बालीच्या किनारपट्टीची धूप

    24-Jun-2024   
Total Views |
bali sea coast warned about tidal waves
 

दक्षिण पूर्व आशियामधील इंडोनेशिया या द्वीपसमूह. येथील सुप्रसिद्ध बालीच्या किनारपट्टीची मानवी क्रिया आणि लाटांमुळे मोठ्या प्रमाणात धूप होत असल्याचे नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे. बालीचा समुद्रकिनारा 2016 ते 2021 दरम्यान 668.64 किमीवरून 662.59 किलोमीटरपर्यंत आक्रसल्याची माहिती इंडोनेशिया आणि तुर्कीयेमधील संशोधकांच्या गटाने दिली. त्यांचा शोधनिबंध नुकताच ‘रिजनल स्टडीज इन मरीन सायन्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. जागतिक स्तरावर 24 टक्के वाळू असलेले किनारे प्रतिवर्ष 0.5 मीटरपेक्षा जास्त दराने कमी होत आहेत.

अमेरिकेमधील किनारपट्टीची धूप झाल्यामुळे दरवर्षी अंदाजे 500 दशलक्ष मालमत्तेचे नुकसान होते. या अहवालात असेही म्हटले आहे की, सतत होणारी धूप आणि समुद्राच्या पातळीत होणार्‍या वाढीमुळे पूरस्थिती निर्माण होईल. यामुळे आसपासच्या परिसंस्था, पायाभूत सुविधा आणि समुदायांना धोका निर्माण होऊ शकतो. बालीचे किनारपट्टी क्षेत्र तेथील सामाजिक-आर्थिक आणि सांस्कृतिक वारशासाठी महत्त्वपूर्ण आहे. हा भाग पर्यटनाद्वारे अर्थव्यवस्थेला चालना देतो आणि या जागेला सांस्कृतिक, पारंपरिक आणि धार्मिक महत्त्वदेखील आहे. एकूणच आशिया खंडातील देशांची किनारपट्टी वाढती समुद्रपातळी आणि वेगवान विकासामुळे धोक्यात आहे. किनारपट्टीची धूप करण्यासाठीचे अपुरे नियोजन आणि निधीच्या कमतरेमुळे या प्रश्नाने गंभीर रुप धारण केल्याचे दिसते.

संशोधकांनी यासंबंधी 2016-22 या सहा वर्षांच्या प्रगतपद्धती आणि डेटाचे विश्लेषण केले. मार्च 2023 मध्ये बाली प्रांताच्या किनारपट्टीवर क्षेत्रीय सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये असे लक्षात आले की, बालीच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर बहुतेक वालुकामय किनार्‍याची धूप झाली आहे, ज्यामध्ये दक्षिण-पश्चिम आणि आग्नेय किनारपट्टीचा समावेश आहे, जसे की जेमब्राना, ताबानान, बडुंग, देनपसार, ग्यान्यार, क्लुंगकुंग आणि करंगासेम जिल्ह्यांचा समावेश आहे. विविध भागात झालेल्या विमानतळ विस्तार, फ्री वे बांधकाम आणि किनार्‍यावरील हॉटेल्स यांसारख्या पर्यटनास समर्थन देण्यासाठी जलद विकासामुळे पर्यावरणीय आव्हाने वाढली आहेत. 2022च्या एका शोधनिबंधात असे दिसून आले की, बालीच्या 22 टक्के किनार्‍याला अत्यंत असुरक्षित म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. ‘इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’ अर्थात ‘आयपीसीसी’नुसार गेल्या 25 वर्षांत समुद्राची पातळी दरवर्षी सरासरी 2.5 मिलिमीटर (0.09 इंच) वाढली आहे.

नव्याने प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात असेही आढळून आले आहे की, बालीमध्ये 1.25 किमी 2 (0.48एमआय 2) किनारपट्टी वाढ दिसून आली आहे, विशेषत: अभ्यासाच्या कालावधीत बेट प्रांतातील धूप दर ओलांडला आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, जमीन आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे किनारपट्टी वाढण्यास हातभार लागला, तर मानवी हस्तक्षेपासह नैसर्गिक प्रक्रियांनी बालीच्या किनारपट्टीला कमी केले आहे. सीवॉल, वाळूच्या पिशव्या, ब्रेकवॉटर किंवा ग्रोइन्स या सारख्या किनारपट्टीवरील संरचना धूप होण्यापासून संरक्षण प्रदान करू शकतात. सीवॉलची किंमत आणि परिणामकारकता त्यांच्या आकारावर अवलंबून असते. या अभ्यासाच्या निष्कर्षांनी बालीसारख्या लहान बेटांवरील किनारपट्टी व्यवस्थापनाविषयी डेटा आणि विश्लेषणाची माहिती दिली आहे. बालीसारख्या लहान बेटाच्या किनारपट्टी व्यवस्थापनाला सर्वांगीण मॉडेलिंगची आवश्यकता आहे, जेणेकरून सर्वात प्रभावी मार्ग ठरवता येईल.

बालीच्या किनारपट्टीवरील बदलांची विस्तृत आणि सखोल माहिती मिळविण्यासाठी आणि भविष्यातील बदलांचा अंदाज घेण्यासाठी पुढील अभ्यास करणे आवश्यक आहे. जर आपण पुढील दहा किंवा 20 वर्षांच्या परिणामांबद्दल विचार केला, तर कदाचित हीच वेळ आहे थांबण्याची. दुर्दैवाने, बाली सरकारने बेटाच्या किनारपट्टीच्या व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक, एकात्मिक आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनासह मास्टर प्लॅन तयार करणे बाकी आहे. संशोधकांनी असे सुचवले आहे की, केवळ पर्यावरण संरक्षणावर लक्ष केंद्रित करणे पुरेसे नाही. कारण, निरोगी किनार्‍यासाठी किनारपट्टी समुदाय आणि परिसंस्थांचे संरक्षण करणे, यामधील संतुलन आवश्यक आहे.
 

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव. रामनारायण रुईया महाविद्यालयातून 'बी. एम. एम.' पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास.