इंडी आघाडीने संसदीय परंपरा मोडली! देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक
25-Jun-2024
Total Views |
नवी दिल्ली : भारताच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. भाजप्रणित एनडीएने राजस्थानमधील कोटा येथील खासदार ओम बिर्ला यांना अध्यक्षपदाचा उमेदवार घोषित केल्यानंतर, इंडी आघाडीने सुद्धा के सुरेश यांना उमेदवारी दिली. दोन्ही नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
लोकसभेच्या अध्यक्षांची निवड ही बिनविरोध व्हावी, अशी संसदीय परंपरा आहे. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात आले. सरकारकडून विरोधी पक्षातील नेत्यांसोबत अध्यक्षपदी ओम बिर्लांची निवड बिनविरोध करण्यासाठी चर्चा करण्यात आली होती. मात्र, इंडी आघाडीने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप, सरकारने केला आहे.
विरोधकांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी उपाध्यक्षाचे नाव घोषित करावे, अशी अट घातली होती. पण, ही संसदीय परंपरेला धरुन नसल्यामुळे सरकारने मान्य केली नाही. सरकारच्या या निर्णयाला विरोध म्हणून इंडी आघाडीने लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे देशाच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. एनडीएकडे बहुमतापेक्षा जवळपास २० खासदार जास्त असल्यामुळे ओम बिर्ला यांचा विजय निश्चित मानला जात आहे.