अलीकडच्या रेल्वे अपघातांच्या मालिकेमुळे या प्रवासाच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. रेल्वे मंत्रालयाने गाड्यांच्या एकाच रुळावरील असे जीवघेणे अपघात टाळण्यासाठी ‘कवच’ ही यंत्रणाही विकसित केली. पण, देशातील दीड हजार किमी रेल्वेमार्गांवरच ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, अजून बराच लांबचा पल्ला प्रशासनाला गाठायचा आहे. तेव्हा, या रेल्वे अपघातामागची नेमकी कारणं आणि ‘कवच’ सुरक्षा यंत्रणेची आवश्यकता विशद करणारा हा लेख...
पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात ‘कांचनजंगा एक्सप्रेस’ला सोमवार, दि 17 जूनला मालगाडीने जोरदार धडक दिल्याने ‘कांचनजंगा एक्सप्रेस’चे मागील तीन डबे रूळावरून घसरले. मालगाडी थेट एक्सप्रेसच्या उचललेल्या डब्यांच्या खाली रूळावर जाऊन थांबली. या अपघातात आठ प्रवासी व दोन रेल्वे कर्मचार्यांचा मृत्यू झाला. शिवाय, 40 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले. प्राथमिक निरीक्षणानुसार मालगाडीच्या चालकाने वेगमर्यादा ओलांडल्याने हा अपघात घडल्याचे निष्पन्न झाले.
‘कांचनजंगा एक्सप्रेस’ आगरतळा येथून कोलकात्याजवळील सियालदा स्थानकाकडे जाण्यासाठी निघणार होती. राज्याच्या उत्तरेकडील न्यू जलपाईगुडी स्थानकापासून 30 किमी अंतरावरच्या रंगपाणी स्थानकावर ही गाडी उभी होती. पण, सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मागून येणार्या मालगाडीने एक्सप्रेसला मोठी धडक दिली. या धडकेची टक्कर एवढी भीषण होती की, एक्सप्रेसचे दोन डबे रूळावरून घसरले व तिसरा डबा वर उचलला गेला व मालगाडीच्या इंजिनाला अडकून हवेत लटकला. मालगाडी मात्र एक्सप्रेसच्या खाली जाऊन थांबली.
अपघातानंतर तत्काळ मदतकार्यास सुरुवात झाली. जखमींना राज्याच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक प्रवासी दुर्घटनाग्रस्त डब्यांमध्ये अडकल्याने राज्य व केंद्र सरकारच्या यंत्रणांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले. या अपघातात मालगाडीचा चालक व ‘कांचनजंगा एक्सप्रेस’चा गार्ड अशा दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने माहिती दिली. मोठी वाहने जाण्यासाठी तेथे पोहोचण्याचा रस्ता थोड्या भागाकरिता अरुंद असल्याने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव थेट मोटरसायकलने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातग्रस्तांसाठी मदत जाहीर केली. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी रु. दहा लाख, गंभीर जखमींना प्रत्येकी रु. 2 लाख, 50 हजार व किरकोळ जखमींना रु. 50 हजारांची मदत जाहीर केली. याखेरीज ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी’मधून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख व जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर झाली आहे.
रेल्वेला ‘कवच’ प्रणाली नव्हती
रेल्वे अधिकार्यांनी या अपघाताचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांना लक्षात आले की, गुवाहाटी-दिल्ली मार्गावर ‘कवच’ प्रणाली कार्यान्वित केलेली नव्हती. या मार्गासाठी ‘कवच’ यंत्रणा ही स्वयंचलित टक्करविरोधी संरक्षणप्रणाली म्हणून काम करते व ती सर्व रेल्वेमार्गांवर कार्यान्वित करण्याची योजना रेल्वेने आखली आहे. मात्र, अद्याप ही प्रणाली काही रेल्वेमार्ग सोडल्यास सर्व मार्गांवर अस्तित्त्वात आलेली नाही. तसेच हा अपघात मानवी चुकीमधून घडला असल्याचे रेल्वे मंडळाच्या अध्यक्षा जया वर्मा सिन्हा यांनी स्पष्ट केले. मालगाडीच्या चालकाने सिग्नल यंत्रणेकडे दुर्लक्ष केले व मालगाडी तिप्पट वेगाने चालू ठेवली व त्यामुळे ती ‘कांचनजंगा एक्सप्रेस’ला धडकली.
सिग्नल यंत्रणेत बिघाड
स्वयंचलित सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मालगाडीला सिग्नल चुकविण्याची अनुमती राणीपात्रा स्टेशनमास्तरने दिली होती, असे रेल्वेच्या अंतर्गत कागदपत्रांतून समोर आले आहे. राणीपात्रा येथील सिग्नल यंत्रणेत सोमवारी पहाटे 5.50 वाजेपासूनच बिघाड झाला होता. त्यामुळे राणीपात्राच्या स्टेशन मास्तरने सर्व लाल सिग्नल चुकवून पुढे जाण्याची अनुमती अपघातग्रस्त मालगाडीला दिली होती. मालगाडी 40 किमीपेक्षा जास्त वेगाने धावत होती. परंतु, मालगाडीच्या वेगाची मर्यादा फक्त ताशी 15 किमी असल्याचा नियम आहे. सिग्नल यंत्रणा बिघडली म्हणून मालगाडी चालकाला तिप्पट वेगाने जाण्याची परवानगी कशी दिलीस गेली? राणीपात्रा स्थानकावर सिग्नल यंत्रणा बिघडली, हे कळल्यावर दोन लेव्हल क्रॉसिंगसुद्धा मालगाडीने ओलांडले. तेव्हाच मालगाडीच्या चालकाने वेग कमी ठेवला असता, तर कदाचित हा अपघात घडला नसता.
रेल्वेचे मुख्य अभियंता काय म्हणतात?
रेल्वेचे पूर्व मुख्य अभियंता आलोक कुमार वर्मा म्हणतात की, “ ‘कांचनजंगा एक्सप्रेस’ व मालगाडीच्या टक्कर झालेल्या अपघातात कमीतकमी नऊ माणसे मृत झाली व 40 पेक्षा अधिक माणसे जखमी झाली आहेत. 1995 सालापासून आपल्या देशात रेल्वेचे सात मोठे व भीषण अपघात झालेले आहेत व त्यात अनेकजण मृत झाले आहेत. पाच अपघातांत सुमारे 200, तर 1995 सालातील फिरोझाबाद येथील टक्कर झालेल्या अपघातात सर्वात जास्त 358 जणांना मृत्यू आला होता. एक वर्षापूर्वी ओडिशामध्ये झालेल्या अनेक वाहनांच्या अपघातात 287 जणांना मृत्यू आला होता.
रेल्वेच्या नियोजनकारांचे म्हणणे आहे की, भारतासारख्या लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या देशात रेल्वेचे मोठे जाळे असे असावयास हवे की, रेल्वेने प्रवासी मिळविण्यासाठी रस्त्यावरच्या व हवाई वाहतुकीच्या प्रवाशांपेक्षा कमी टक्के वाढ होत राहिली आहे. रेल्वेने जास्त प्रवासी कसे मिळतील, याकडे लक्ष द्यावयास हवे होते, पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. प्रवाशांची संख्या कमी होत आहे. 2010 ते 2012 फ्रेट व ट्रॅफिकसुद्धा तेवढेच राहिले आहे. याउलट, रस्त्यावरच्या व हवाई वाहतुकीमध्ये दरवर्षी सहा ते बारा टक्के वाढ होत राहिली आहे. याउलट 2014-15 ते 2019-20 या काळात पॅसेंजर ट्रॅफिक 995 अब्ज प्रवाशांवरून आकडा 914 अब्ज प्रवाशांपर्यंत कमी झाला आहे आणि फ्रेट अब्ज टन किमी 682 वा 739 आकड्यांवर स्थिर राहिले आहे.
तसेच रेल्वेची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा वेगदेखील वाढवायला हवा. परंतु, रेल्वेचा सरासरी वेग 50 ते 51 ताशी किमी राहिला आहे. नियोजनाप्रमाणे तो 75 ताशी किमी असायला हवा. मालगाडीचासुद्धा वेग कमी राहिला आहे.
‘कवच’ यंत्रणा नसल्याने अपघाताला आमंत्रण!
रेल्वेच्या जया वर्मा सिन्हा म्हणतात, “रेल्वेच्या सुरक्षेस आमचे नेहमीच प्राधान्य असते. रेल्वेमार्गावर सर्वत्र ‘कवच’ प्रणाली असावी. यासाठी आमचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 1 हजार, 500 किमी रेल्वेमार्गावर ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. चालू वर्षअखेरीस आणखी तीन हजार किमी मार्गावर ती स्थापित करण्यात येईल.”
आजकालच्या रेल्वे विकासात चकचकीतपणा, रेल्वे स्थानक कसे असावे, सुसज्ज व अगदी पंचतारांकित असलेले फलाट कसे असावे, तर लांबचलांब व गुळगुळीत स्थानकावर काय असावे, केशकर्तनालये रंगीबेरंगी दुकाने, ‘वंदे भारत’ व ‘तेजस’सारख्या गाड्यांमध्ये विमानासारखी व्यवस्था हवी. पण, एका महत्त्वाच्या विषयाकडे रेल्वेचे दुर्लक्ष झाले. ते म्हणजे, सुरक्षितता. ‘कवच’ यंत्रणा व आधुनिक न बिघडणारी सिग्नल यंत्रणा अजून रेल्वेने जरूरी असूनही बसविलेली नाही आणि त्यामुळे असे अपघात होत आहेत. आज देशभराच्या 68 हजार किमी रेल्वेमार्गांपैकी फक्त 1 हजार, 500 किमीपुरतीच ही ‘कवच’ प्रणाली सुरक्षासुविधा उपलब्ध असावी, हे सत्य आहे.
संपुआपेक्षा रालोआ काळात रेल्वेचे कमी अपघात
पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे सोमवार, दि 17 जून रोजी झालेल्या रेल्वे अपघात प्रकरणी काँग्रेसने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका करताना त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण, यानिमित्ताने संपुआपेक्षा रालोआ काळातील रेल्वे अपघातांची संख्या कमी असल्याचे आकडेवारी पाहता स्पष्ट होते. तसेच, सुरक्षिततेकरिता मोदी सरकारने कवचसारखी प्रणाली विकसित करण्याचे ठरविले आहे. संपुआकाळात त्यासंबंधी कवचप्रणाली व आधुनिक सिग्नलयंत्रणा अशा कोणत्याही ठोस उपाययोजना झालेल्या नव्हत्या.
काँग्रेसने सरकारला लक्ष्य बनवून “अश्विनी वैष्णव या रील बनविण्यात व्यस्त असतात,” अशी खोचक टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
रालोआ सरकारने प्राधान्याने अपघातशून्य सिग्नलयंत्रणा व कवचप्रणाली लवकर बसवावी, म्हणजे कमी अपघात होतील. सबंध जगात कवचप्रणाली व आधुनिक सिग्नल्समुळे अपघातशून्य रेल्वे बांधल्या जात आहेत, त्याकडे लक्ष द्यावे.
दोन रेल्वेगाड्या समोरासमोर आल्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वेकडून ‘कवच’ प्रणाली विकसित करण्यात यश मिळविले आहे. त्याबाबतच्या आवश्यक सर्व चाचण्याही यशस्वी झाल्या आहेत. आगामी काळात ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. ‘कवच’सारखी यंत्रणा रेल्वेगाड्यांमध्ये कार्यान्वित करण्यासाठी साधारण प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा खर्च येतो. मात्र, ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेच्या माध्यमातून तयार झालेली कवचप्रणाली प्रत्येकी 50 हजार रुपयांत तयार झाली आहे. तेव्हा, रेल्वेला सुरक्षेचे हेच ‘कवच’ अशा मोठ्या अपघातांमधून टाळू शकेल, हे नक्की!
अच्युत राईलकर