मक्केतील गैरव्यवस्थेचे बळी

    20-Jun-2024   
Total Views |
As hundreds die from heat during the hajj


मक्का... जगभरातील मुसलमानांचे पवित्र श्रद्धास्थळ. आयुष्यातून एकदा तरी हजयात्रा करावी, अशी तमाम मुसलमानांची इच्छा. हजयात्रेसाठी जगभरातून लाखो मुसलमान सौदी अरेबियामध्ये दाखल होतात. यंदाही इस्लामी दिनदर्शिकेनुसार जून महिन्यात हजयात्रेकरुंनी मक्का गाठले खरे. पण, तेथील तापमानाने 50 अंश सेल्सिअसचा पारा ओलांडला आणि परिणामी उष्माघाताने एक हजारांहून अधिक हजयात्रेकरुंना प्राणाला मुकावे लागले. पण, हे बळी केवळ उष्माघाताचे नव्हे, तर ते मक्केतील गैरव्यवस्थापनाचेही बळी म्हणावे लागतील.

मक्केतील उष्माघातामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही आणखीन वाढू शकते आणि यापैकी बहुतांशी नागरिक हे एकट्या इजिप्तचे असल्याचेही समोर आले आहे. आकडेवारीनुसार, यंदाच्या हजसाठी 1.8 दशलक्ष नागरिक मक्केत दाखल झाले. विशेष म्हणजे, हजयात्रेकरुंचा प्रत्येक देशाला एक निश्चित कोटाही सौदीने निर्धारित केला आहे. पण, मर्यादित कोट्यामुळे यादीत नसलेले मुसलमान मात्र अन्यमार्गाने सौदीत प्रवेश करतात आणि मक्केला पोहोचतात. वृत्तसंस्थांनी या घटनेसंबंधी दिलेल्या माहितीनुसार, उष्माघातामुळे बळी पडलेल्यांपैकी बहुतांशी हजयात्रेकरु हे बेकायदेशीर मार्गांनी मक्केत पोहोचले होते. त्यामुळे त्यांची तेथील वातानुकूलित तंबूंमध्ये राहण्याची सोय नसल्याने रस्त्याच्या कडेलाच अनेकांनी बस्तान मांडले आणि उष्माघाताने त्यांचा घात केला. सौदी सरकारलाही गर्दीची पुरेपूर कल्पना होती. पण, त्या तुलनेत सरकारने मक्केत केलेली व्यवस्था फोल ठरली. अपुरे आणि चुकीच्या ठिकाणी उभारलेले तंबू, उपलब्ध तंबूंमध्येही प्रचंड दाटीवाटीने कोंबलेले यात्रेकरु, वातानुकूलित यंत्रणेतील बिघाड, झोपण्यासाठी गाद्यांची कमतरता, अपुरा पाणीपुरवठा, शौचालयांची कमतरता, वयोवृद्ध यात्रेकरुंसाठी अपुर्‍या सोयीसुविधा, आरोग्य व्यवस्थेवरील प्रचंड ताण आणि एकूणच गर्दीचे व्यवस्थापन करण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या व्यवस्थेचेच हे बळी...

प्रत्यक्षदर्शींनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, मक्केतील परिस्थिती इतकी भीषण होती की, हजयात्रेकरुंच्या मृतदेहाचे खच अक्षरश: रस्त्याच्या कडेला काही तास तसेच निपचित पडले होते. कालांतराने रुग्णवाहिकांच्या माध्यमातून या मृतदेहांना रुग्णालयात नेण्यात आले. पण, या संपूर्ण प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी सौदीच्या आरोग्य विभागातील अधिकारी जमील यांनी मृत पावलेले हजयात्रेकरु आधीच व्याधीग्रस्त असल्याची असंवेदनशील टीप्पणी केली. त्यामुळे हजयात्रेकरुंची प्रचंड मोठी संख्या लक्षात घेता, ती नियंत्रित करण्यापासून ते त्यांचा उष्माघातापासून बचाव करण्यापर्यंत सौदीची प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचेच यावरुन सिद्ध होते. मक्केमध्ये यापूर्वीही उष्माघातामुळे हजयात्रेकरुंचा बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. 1985 सालच्या हजयात्रेवेळीही तब्बल एक हजार यात्रेकरुंचा असाच मृत्यू ओढवला होता, तर गेल्या वर्षीही 200 यात्रेकरु हजदरम्यान मृत्युमुखी पडले होते. हा सगळा पूर्वानुभव लक्षात घेता, सौदी सरकारने हजयात्रेकरुंना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक होते. तसेच इतक्या मोठे संख्येने यात्रेकरुंची व्यवस्था करण्यासाठी मनुष्यबळ आणि पायाभूत सोयीसुविधा नसताना, गर्दी नियंत्रणासाठी कठोर पावले उचलणे भाग होते. पण, एरव्ही शिस्त, कठोर कायदे आणि नियमांचा डंका पिटणार्‍या सौदीला मात्र हजयात्रेदरम्यान यापैकी कशाचीही अंमलबजावणी करता येऊ नये, हे अनाकलनीयच!

जे घडले ते सर्वस्वी दुर्दैवीच. या प्रकरणी जगभरातील देशांनी हळहळ व्यक्त केली असली, तरी ज्या ज्या देशातील नागरिकांचे निधन झाले, त्या सर्व देशांनी, एकूणच ‘उम्मा’ने हा प्रश्नही आता चर्चेसाठी घ्यावा आणि मार्ग काढावा. अशीच एखादी दुर्दैवी घटना हिंदू सणवार, कुंभमेळ्यादरम्यान वगैरे घडल्यानंतर तावातावाने सरकारच्या नावावर खडे फोडले जातात. हिंदू प्रथा-परंपरांवर बोट ठेवले जाते. ‘कोविड’ काळात गंगेच्या घाटांवर जळणार्‍या मृतदेहांची जशी देशविदेशांतील वृत्तपत्रांनी मोठाली छायाचित्रे पहिल्या पानावर प्रसिद्ध केली, तशीच प्रसिद्धी मक्केतील या घटनेला दिली जाईल का? सौदी सरकारला अन्य मुस्लीम देश, जगभरातील पुरोगामी वा मानवाधिकार गँग जाब विचारण्याचे धारिष्ट्य दाखवतील का? की मक्केतील बळींची जबाबदारी ही निसर्गाचीच?

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची