नवी दिल्ली : आसाम सरकारचे गृह सचिव म्हणून कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी शिलादित्य चेतिया यांनी आत्महत्या केली आहे. कॅन्सरग्रस्त पत्नीच्या मृत्युने दुःख झालेल्या चेतिया यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपविले आहे. दरम्यान, कॅन्सर उपचारासाठी गुवाहाटीच्या नेमकेअर हॉस्पिटलमध्ये मृत घोषित केल्यानंतर काही मिनिटांनी चेतिया यांनी स्वतःवर गोळी झाडत आपले जीवन संपविले आहे.
दरम्यान, दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेमुळे परिचयास आलेले शिलादित्य चेतिया हे २००९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. तसेच, २०१५ मध्ये स्वातंत्र्यदिनी शौर्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले होते. त्याचबरोबर, विविध गुन्हेगार व दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाया केल्याबद्दल त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले होते. विशेष म्हणजे चेतिया आपल्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी गेल्या ०४ महिन्यांपासून रजेवर होते.
नेमकेअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक हितेश बरुआ म्हणाले, “गोळीबाराचा आवाज ऐकताच आम्ही धावत गेलो आणि चेतिया त्यांच्या पत्नीच्या मृतदेहाजवळ पडलेले आढळले. आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही. त्यांनी स्वतःवर गोळी झाडली होती. त्यांच्या पत्नीवर सुमारे दोन महिने रुग्णालयात उपचार सुरू होते. तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. आम्ही चेतिया यांना पत्नीच्या प्रकृतिबद्दल सांगत नेमका मुद्दा समजविला.”