रशिया-युक्रेन युद्ध गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ सुरू आहे आणि हे युद्ध केव्हा संपेल, याविषयी कुणीही सांगू शकत नाही. या युद्धामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, मोठी शस्त्रे, दारूगोळा यांचा प्रचंड वापर झाल्यामुळे दोन्ही बाजूला हजारो सैनिकांचा मृत्यू झाला, हजारो जखमी झाले, अनेक सैनिक युद्ध कैदी झाले आणि अनेक पळून पण गेले आहेत. ज्यामुळे रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना सैनिकांची कमतरता जाणवत आहे. खरंतर या युद्धाची आता तीव्रता कमी होण्याचे मुख्य कारण आहे, लढण्याकरिता सैनिकांची कमी. त्याविषयी...
या लेखांमध्ये रशिया त्यांच्या सैनिकांची कमतरता कशी पूर्ण करत आहे, यावरती आपले लक्ष केंद्रित करू. रशियाने त्यांच्या सैन्याची संख्या पुन्हा वाढवण्यासाठी शोधलेले मार्ग खालीलप्रमाणे आहेत.
- रशियाने सैन्यात भरती होण्यासाठी वयोमर्यादा 27 वरून 25 वर्षांपर्यंत कमी केली आहे.
- महिलांनाही लढण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. सध्या लष्करात महिलांचे प्रमाण फ़ार कमी आहे.
- लष्कराने देशभरात मोबाईल भरती केंद्रे स्थापन केली आहेत, ज्यामुळे तरुणांना सहजपणे भरती होता येते.
- गरीब नागरिकांना लष्करात सामील होण्यासाठी पगारात 30 टक्क्यांपर्यंत वाढ दिली जात आहे. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी मिळेल याची हमी दिली जाते.
- रशियाने 45 वर्षांपर्यंतच्या निवृत्त सैनिकांना सक्रिय सेवेत परत येण्यास सांगितले.
- निमलष्करी अनुभव असलेल्या नागरिकांनाही स्वयंसेवक लढाऊ बनण्यास प्रोत्साहित केले आहे.
- रशियाने स्थानिक नागरिकांनी बनवलेले एक लाख प्रादेशिक संरक्षण दल सक्रिय केले आहेत. हे सैनिकी पायाभूत सुविधांचे रक्षण करतात.
- रशिया, चीनकडे असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सैनिकांची कमी पूर्ण करत आहे. उदाहरणार्थ सैनिकांऐवजी यंत्रमानवाचा वापर.
वरील उपाययोजना करूनसुद्धा सैनिकांची कमी पूर्ण होत नसल्यामुळे, रशिया परदेशातील नागरिकांना पैशांचे आमिष दाखवून सैन्यात भरती करत आहे आणि त्यांच्या तुरुंगात असलेले लाखो रशियन कैदी पण युद्धात सैनिक म्हणून वापरत आहे.
रशियन सैन्यात भरती झालेल्या अनेक भारतीयांचा मृत्यू
रशियन सैन्यात भरती झालेल्या दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची बातमी 12 जूनला आली आहे. भारताने मॉस्कोला रशियन सैन्यात असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनासुद्धा त्वरित परत करण्याचे आवाहन केले आहे.
एजंटांकडून डझनभर भारतीयांना जास्त पगार आणि रशियन पासपोर्टचे आमिष दाखवून रशियन सैन्यासाठी लढण्यासाठी फसवले गेले. काही नागरिकांनी सांगितले की, त्यांना रशियामध्ये गेल्यावर रशियन सैन्यात फसवून भरती करण्यात आले, तर काही भारतीय स्वतः रशियन सैन्यात सामिल झाले होते.
रशियात आलेल्या अनेक तरुणांना, एक-दोन आठवड्याचे अत्यंत कमी प्रशिक्षण देऊन युद्धभूमीवरती पाठवले जाते. अनेक युवक मारले जातात किंवा गंभीर जखमी होतात. सैन्यात जायच्या आधी, त्यांच्याकडे असलेली सरकारी कागदपत्रे/ओळखपत्रे जप्त केली जातात. अशाप्रकारे त्यांना रशियात शोधणे, मुद्दाम कठीण केले जाते. रशियामध्ये स्थायिक असलेल्या काही भारतीय, अडकलेल्या भारतीयांना भारताच्या दूतावासाकडे पाठवून, परत आणण्याकरिता मदत करतात.
रशियाच्या कैदेतील युद्धबंदींचा सैनिक म्हणून वापर
या युद्धामध्ये रशियाने युक्रेनचे अनेक सैनिक पकडले आहे आणि ते रशियाच्या कैदेत आहेत. त्याप्रमाणे अनेक रशियन सैनिकांनी युक्रेनच्या सैन्यासमोर वेगवेगळ्या कारणाकरिता आत्मसमर्पण केले आहे, ते युक्रेनच्या कैदेत आहेत. रशिया युक्रेन दोन्ही राष्ट्रांमध्ये दुसर्या देशांचे हजारो सैनिक युद्धबंदी/कैदी आहे. रशियाने युद्धबंदी युक्रेन सैनिकांना त्यांच्या बाजूने लढण्याची ऑफर दिली आणि काही युक्रेन सैनिक, लढाईमध्ये सामील होण्याकरिता तयार झालेले आहेत आणि लढत पण आहेत. आज रशियाच्या तीन बटालियनमध्ये युक्रेन सैनिक आहेत, अशी बातमी आहे.
रशियाची युक्रेनमध्ये लढण्यासाठी कैद्यांची भरती
गेल्या वर्षी, युक्रेनमध्ये हजारो रशियन सैनिक मारले गेल्यानंतर लढण्याकरता सैनिकांची कमी पडू लागली. रशियन प्रायव्हेट आर्मी ‘वॅगनर’चे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांना तुरुंगात असलेल्या कैद्यांची भरती करण्याची परवानगी देण्यात आली होती. लाखो रशियन वेगवेगळ्या गुन्ह्यामुळे तुरुंगात कैदी आहेत. युक्रेनमध्ये ‘वॅगनर’साठी सहा महिन्यांच्या लढाईनंतर - जर ते जीवंत राहिले तर या कैद्यांना/गुन्हेगारांन घरी सोडण्याचं वचन ‘वॅगनर’चे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांनी असंख्य कैद्यांना भेट देऊन दिले होते आणि त्यांची शिक्षा माफ़ केली जाईल असे सांगितले होते. आता सैन्यात सामील झालेल्या कैद्यांना सांगितले जात आहे की युद्ध संपल्यानंतर त्यांना सैन्याच्या बाहेर जाता येईल आणि त्यांची उरलेली सजा माफ केली जाईल, म्हणजे त्यांचा वचनभंग झाला आहे.
‘वॅगनर’ने अनुभवी भाडोत्री सैनिकांसह अनेक कैदी तैनात केले. युक्रेनियन शहर बखमुतच्या लढाई मध्ये त्यांनी चांगले काम केले होते.
आठ हजारांहून जास्त कैदी आतापर्यंत युद्धात मारले गेले
परंतु, नंतर ‘वॅगनर’ प्रमुखांनी रशियाच्या सर्वोच्च नेतृत्वावर जाहीरपणे टीका केली, त्यांच्यावर ‘वॅगनर’ला मुद्दाम दारूगोळा न दिल्याचा आरोप केला. विद्रोह केल्यानंतर दोन महिन्यांनी, ‘वॅगनर’चे प्रमुखांचा ऑगस्ट 2023 मध्ये ‘वॅगनर’च्या इतर कमांडरांसह विमान अपघातात मृत्यू झाला. आता ‘वॅगनर’ऐवजी रशियन संरक्षण मंत्रालय युक्रेनमध्ये लढण्यासाठी कैद्यांची भरती करत आहे.
अशा कैदीच्या लष्करी तुकड्या ‘स्टॉर्म-झेड’ म्हणून ओळखल्या जातात. हे अक्षर व्लादिमीर पुतिन यांच्या युक्रेनविरुद्धच्या तथाकथित ‘विशेष लष्करी ऑपरेशन’ च्या प्रतीकांपैकी एक आहे.
‘वॅगनर’च्या कैदी युनिट्सप्रमाणेच ‘स्टॉर्म-झेड’ तुकड्यांना अनेकदा युद्धात भाग घेण्याकरता ’लरपपेप षेववशी’ म्हणून वापरले जाते. सैनिकांना असलेल्या धोक्यांचा फारसा विचार केला जात नाही. रशियन सैन्यातील इतर लष्करी तुकड्यांमधील सदस्यांना नियमभंग किंवा मद्यपान यांसारख्या अपराधासाठी शिक्षा म्हणून ‘स्टॉर्म-झेड’ तुकड्यांना पाठवले जाते.
‘स्टॉर्म-झेड’ युनिट्सच्या प्रशिक्षणात सामील लष्करी प्रशिक्षक म्हणतात, त्यांच्या सदस्यांना कमांडर्सकडून वाईट वागणूक मिळत आहे, म्हणून ते निराश होत आहेत. प्रकाशित झालेल्या गुप्तचर अपडेटप्रमाणे, कैदी सैनिकांची संख्या हजारामध्ये आहे. आतापर्यंत आठ हजारांहून जास्त रशियन कैदी युद्धातच मारले गेले आहेत.
विश्लेषण
रशियन सरकारने लष्करात सामील होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी रशियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या धर्मगुरूंचा वापर केला आहे. धर्मगुरूंनी देशभक्तीची भाषणे दिली आणि युद्धाचे ‘पवित्र’ संघर्ष म्हणून वर्णन केले आहे. तथापि, सैन्यभरती वाढली नाही.
रशियाने कैद्यांना सैन्यात भरती करून तातडीने सैन्यातील सैनिकांची संख्या वाढवली. यामुळे रशियाला काही फायदे मिळाले असले तरी, त्याचबरोबर काही गंभीर नुकसानदेखील सहन करावे लागले आहे. म्हणून हे धोरण तात्पुरता उपाय असू शकतो, परंतु दीर्घकाळासाठी ते नुकसानदायक ठरू शकते. युद्धाच्या दीर्घकालीन परिणामांवर विचार करणे आवश्यक आहे. रशियाने भविष्यात अधिक शिस्तबद्ध आणि नैतिक दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे.
(नि.) ब्रि. हेमंत महाजन