मुंबई : शुक्रवारी SNDT महिला विद्यापीठ आणि कैवल्यधाम योग संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या चर्चगेट आवारात उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला. २१ जून २०२४ रोजी कैवल्यधामच्या योग प्रशिक्षकांनी योग प्रोटोकॉलचे संचालन केले. यामध्ये कुलगुरु प्रा. उज्वला चक्रदेव आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालिका डॉ. कविता खोलगडे यांनी सहभाग घेतला. तसेच एलटी नर्सिंग कॉलेजच्या ५० मुलींनी सक्रिय यात सहभाग घेतला. कुलगुरु प्रा. उज्वला चक्रदेव, डॉ. कविता खोलगडे आणि मुलींनी विविध आसने आणि योगासने केलीत.
त्यानंतर त्याच दिवसाच्या उत्तरार्धात, पाटकर हॉलमध्ये दुसरा कार्यक्रम झाला. यामध्ये मुंबईच्या कैवल्यधाम योग संस्थानचे सहसंचालक रवी दीक्षित, प्रा. उज्वला चक्रदेव, प्र-कुलगुरु प्रा. रुबी ओझा, डॉ. कविता खोलगडे आणि डॉ. नितीन प्रभुतेंडोलकर, विद्यार्थी कल्याण सहायक डीन, प्रा. मेधा तापियावाला, अधिष्ठाता इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचा विषय 'महिला सक्षमीकरणासाठी योग' असा होता.
रवी दीक्षित यांनी ४५० विद्यार्थी, कर्मचारी तसेच उपस्थित मान्यवरांसाठी 'चेअर योगा' सत्राचे नेतृत्व केले. सत्रामध्ये जीव्हा बंध, सिंह मुद्रा, ब्रह्म मुद्रा यासारखी योगासने आणि ब्रह्मरी प्राणायाम व ओंकार जप यासारख्या मनशांतीसाठीच्या प्रथांचा समावेश होता.