संघर्ष, समन्वय जगण्याचा मंत्र!

    24-Jun-2024   
Total Views |
Anuprita jaibai more


साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यातील नायिका म्हणजे संघर्षशील आणि स्वाभिमानी. त्या नायिकांसारख्याच अनुप्रिता जाईबाई मोरे. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...

अनुप्रिता जाईबाई मोरे या बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील सामाजिक संवेदना जपणार्‍या धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या. महिलांनी सक्षम व्हावे, त्यांना स्वयंरोजगार प्राप्त व्हावा, यासाठी त्या कार्यरत आहेत. तसेच समाजात उच्चशिक्षितांचा टक्का वाढावा यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. गरिबीमुळे किंवा काही समस्यांमुळे आजही अनेकजण शिक्षणापासून वंचित राहतात. अनुप्रिता त्यांच्या संपर्कातील युवक-युवतींना उच्चशिक्षणासाठी मदत करतात. खेडेगाव सोडून शहरात राहून शिक्षण घेणार्‍या गरीब-होतकरू विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करतात. घरगुती हिंसेच्या बळी ठरलेल्या आयाबायांना मानसिक आणि प्रसंगी आर्थिक कायदेशीर मदतही उपलब्ध करून देतात.

तर अशा या अनुप्रिता मोरे एका ऑनलाईन दैनिकाच्या संपादक तसेच एका महाविद्यालयामध्ये सहप्राध्यापक. काही दिवसांतच पीएचडी मिळवून नावापुढे ‘डॉक्टरेट’ बिरूदावली लावतील, अशा अनुप्रितांच्या आयुष्याचा पट उलगडताना जाणवले की, त्यांनी आयुष्यातील समस्यांपुढे कधीही मान झुकवली नाही. मूळच्या धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील इटकुर गावच्या जाईबाई यांच्या कन्या अनुप्रिता. जाईबाई यांच्याही आयुष्यात प्रचंड संघर्ष. 80च्या दशकात इटकुरसारख्या खेड्यातून मातंग समाजाची पहिली मुलगी शिक्षणासाठी गावाबाहेर पडली, ती मुलगी म्हणजे जाईबाई. मात्र, उच्चशिक्षण, विवाहानंतर जाईबाईंना प्रचंड घरगुती हिंसेचे शिकार व्हावे लागले होते. पोटात बाळ असतानाच माहेरी राहावे लागले होते. अनुप्रितांच्या जन्मानंतर त्या अंगणवाडी पर्यवेक्षक म्हणून कामाला लागल्या. अनुप्रिता यांना घरी लाडाने ‘राणी’ म्हणत, तर या राणीला शाळेत प्रवेश घेताना मास्तरांनी शाळेच्या दाखल्यावर काय नाव लिहावे विचारले. जाईबाईंनी लेकीचे नाव सांगितले अनुप्रिता जाईबाई मोरे.

त्याकाळी केवळ आईचे नाव लावणे म्हणजे मोठा घोर प्रसंग वाटे. बाप कोण हे माहीत नसलेल्या लेकरांनाच आईचे नाव लावतात, असा सर्रास गैरसमज होता. याचा फटका अनुप्रिता यांना पुढे बसलाच.शाळेत त्या नेहमीच पहिल्या येत. लहानपणापासूनच त्यांना वाटे की, आपण प्रशासकीय अधिकारी व्हावे. त्याद्वारे समाजाची सेवा करावी. मात्र, बाप नसलेली मुलगी म्हणून त्यांना त्रास दिला जायचा. त्या काळात देशपांडे मॅडमने त्यांना खूप आधार दिला. दहावीला असताना अनुप्रिता यांच्या मानेला गाठ आली. त्या गाठीवर शस्त्रक्रिया करावी लागली. परीक्षा देता येईल की नाही, अशी स्थिती होती. मात्र, त्यांनी परीक्षा दिली. त्या उत्तीर्ण झाल्या. त्यांनी महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.

पुढे वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर पहिल्याच दिवशी अनुप्रिता यांना एका प्रसंगाला समोरे जावे लागले. महाविद्यालयाचा पहिला दिवस. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे नाव व ओळख सांगायची होती. अनुप्रिता यांनीही त्यांचे नाव अनुप्रिता जाईबाई मोरे, मूळ कळंब गाव, धाराशिव जिल्हा असे सांगितले. आईचे नाव लावते म्हणजे हिचा बाप कोण, अशी त्याचवेळी कुजबूज सुरू झाली. त्यानंतर ‘बाप नसलेली मुलगी’ असे म्हणत अनुप्रिता यांना टोमणे मारण्यात अनेकांनी धन्यता मानली. अपमान तर पदोपदी करण्यात आला. अपमान करणार्‍यांना जाब विचारल्याबद्दल पुन्हा त्या सगळ्यांनी मिळून अनुप्रिता यांना त्रास द्यायचाही प्रयत्न केला. अनुप्रिता यांनी ठरवले की, काहीही झाले तरी अजिबात निराश, दुःखी व्हायचे नाही. शिक्षण पूर्ण करायचे. ’बीएससी’ला असताना त्यांची आजी वारली आणि त्याच काळात आईही आजारी पडली. आजी रुग्णालयात असताना तिची सुश्रूषा आणि पुढे आईची सुश्रुषा, रुग्णालय आणि घर सांभाळून त्यानुसार त्या ‘बीएससी’ झाल्या आणि नोकरी करू लागल्या.

त्याच दरम्यान त्यांचा विवाह जातीतल्याच डॉ. रमेश लांडगे यांच्याशी झाला. मुलगी कमावती आहे, शिकलेली आहे यामुळे पसंती झाली. पण, गरिबीतून वर आलेले सासर अत्यंत कर्मठ रूढीवादी. मुलीचा बाप कोण, वगैरे त्यांनी सगळी चौकशी केली. त्यानंतर विवाह झाला. लग्नानंतर काही महिन्यांतच अनुप्रिता यांना मातृत्वाची चाहूल लागली, तर दुसरीकडे रमेश यांनाही चांगल्या नोकरीची संधी मिळाली. अनुप्रिता यांनी नोकरी सोडली. त्यानंतर कसे कोण जाणे, परिस्थिती पालटली. घरात भांडणे सुरू झाली. शेवटी अनुप्रितांना माहेरी पाठवण्यात आले. माहेरी आल्यावर अनुप्रिता यांना मुलगी झाली. त्यानंतर वर्षभराने रमेश पुन्हा त्यांना घ्यायला आले. पुन्हा नव्याने संसार झाला.

अनुप्रिता यांनी संसार सांभाळून ‘एमएससी’चे शिक्षण सुरू केले. ‘पीएचडी’चे शिक्षणही सुरू केले. त्यांनी महाविद्यालयात नोकरी केली. या सगळ्यादरम्यान त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली. कोरोना काळात त्यांनी जिवाची पर्वा न करता समाजकार्य केले. त्यांचा सगळा संघर्ष वैयक्तिक पातळीवरचा वाटतही असेल, पण ‘माझ्याकडे हे नव्हते, ते नव्हते, म्हणून मी काही करू शकले नाही,’ असे म्हणत अनुप्रिता रडत बसल्या नाहीत. आहे ती परिस्थिती स्वीकारत त्यातून त्यांनी मार्ग काढला. आपल्याला झालेला त्रास इतर कोणाला होऊ नये, यासाठी त्यांनी काम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाचा आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या विचारांचा समन्वय साधून, त्या त्यांचा वारसा चालवत आहेत, हे नक्की.

 9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.