मार्क्सवादी गुंडांचा हिंदू साम्राज्यदिनास विरोध!

    24-Jun-2024   
Total Views |
marxist and hinduism kerala local


लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये भाजपला एक जागा मिळाली. तो रागही मार्क्सवादी गुंडांच्या मनात असावा. त्यातूनच संघ परिवारातील कार्यकर्त्यांवर, त्यांच्या घरांवर, उत्सवांच्या ठिकाणांवर हल्ले करण्याचा घटना घडत आहेत, हे उघड आहे.

केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि संघ परिवाराच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होण्याचे प्रकार काही नवीन राहिलेले नाहीत. केरळमध्ये या संघर्षात आतापर्यंत 225हून अधिक कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. पण, असल्या भ्याड हल्ल्यांना न घाबरता, त्या राज्यात संघकार्य वाढतच आहे. तेच तेथील मार्क्सवादी संघटनांचे दुखणे. कन्नूर जिल्ह्यातील पय्यान्नुरलगतच्या मार्क्सवाद्यांचा प्रभाव असलेल्या करिवेल्लूर नावाच्या गावात एका संघ स्वयंसेवकाच्या घरी हिंदू साम्राज्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक झालेला दिवस संघामध्ये सर्वत्र उत्सवाच्या रूपात साजरा केला जातो. त्याप्रमाणे केरळमध्ये एका स्वयंसेवकाच्या घरात या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भाजप मंडल समितीचे सदस्य कुन्दतील बालन यांच्या घरी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवास 20 स्वयंसेवक उपस्थित होते.

पण, तेवढेही मार्क्सवाद्यांना सहन झाले नाही. या गावात मार्क्सवाद्यांचा प्रभाव असल्याने सुमारे 100 मार्क्सवादी जेथे उत्सवाचे आयोजन केले होते, त्या घराभोवती जमले आणि त्यांनी उत्सव संपल्यानंतर सुमारे तीन तास धमकाविणार्‍या घोषणा दिल्या. भीतीचे वातावरण निर्माण केले. संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत मार्क्सवादी गुंडांनी त्या घरास घेरले होते. पोलीस आल्यानंतरही या गुंडांकडून संघ आणि भाजपविरोधी घोषणाबाजी सुरूच होती. यासंदर्भात भाजप नेत्यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर मार्क्सवादी गुंडांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना त्या भागात दुसर्‍या दिवशी एक गंजलेली तलवार आणि दोन लोखंडी कांबी सापडल्या. हे साहित्य पोलिसांनी जप्त केले, पण यासंदर्भात कोणाविरुद्ध गुन्हा मात्र दाखल केला नाही. लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये भाजपला एक जागा मिळाली. तो रागही मार्क्सवादी गुंडांच्या मनात असावा. त्यातूनच संघ परिवारातील कार्यकर्त्यांवर, त्यांच्या घरांवर, उत्सवांच्या ठिकाणांवर हल्ले करण्याचा घटना घडत आहेत, हे उघड आहे.


अयोध्येत दक्षिणेच्या बदल्यात ‘व्हीआयपीसेवा’ नाही!

अयोध्येमधील राम मंदिरास भेट देण्यासाठी आणि रामललाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. तेथे येणार्‍या भाविकांना समान वागणूक दिली जावी, या हेतूने ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’ने काही नवीन मार्गदर्शकतत्त्वे घातली आहेत. मंदिरात दर्शनाला येणार्‍या भाविकांच्या कपाळावर चंदन लावण्यासाठी आणि भाविकांना चरणामृत देण्यासाठी तेथील पुजारी दक्षिणा घेत असत. तेथे येणारे भाविक आपल्या क्षमतेनुसार ही दक्षिणा पुजार्‍यांना देत. पण, आता त्यावर न्यासाने निर्बंध आणले आहेत. देवापुढे जे काही समर्पण केले जाईल, ते तेथील दानपेटीत अर्पण करावे, असे निर्देश न्यासाने दिले आहेत. मंदिरातील पुजारी कपाळाला चंदन लावण्यासाठी आणि तीर्थ देण्याच्या बदल्यात भाविकांकडून दक्षिणा घेत होते. पण, त्यावर न्यासाने तातडीने निर्बंध आणले आहेत. पुजार्‍यांना कोणत्याही स्वरूपात दक्षिणा न देता ती दानपेटीमध्ये टाकावी, असे न्यासाने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. असे निर्देश प्राप्त झाले असल्याचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी मान्य केले. मंदिराच्या गर्भगृहात प्रामुख्याने पुजारीवर्गाकडून असे घडत होते. त्यावर बंधन आणण्यासाठी न्यासाने हे नवे आदेश जारी केले आहेत. या निर्णयावर पुजारीवर्गाने नाराजी व्यक्त केली असली तरी न्यासाने जो निर्णय घेतला, तो आम्हावर बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. 22 जानेवारी रोजी रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशभरातून भाविक प्रचंड संख्येने अयोध्येस येत आहेत. सर्वच भाविकांची दर्शन जवळून व्हावे, अशी इच्छा असते. पण, ते शक्य नसते. त्यातून काही भाविक व्हीआयपी दर्शन घेण्याचा मार्ग निवडतात. अशा भाविकांना जवळून दर्शन घेता येत होते. तेथे असलेले पुजारी अशा भाविकांना चंदन लावत आणि तीर्थ देत. भाविकांकडून पुजार्‍यांना दक्षिणा दिली जात असे. त्यावरच आता न्यासाने निर्बंध आणले आहेत. अशी थेट दक्षिणा पुजार्‍यांना मिळू लागल्याने त्यांच्या उत्पन्नात चांगलीच भर पडू लागली. या सर्व पुजारीवर्गास न्यासाकडून नियमित वेतन दिले जाते. त्यामध्ये अशा दक्षिणेची भर पडत होती. मंदिराच्या मुख्य पुजार्‍यास दरमहा 35 हजार रुपये आणि अन्य सहायक पुजार्‍यांना दरमहा 33 हजार रुपये पगार देण्यात येतो. मंदिरात सुरू असलेली व्हीआयपी संस्कृती बंद करण्याचा निर्णय घेऊन न्यासाने एक चांगले पाऊल टाकले आहे, असे म्हणावे लागेल. चंदन लावणे आणि तीर्थ देणे हे बंद करण्याचा निर्णय न्यासाने सामूहिकपणे घेतला आहे. हा निर्णय चांगलाच आहे. पण, सर्वच भाविकांना मंदिर प्रवेशाच्यावेळी चंदन लावण्याची आणि दर्शन घेतल्यावर प्रसाद देण्याची व्यवस्था केल्यास न्यासाकडून तो एक चांगला पायंडा पडेल, असे वाटते.


बिहार सरकारचा निर्णय न्यायालयाकडून रद्द!

बिहार सरकारने 2023 मध्ये मागास जाती. अति मागास वर्ग, मागास जमाती आदींसाठीचे आरक्षण 50 टक्क्यांवरून 65 टक्के करण्यासाठी ज्या दुरुस्त्या केल्या होत्या, त्या पाटणा उच्च न्यायालयाने रद्द ठरविल्या आहेत. गेल्या 20 जून रोजी पाटणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारने घेतलेला निर्णय रद्द ठरविला. नोव्हेंबर 2023 मध्ये नितीशकुमार सरकारच्या कारकिर्दीमध्ये अन्य मागास जाती. अतिमागास वर्ग, मागास जाती /जमाती यांच्यासाठीचे आरक्षण वाढविण्याचा निर्णय घेतला होता. पण, पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या निर्णयाने घटनेच्या कलम 14, 15 आणि 16 मधील तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचे सांगून राज्य सरकारचा निर्णय रद्द केला. बिहार सरकारच्या या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अनेक फेरयाचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची कमाल मर्यादा 50 टक्के असेल, असा जो निर्णय दिला आहे, त्याचा हवालाही याचिका करणार्‍यांनी दिला होता.


द्रमुक खासदारांनी घेतली वादग्रस्त आर्चबिशपची भेट

लोकसभा निवडणुकीच्या काळात आपल्या ‘न्यू लीडर’ नावाच्या नियतकालिकाच्या संपादकीय लिखाणातून केंद्र सरकारवर टीका करणार्‍या आणि ख्रिस्ती मतदारांवर प्रभाव पाडणार्‍या आर्चबिशप अन्तोनीसामी यांची चेन्नईमध्ये लोकसभा मतदारसंघाचे खासदार दयानिधी मारन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुकच्या खासदारांनी भेट घेतली. धार्मिक भावना प्रभावित करणारे वक्तव्य केल्याबद्दल हे आर्चबिशप टीकेचे लक्ष्य झाले होते. त्याच आर्चबिशपची भेट आणि आशीर्वाद घेण्यासाठी हे द्रमुक खासदार गेले होते. आर्चबिशपच्या वक्तव्याबद्दल ‘लीगल राईट्स प्रोटेक्शन फोरम’ने या पूर्वीच निवडणूक आयोगाकडे चिंता व्यक्त केली आहे. मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी आपल्या समाजाच्या नियतकालिकातून सदर धर्मगुरू जातीयवादी प्रचार करीत असल्याची तक्रार ‘लीगल राईट्स प्रोटेक्शन फोरम’ने दि. 29 एप्रिल रोजी आयोगाकडे केली होती. आयोगाने त्या तक्रारीची दखल घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. लोकसभेचे अधिवेशन सुरू होण्याच्या आधी द्रमुकच्या तीन खासदारांनी या आर्चबिशपची भेट घेतली. आर्चबिशपने निवडणुकीच्या दरम्यान जे साहाय्य केले, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही भेट घेतली गेली, अशी टीका करण्यात येत आहे. तामिळनाडूमध्ये ख्रिश्चन आणि मुस्लीम समाजाचे द्रमुकसमवेत साटेलोटे असल्याची गोष्ट तशी नवी नाही. ख्रिश्चन समाजाच्या मागण्यांना आपण प्राधान्य देऊ, असे आश्वासनही मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी ख्रिसमस मासमध्ये दिले होते. हे सर्व लक्षात घेता, द्रमुकच्या बाजूने तामिळनाडूमधील ख्रिस्ती धर्मगुरू कसे सक्रिय झाले होते, याची कल्पना येते.

दत्ता पंचवाघ
9869020732

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.