मुंबई : विलेपार्ले पूर्वेकडील पालिकेच्या राखीव भूखंडावर असलेल्या बाबासाहेब गावडे रुग्णालयाच्या नूतनीकरण प्रस्तावावरून वाद निर्माण झाला आहे. लिजवर चालवण्यास दिलेल्या रुग्णालयाबाबत गेल्या १२ वर्षात अनेक तक्रारी पालिकेत दाखल आहेत. दरम्यान आता कोणतीही पुरेशी माहिती नसताना नकाशे, रेखाचित्रे तयार करून नूतनीकरण प्रस्ताव सादर करणाऱ्या कंपनी आणि खासगी स्ट्रक्चरल अभियंत्याविरोधात कठोर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते सदानंद साटम यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.
यापूर्वीही नोव्हेंबर २०२२ मध्ये साटम यांनी रुग्णालयातील कथित अनियमिततेविरोधात केलेल्या तक्रारीनंतर मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडून रुग्णालयाला आर्थिक दंड ठोठवण्यात आला होता. दरम्यान अनाधिकृत अनियमित सुरु असलेली मेडिकल स्टोर्स, पूर्व परवानगी न घेता अंतर्गत फेरबदल केलेली अनाधिकृत कामे, अन्नपुरवठा दाराकडे विहित परवाना नसणे असे गंभीर आरोप तक्रारदार साटम सातत्याने करत आले आहेत. तसेच रुग्णालयातील कथित भ्रष्टाचाराची दखल न घेतल्यास संबंधित संस्था रुग्णालय घशात घालू शकते. त्यामुळे संस्थेचा नूतनीकरण प्रस्ताव तात्काळ रद्द करून रुग्णालय पालिकेने ताब्यात घ्यावे, अशी विनंती ही तक्रारदार साटम यांनी पालिकेकडे केली आहे.
पुन्हा एकदा तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार प्रकरणाची संपुर्ण माहिती घेऊन नियमानुसार कारवाई केली जाईल.
मनीष वळंजू (सहय्यक आयुक्त के\ पूर्व )
रुग्णालयाच्या बांधकामात अनाधिकृतपणे अनियमित फेरफार केलेल्या आहेत. ते नियमित करण्याकरता दंड आकारून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. त्यामुळे त्याची कारवाई विशेष कक्षात सुरु आहे. दरम्यान तक्रारदाराने सवलतीच्या दरातील उपचारासंदर्भात केलेल्या तक्रारी आरोग्य विभागाशी निगडीत आहे.
ललितकुमार शाह (सहाय्यक अभियंते मालमत्ता)
मराठा मंदिर संस्था आणि परांजपे ट्रस्ट यांच्यात झालेला करार रद्द करून पालिकेने गावडे रुग्णालय ताब्यात घ्यावे. ज्यामुळे विलेपार्ले येथील नागरिकांना न्याय मिळाले.
प्रदिप वेदक (माजी नगरसेवक)