्यांगना क्षमा भाटे यांच्यासोबत तिने ‘खजुराहो’ या फेस्टिवलमध्ये नृत्य सादर केले. याशिवाय देशभरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कृपाला कथ्थक सादर करण्याची संधी मिळाली. सन 2020 पर्यंत कृपाने अगणित कार्यक्रमांमध्ये कथ्थकची जादू दाखवून दिली. पण, तिच्या जीवनातील खडतर काळ हा कोरोना महामारीत सुरू झाला. कारण, आता व्यासपीठच उपलब्ध होणार नसेल, तर नृत्य कसे करणार, हा मोठा प्रश्न तिच्यासमोर आ वासून उभा होता. पण, कृपाने तंत्रज्ञानाची कास धरत नृत्यआराधनेत खंड पडू दिला नाही. कॅमेर्यासमोर आणि व्यासपीठावरील नृत्य सादरीकरणात खूप तफावत. पण, नृत्य हाच श्वास अन् ध्यास असल्यामुळे कृपाने तो काळदेखील तरून नेला. तसेच, विविध सामाजिक संस्थांमध्ये वंचित मुलांनाही तिने नृत्याचे धडे दिले. गेली 30 वर्षे कथ्थक या नृत्यप्रकारात आपली कला सादर करणार्या कृपाला ‘नटवर गोपीकृष्ण पुरस्कार’, ‘वुमन्स आर्टिस्ट गिल्ड ट्रॉफी’, पं. बिरजू महाराजांच्या हस्ते ‘लेहजा ट्रॉफी’ आणि ‘पं. लच्चू महाराज ट्रॉफी’देखील मिळाली आहे. तसेच, ‘आझादी का अमृत महोत्सव’, ‘जी 20’, ‘भारत मंडपम्’ या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधानांसमोरही तिने नृत्य सादर केले आहे.
कोरोना काळात कृपाला ‘कथ्थक नृत्यशिक्षिका’ म्हणून ओळख मिळाली. सध्या दिल्लीत कृपा संगीत नाटक अकादमीच्या कथ्थक केंद्राच्या परफॉर्मिंग युनिटमध्ये आर्टिस्ट म्हणून काम करत आहे. आव्हाने मिळत राहिल्यामुळे नृत्यांगना म्हणून घडत गेलेल्या परफॉर्मर, शिक्षिका, नृत्य दिग्दर्शक आणि डान्स फॅसिलिटेटर अशा चार माध्यमांमध्ये यशस्वी वाटचाल करणार्या कृपा तेंडूलकर हिला तिच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!