बोलिव्हियामध्ये सत्तापालट होणे, ही अगदी सामान्य बाब. स्पेनच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यावर या देशामध्ये आंदोलने, लष्करविद्रोह या माध्यमातून तब्बल 190 वेळा सत्तापालटाचे प्रयत्न झाले. थोडक्यात, इथे असंविधानिकरीत्या सत्तापालट होणे सामान्य गोष्ट. मात्र, बुधवार, दि. 26 जून रोजी झालेले सत्तापालट मात्र खूपच वेगळे होते.
महागाई, भ्रष्टाचार वगैरे वगैरे कारणे सांगत बोलिव्हियाचे लष्कर प्रमुख जुआन जोस जुनिगा यांनी सैन्याला सत्तापालटाचा आदेश दिला. त्यानुसार, सशस्त्र सैन्य रस्त्यावर उतरले. महत्त्वाच्या सरकारी वास्तूंवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. सशस्त्र सैनिक हत्यारबंद वाहनांसोबत राष्ट्रपती भवनावर धडकले. मात्र, राष्ट्रपतींनी सैन्याला अगदी सामोरे जात आदेश दिले आणि सैन्याने माघार घेतली. लष्करप्रमुख जुनिगा यालाही अटक करण्यात आली. थोडक्यात, लष्कराच्या बळावर सत्ता काबीज करण्याची जुनिगाची इच्छा होती. मात्र, राष्ट्रपतींनी अत्यंत धडाडीच्या कार्यक्षमतेने, निडरतेने हा विद्रोह मोडून काढला. तसेच विद्रोही सैन्याचे नेतृत्व करणारा जुनिगो देशविघातक कृत्याच्या आरोपाखाली गुन्हेगार म्हणून शिक्षाही भोगणार आहे. ही घटना जगभर वार्यासारखी पसरली. जगाने या घटनेची निंदा केली. तसेच राष्ट्रपतींच्या निर्भयतेचे आणि धडाडीचेही कौतुक केले.
मात्र, आता याच घटनेवर चर्चांना उधाण आले आहे. कारण, राष्ट्रपती भवनावर आक्रमण करणार्या जुआन जोस जुनिगा यांनी केलेले विधान. “आपण सैन्यात विद्रोह करून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला, हे नाटक होते. हे नाटक करण्यासाठी राष्ट्रपती लुईस आर्क यांनीच आदेश दिले होते,” असे त्याने म्हटले. जुनिगाच्या म्हणण्यानुसार, काही काळानंतरच राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक देशात आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी लोकांची सहानुभूती सोबत असावी, तसेच लोकमान्यता, लोकप्रियता मिळावी, यासाठी राष्ट्रपतींनीच राष्ट्रपतीभवनावर हल्ला करायला सांगितले होते. त्यानुसार लुटुपुटुच्या खेळासारखे सैन्याला घेऊन जुनिगा राष्ट्रपती भवनावर धडकला होता. अर्थात, जुनिगा खरे बोलतोय की खोटे?
काही अभ्यासकांचे म्हणणे असे की, जुनिगा खरे बोलत असावा. कारण, जुनिगाच्या नेतृत्वाखाली सैन्य राष्ट्रपती भवनात घुसले, तेव्हा सैन्याबरोबर जुनिगांना पाहून राष्ट्रपती लुईस आर्क म्हणाले, ”जुनिगा, तुम्ही विद्रोह करून योग्य केले नाही. राष्ट्रपती म्हणून मी सांगतो की, सैन्याने ताबडतोब त्यांच्या बराकीत परतावे” असे म्हणून राष्ट्रपती आर्क यांनी जुनिगा यांना तिथल्या तिथे लष्करप्रमुख पदावरुन बडतर्फ केले आणि त्याच क्षणी जोस विल्सन सांचेज़ याची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली. मग नवनियुक्त सांचेज यांनी बडतर्फ जुनिगा यांच्या मुसक्या आवळल्या. सैन्य शांततेने माघारी गेले. विद्रोह थंड झाला. राष्ट्रपती आर्क यांनी जनतेचे आभार मानले की, जनतेच्या साथीनेच त्यांनी हा जीवावर आणि सत्तेवर उठणारा हल्ला परतवून लावला. विशेष म्हणजे, ही सगळी घटना बोलिव्हियाच्या राष्ट्रीय वाहिनीवर ‘लाईव्ह’ दाखवण्यात आली. बोलिव्हियाची जनता हे सगळे पाहत होती. हे सगळे प्रायोजित असल्यासारखे होते. जणू सिनेमातली कथानकच!
असो. बोलिव्हियाच्या राजसत्तेचे हे असे तर धर्म आणि समाजसत्तेचेही चांगले नाही. या लॅटिन अमेरिकन देशात 11 वर्षांची मुलगी पाच महिन्यांची गरोदर आहे, असे आढळून आले. तिच्या सावत्र आजोबांनी हे कुकर्म केले होते. तिचा गर्भपात करणे आवश्यक होते. मात्र, ती धडधाकट आहे. पोटातले बाळही सुरक्षित आहे, त्यामुळे गर्भपात करणे हे ‘बायबल’विरोधात आहे, म्हणत तिथली चर्चसंस्था आणि लोकही रस्त्यावर उतरले. स्थानिक पाद्रींनी या मुलीच्या आईचे मन वळवले- मुलीचा गर्भपात करून तू ‘बायबल’च्या आज्ञेचे उल्लंघन करतेस. पाप करू नकोस.” मग मुलीचा गर्भपात करणार नाही, असा निर्णय तिने घेतला. मात्र, जागृत समाजसुधारकांनी जनआंदोलन करून त्या मुलीचा गर्भपात करवून घेतला आणि त्या निष्पाप मुलीची सुटका केली. ही घटना 2021 सालची बरं का? काय करणार? इथल्या आदिम जमातींचे धर्मांतरण करताना आणि शेकडो वेळा सत्तापालट करताना या देशातल्या राजसत्तेला आणि धर्मसत्तेला जनतेच्या मानवी जगण्याचा विसर पडला का?
9594969638