मुंबई, दि.२१: गिरणी कामगार संपला आज ४२ वर्षे उलटली तरीही हजारो गिरणी कामगार अद्याप हक्काच्या घरापासून वंचित आहे. या गिरणी कामगारांना लवकरात लवकर घरे मिळावी या मागणीसह अन्य मागण्यांसह गिरणी कामगार वारस संघर्ष समितीने गिरणी कामगार सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांना निवेदन दिले. गुरुवार दि.२० जून२०२४ रोजी म्हाडा कार्यालयासमोर एकत्र येत गिरणी कामगारांनी निदर्शने केली.
या निवेदनात म्हंटले आहे की, गिरणी कामगारांचा संप १८ जानेवारी १९८२ रोजी झाला होता तो अजूनही मिटला नाही. संपाला ४२ वर्षे झाली तरी गिरणी कामगारांना न्याय मिळाला नाही. डीसी रुल मध्ये बदल करून गिरणी कामगारांना गिरणी बाहेर फेकले गेले. आम्हाला न्याय कधी मिळणार? रामाचाही १४ वर्षांनी वनवास संपला पण गिरणी कामगाराला ४२ वर्षे झाली तरी अजून न्याय मिळाला नाही. आजपर्यंत १,७५,४०० गिरणी कामगारांनी फॉर्म भरले आहेत त्यातील १६००० गिरणी कामगारांना घरं मिळाली आहेत उर्वरित गिरणी कामगार घराच्या प्रतिक्षेत आहेत.
मात्र या गिरणी कामगारांना घर कुठे मिळणार हा प्रश्न गिरणी कामगारांसमोर उभा राहिला आहे. १५ मार्च २०२४ ला राज्यसरकारने शासन निर्णय (GR) काढून गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर पाठविण्याचा डाव आखला आहे. गिरणी कामगारांना न्याय कधी मिळणार या आशेवर हजारो गिरणी कामगार देवाज्ञा झाले, हजारो जाण्याच्या मार्गावर आहेत, हजारो गिरणी कामगारांना घर घर लागली आहे. आम्ही जिवंत असेपर्यंत तरी घर मिळेल का? असा प्रश्न आम्हाला सतत विचारत आहेत.