सिंधुदुर्गातील 'हे' कंदीलपुष्प नष्ट होण्याच्या मार्गावर; उरली केवळ ४० ते ५० रोपे

    27-Jun-2024   
Total Views |
Ceropegia mohanramii

मुंबई (अक्षय मांडवकर) - जगात केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळणार्‍या ‘सेरोपेजिया मोहनरामी’ (Ceropegia mohanramii) या कंदीलपुष्पाच्या प्रजातीला ‘नष्टप्राय’ (क्रिटिकली एंडेंजर्ड) श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ने (आययूसीएन) गुरुवार, दि. २७ जून रोजी या कंदीलपुष्पाला ‘नष्टप्राय’ प्रजात म्हणून घोषित केले (Ceropegia mohanramii) . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील केवळ एका सड्यावरच ही प्रजात आढळत असल्याने यानिमित्त तिच्या संवर्धनाची नितांत गरज निर्माण झाली आहे. (Ceropegia mohanramii)

‘आययूसीएन’ ही संस्था जगात तग धरून असलेल्या प्रजातींच्या अस्तित्त्वाचे मूल्यांकन करते. यासाठी वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांच्या सद्परिस्थितीची यादी तयार केली जाते, ज्याला ‘रेड लिस्ट’ म्हणतात. या यादीत जगातील पशु-पक्षी आणि वनस्पतींच्या प्रजातींची सद्यपरिस्थिती वेगवेगळ्या पातळ्यांवर नोंदविण्यात येते. ‘आययूसीएन’च्या या ‘रेड लिस्ट’मध्ये आता सिंधुदुर्गासाठी प्रदेशनिष्ठ असणार्‍या ‘सेरोपेजिया मोहनरामी’ या कंदीलपुष्प प्रजातीचा समावेश झाला आहे. महाराष्ट्रात कंदीलपुष्पाच्या २५ प्रजाती सापडतात. त्यातील १७ प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहेत. जगातील सेरोपेजियाच्या प्रदेशनिष्ठतेसाठी महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. यातल्या बहुतेक जाती दुर्मीळ असून काहींचे अस्तित्त्व आता धोक्यात आले आहे. त्यातील एक प्रजात म्हणजे ‘सेरोपेजिया मोहनरामी’. २००६ साली वेंगुर्ला तालुक्यातील एका सड्यावरून या प्रजातीचा शोध लावण्यात आला होता. वनस्पती शास्त्रज्ञ श्रीरंग यादव, गावडे आणि मिलिंद सरदेसाई यांनी ही प्रजात शोधून काढली होती. वनस्पतीशास्त्रामध्ये भरीव कामगिरी करणारे दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक एच. वाय. मोहनराव यांच्या नावावरून या प्रजातीचे नामकरण करण्यात आले होते. आता ‘आययूसीएन’च्या ‘वेस्टर्न घाट प्लांट स्पेशलिस्ट ग्रुप’ने या प्रजातीचे मूल्यांकन करून तिला ‘नष्टप्राय’ श्रेणीत स्थान दिले आहे.

२०१६ साली ‘आययूसीएन’कडून ‘वेस्टर्न घाट प्लांट स्पेशलिस्ट ग्रुप’ या गटाला मान्यता मिळाली. या गटात जवळपास ६० संशोधक आणि दहा संस्था सदस्य म्हणून कार्यरत आहेत. या गटामार्फत महाराष्ट्रातील तरुण वनस्पती शास्त्रज्ञ आदित्य गडकरी यांनी ‘सेरोपेजिया मोहनरामी’ या कंदीलपुष्पाच्या मूल्यांकनाचे काम केले. वेंगुर्ला तालुक्यातील किनारी भागातील केवळ एका सड्यावर ही प्रजात पावसाळी हंगामात उगवते. वर्षभर जमिनीमध्ये असणारा या प्रजातीचा कंद पहिल्या पावसानंतर अंकुरित होतो. साधारण जुलै ते ऑगस्ट महिन्यांदरम्यान या वनस्पतीला फुले धरतात. ही प्रजात साधारण एक फुटांपर्यंत वाढते. फुलासह ही वनस्पती संपूर्ण हरितवर्णीय असते. त्यामुळे आजूबाजूच्या झाडोर्‍यामुळे ती पटकन नजरेस पडत नाही.

प्रजातीला शेतीमुळे धोका
२०१८ साली वनस्पती निरीक्षक मयुरेश कुलकर्णी यांनी वेंगुर्ल्यातील एका सड्यावरून ‘सेरोपेजिया मोहनरामी’च्या १०० ते १२० रोपांची नोंद केली होती. त्यानंतर मी २०२३ सालच्या ऑगस्ट महिन्यात केवळ ४० ते ५० रोपांची नोंद केली. त्यामुळे पाच वर्षांच्या काळात या प्रजातीच्या संख्येत घट झाल्याचे आढळले. ‘रेड लिस्ट’साठी वनस्पतींच्या प्रजातींचे मूल्यांकन करताना आम्ही त्या प्रजातीच्या आढळण्याची ठिकाणे आणि रोपांची संख्या यांची तुलना करतो. जर प्रजात जगात एकाच ठिकाणी आढळत असेल आणि त्या अधिवासाला धोका निर्माण झाला असेल, तिला ‘नष्टप्राय’ श्रेणीत स्थान दिले जाते. याचपद्धतीने आम्ही ‘सेरोपेजिया मोहनरामी’ या कंदीलपुष्पाला ‘नष्टप्राय’ श्रेणीत स्थान दिले आहे. ही प्रजात उगवणार्‍या वेंगुर्ल्यातील सड्यावर गुरेचराई वाढली असून त्या ठिकाणी शेतीसाठीदेखील मोठ्या प्रमाणात जागा व्यापण्यात आली आहे. - आदित्य गडकरी, सदस्य, वेस्टर्न घाट प्लांट स्पेशलिस्ट ग्रुप


अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.