ही पश्चिम घाट, हिमालयीन प्रदेश आणि ईशान्य भारतातील धनेश पक्ष्यांवर संशोधन करून त्यानिमित्ताने वनअधिवासात होणारे बदल टिपणारी संशोधिका पूजा यशवंत पवार यांच्याविषयी...
मुलगी रमते अरण्यात, धनेशाच्या शोधात. ‘जंगलाचा निर्माता’ म्हणून बिरुदावली मिरवणार्या धनेश पक्ष्यांवर संशोधन करण्याचा तिने विडा उचलेला आहे. जंगलाचा होणारा र्हास आपल्याला धनेशामुळे कशा पद्धतीने उमगू शकतो, हा विषय तिच्या संशोधनाचा केंद्रबिंदू. यासाठी तिने भारतातली अनेक जंगले पालथी घातली. धनेशाशी जवळीक साधणार्या अनेक समाजघटकांसोबत काम केले. पक्ष्यांविषयीच्या कुतूहलापोटी वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात केलेल्या या मुलीने पुणे शहराचा पक्षी नकाशादेखील तयार केला. शास्त्रीय माहिती सहजसोप्या पद्धतीने समाजासमोर मांडणे, लोकचळवळीच्या माध्यमातून शास्त्रीय माहितीचे संकलन करणे, लोकांमध्ये निसर्गशिक्षणाची गोडी रूजवणे हेदेखील तिच्या कामाचे काही पैलू. धनेश पक्षी संवर्धनासाठी झटणारी ही मुलगी म्हणजे वन्यजीव संशोधक पूजा यशवंत पवार.
पूजा यांचा जन्म दि. 12 सप्टेंबर 1992 रोजी पुणे येथे सर्वसामान्य कुटुंबात झाला. तिचे वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असल्याने त्यांची मावळ तालुक्यात बदली होत असे. पुण्यात स्थायिक असणारे पवार कुटुंबीय सुट्टीसाठी वडिलांच्या बदलीच्या ठिकाणी जात. हा प्रदेश निसर्गाने नटलेला. त्यातून निसर्गभ्रमंतीची आवड पूजा यांच्यामध्ये रूजू लागली. शालेय जीवनात या आवडीला ट्रेकिंगच्या निमित्ताने बहर आला. म्हणूनच महाविद्यालयीन शिक्षण हे निसर्गासंदर्भात घेण्याचा त्यांचा निर्णय पक्का झाला. पुण्यात विज्ञान शाखेमधून त्यांचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. पुढे दापोली कृषी विद्यापीठात ‘वनशास्त्र’ विषयात पदवीचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळवला. दापोली हा निसर्गाने संपन्नच तालुका असल्याने पूजा यांची जंगलाशी नाळ अधिक घट्ट झाली.
वनशास्त्राचे शिक्षण हे समाजाभिमुख असल्याकारणाने पूजा यांच्या विचारांना नवा आयाम मिळत गेला. सुट्टीच्या काळात त्यांनी देशातील नामांकित संशोधकांसोबत साहाय्यक म्हणूनदेखील काम केले. त्यामुळे प्रत्यक्ष संशोधनातील बारकावे अनुभवता आले. या सगळ्या अनुभवातून पदव्युत्तर शिक्षण हे वन्यजीवांसदर्भात घेण्याचा निर्णय पक्का झाला. म्हणूनच 2014 साली त्यांनी बंगळुरुच्या ’नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस’ (एनएसीबीएस) या संस्थेत ’वाईल्डलाईफ बायोलॉजी अॅण्ड कॉन्झर्वेशन’ या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला. देशातील 15 विद्यार्थ्यांची या अभ्यासक्रमासाठी निवड झाली होती, ज्यामध्ये पूजा यांचा समावेश होता. ’एनएसीबीएस’च्या अभ्यासक्रमात पूजा यांना वैज्ञानिक अभ्यास कशा पद्धतीने करावा, याचा दृष्टिकोन मिळाला. एखादा विषय आपण आवड म्हणून निवडतो. मात्र, त्या विषयाला वैज्ञानिक कंगोरे कसे द्यावे, याची समज या अभ्यासक्रमामुळे पूजा यांना मिळाली.
पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणादरम्यानच पूजा यांना वनांवर आधारित संशोधनामध्ये रस निर्माण झाला होता. जंगलाची पोत कशा पद्धतीने बदलते, त्याचे र्हासामध्ये कशापद्धतीने रुपांतर होते, यासंदर्भातील अभ्यास करण्यात त्यांचा कल तयार झाला होता. पण, जंगलावर होणारे परिणाम तपासण्यासाठी एखादी वन्यजीव प्रजाती केंद्रस्थानी ठेवणे गरजेचे होते. पूजा यांना सुरुवातीपासूनच पक्षीनिरीक्षणाची आवड असल्याने यासाठी त्यांना एखादा पक्षी निवडणेच योग्य वाटले. मग शोध झाला अशा एखाद्या पक्ष्याचा, ज्याची संपूर्ण जीवनपद्धती ही पूर्णपणे जंगलावर अवलंबून असेल. हा शोध थांबला धनेश पक्ष्यावर येऊन. धनेश पक्ष्यांची जीवनपद्धती ही पूर्णपणे जंगलावर अवलंबून आहे. शिवाय, पक्ष्यांमध्ये धनेश प्रजातीचे पक्षी दीर्घायुषी आहेत. त्यामुळे मोठ्या कालावधीसाठीदेखील जंगलांच्या रुपांतरणाचा अभ्यास करता येऊ शकेल, या विचाराने पूजा यांनी धनेश पक्ष्याची निवड केली आणि या पक्ष्याबरोबर त्यांचा ऋणानुबंध निर्माण झाला.
जंगलांचा होणारा र्हास धनेश पक्ष्यांच्या वर्तनामध्ये कशा पद्धतीने बदल घडवतो, त्यांच्या संख्येत कसा बदल घडतो, त्यामागची कारणे काय असतात, यासंदर्भातील अभ्यास पूजा यांनी आजवर केला आहे. अन्नामलाईच्या जंगलातील कॉफीच्या लागवडीमधील धनेश पक्ष्याच्या विणीवर होणारे परिणाम, खाद्यांमध्ये होणारे बदल पूजा यांनी तपासले. अधिवास बदलामुळे तेथील धनेश पक्ष्यांनी विदेशी वृक्षांची फळे खाण्यास सुरुवात केल्याची महत्त्वपूर्ण नोंद पूजा यांनी संशोधनाअंती केली आहे. याशिवाय, कॉफी, रबर यांसारख्या लागवडीखालील क्षेत्रांमध्ये धनेश पक्षी वर्षभर राहतात की विणीपुरते त्याठिकाणी अधिवास करतात, याचादेखील मागोवा त्यांनी घेतला आहे. एखाद्या विशिष्ट अधिवासात मलबारी राखी धनेशाची संख्या ही त्या अधिवासातील फळांच्या उपलब्धतेवर अवलंबून असल्याचा ऊहापोहही पूजा यांनी संशोधनाअंती केला.
पूजा यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने ’पुणे बर्ड अॅटलास’ हा उपक्रमही राबविला. ’बर्ड अॅटलास’ हा ’सिटिझन सायन्स प्रोजेक्ट’ असल्याने प्रशिक्षणाअंती सर्व स्तरातील लोकांच्या सहभागातून पक्षी संवर्धनाची चळवळ तयार करण्यात आली. यातून शहरातील पक्ष्यांचा नकाशा साकारण्यात आला होता. ज्यामधून पुणे शहरातील पक्ष्यांच्या प्रजातींचे हॉटस्पॉट कळले. सध्या पूजा या धनेशावर आधारित पीएचडी संशोधन करत आहेत. ’नेचर कॉन्झर्वेशन फाऊंडेशन’ या संस्थेत डॉ. रोहित नानिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे संशोधनकार्य सुरू आहे, ज्यामध्ये अधिवासांमध्ये होणारा बदल, भौगोलिक बदल आणि मानवनिर्मित बदल हे धनेशांच्या अनुवांशिक बदलाला कारणीभूत ठरत आहेत का, याचा मागोवा घेण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. विशिष्ट पक्ष्याला केंद्रस्थानी ठेवून अधिवासात होणार्या बदलांना हुडकणार्या पूजाला दै. ’मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा!