रशियामध्ये चर्च आणि सिनेगॉगवर दहशतवादी हल्ला; १५ जणांचा मृत्यू तर २५ हून अधिक जखमी
24-Jun-2024
Total Views | 50
मॉस्को : रशियामध्ये रविवार, दि. २३ जून २०२४ दक्षिणेकडील दागेस्तान प्रांतातील दोन शहरांमध्ये (मखाचकला आणि डर्बेंट) दहशतवादी हल्ले झाले. या घटनेत १५ हून अधिक पोलिस ठार झाले, दहशतवाद्यांनी पाद्रीचा देखील गळा चिरून हत्या केली. प्रत्युत्तरादाखल रशियाच्या सुरक्षा दलांनी सहा बंदूकधारी दहशतवाद्यांना ठार केले.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी शस्त्रांनी सज्ज दहशतवाद्यांनी दोन ऑर्थोडॉक्स चर्च, एक ज्यू प्रार्थना गृह आणि पोलिस चौकीवर हल्ला केला. हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये ऑर्थोडॉक्स चर्चच्या धर्मगुरूंचाही समावेश आहे. दहशतवाद्यांनी त्यांचा गळा चिरून त्यांची हत्या केली. याशिवाय चर्चबाहेर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाचाही या हल्ल्यात मृत्यू झाला.
रशियन ज्यू काँग्रेसने यासंदर्भात म्हटले आहे की, डर्बेंट आणि मखाचकला येथील प्रत्येकी एका सिनेगॉगवर हल्ला करण्यात आला आहे. जेव्हा डर्बेंटमधील सिनेगॉगमध्ये हल्ला झाला तेव्हा प्रार्थना ४० मिनिटे आधीच संपली होती आणि तेथे कोणीही उपस्थित नव्हते. हल्लेखोरांनी मोलोटोव्ह कॉकटेल बॉम्बने सिनेगॉगच्या इमारतीला आग लावली. या वेळी बाहेर उभे असलेले पोलीस आणि सुरक्षा रक्षक या हल्ल्यात ठार झाले.
या संपूर्ण हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. परंतु, रशियाच्या सरकारी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, हल्लेखोर आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. रशियाने या हल्ल्यांसाठी युक्रेन आणि नाटो देशांना जबाबदार धरले आहे. "हे दहशतवादी हल्ले कोणत्या ना कोणत्या प्रकारे युक्रेन आणि नाटो देशांच्या गुप्तचर सेवांशी संबंधित आहेत यात शंका नाही," दागेस्तानचे नेते अब्दुलखाकिम गदझियेव यांनी टेलिग्रामवर लिहिले.
याआधी मार्चमध्ये रशियात दहशतवादी हल्ला झाला होता, अशी माहिती आहे. या हल्ल्यात १४३ जणांचा मृत्यू झाला होता. ISIS-K ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र यात युक्रेनचा हात असल्याचा आरोप रशियाने केला होता. यावेळी या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही, मात्र दागेस्तान हा रशियाचा मोठा मुस्लिम लोकसंख्या असलेला प्रांत असून तो चेचन्या या प्रदेशाला लागून आहे.