राहुलची रायबरेली

    18-Jun-2024   
Total Views |
rahul gandhi raebareli constituency


काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळच्या वायनाड मतदारसंघातून विजय झाला. त्यानंतर राहुल गांधी हे वायनाड मतदारसंघातून राजीनामा देणार असून, रायबरेलीतून मात्र खासदारकी कायम ठेवणार असल्याचे जाहीर करण्यात आले. याचवेळी, वायनाडमधील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांना काँग्रेसने मैदानात उतरवण्याचीही घोषणा केली. त्यामुळे ‘रायबरेली आमचीच आणि पुन्हा वायनाडही आम्हीच जिंकू,’ असा संदेश या खेळीतून देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केलेला दिसतो. काँग्रेसने रायबरेलीत गांधी घराण्याचे वर्चस्व कायम राखण्याची अशी खेळी केली असली, तरी यानिमित्ताने काही प्रश्न निश्चितच उपस्थित होतात. रायबरेली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ. फिरोज गांधी, इंदिरा गांधी आणि नंतर सोनिया गांधी याच मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. १८व्या लोकसभेच्या निवडणुकीतही रायबरेलीतून राहुल गांधी यांनी भाजपचे उमेदवार दिनेश शर्मा यांचा ३ लाख, ९० हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. वायनाडपेक्षा रायबरेलीतील राहुल यांचे मताधिक्य अधिक. पण, केवळ मताधिक्य अधिक म्हणून रायबरेलीची जागा राहुलने राखली, असे अजिबात नाही. यातही साहजिकच राजकीय अर्थ दडला आहे. तो साधारण असा की, रायबरेली हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असून काँग्रेस अध्यक्ष, पंतप्रधानांनीही येथूनच निवडणूक लढवली होती. त्यामुळे हा वारसा आता राहुल यांच्याच हाती असल्यामुळे ही जागा त्यांनी कायम राखण्याचा निर्णय झाला. पण, जर राहुल गांधींनी वायनाडची जागा कायम ठेवत, रायबरेलीच्या पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी यांना उतरवले असते, तर आपसुकच प्रियांका गांधी या काँग्रेस पक्षाच्या राजकीय वारसदार असल्याचा संदेशही अप्रत्यक्षरित्या गेला असता. तो मात्र पद्धतशीरपणे टाळला गेला. तसेच, अमेठीमधून राहुल गांधी २०१९ साली पराभूत झाले होते आणि वायनाडमधून जिंकले होते. त्यामुळे काँग्रेसची उत्तर प्रदेश आणि पर्यायाने उत्तर भारतातील शक्ती क्षीण झाली होती. पण, यंदाच्या राहुल गांधींच्या रायबरेलीतील विजयाने काँग्रेसच्या आशा पुनश्च पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे रायबरेलीत पोटनिवडणूक टाळली गेली आणि रायबरेलीला जवळ करत, वायनाडला राहुल गांधींनी अलविदा केले.

वाड्रांचे वायनाड

५२ वर्षीय प्रियांका गांधी या खरेतर गेल्या २५ वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. परंतु, भावाचा राजकीय चेहरा आणि कारकिर्द प्रस्थापित करण्यासाठी प्रियांका गांधी यांना काँग्रेसकडून बॅकसीटवरच ठेवले गेले. तसेच ‘इंदिरा गांधींसारखे माझे नाक आहे,’ असे म्हणणार्‍या प्रियांका गांधी यांची लोकप्रियता वाढली, तर राहुल गांधींच्या लोकप्रियतेला ओहोटी लागेल की काय, म्हणून काँग्रेसने प्रियांकांबाबत ‘आस्ते कदम’ धोरण अवलंबिलेले दिसते. २०१९ साली उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची आणि २०२० साली संपूर्ण उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियांका वाड्रांवर सुपूर्द करण्यात आली. परंतु, २०२२च्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे हे ‘प्रियांका कार्ड’ फेल ठरले. कारण, काँग्रेसला केवळ दोन जागाच पदरात पाडता आल्या. त्यावेळी काँग्रेसला उत्तर प्रदेशात बहुमत मिळेल व प्रियांका वाड्रा मुख्यमंत्री बनू शकतात वगैरे रंगलेल्या चर्चाही सर्वस्वी फोल ठरल्या. त्यामुळे आपसुकच प्रचारात सक्रिय असलेल्या प्रियांका पदांच्या शर्यतीत मागे पडल्या. आताच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांना अमेठी, रायबरेली किंवा वायनाडमधूनही तिकीट दिले गेले नाही. त्यामुळे प्रियांका यांपैकी एकाही मतदारसंघातून जिंकू शकतील, याचीच खात्री काँग्रेसलाच नव्हती की प्रियांका यांना पहिल्याच निवडणुकीत चुकूनही पराभवाचा सामना करावा लागू नये, म्हणून त्यांना लोकसभेच्या रिंगणातून मुद्दाम दूर ठेवले गेले का, अशीही शंका व्यक्त करायला जागा आहेच. पण, आता प्रियांका यांना थेट वायनाडच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने मैदानात उतरवल्याने, उत्तरेतील आणि एकूणच पक्षातील त्यांच्या राजकीय नेतृत्वाच्या विषयाला तूर्तास तरी पूर्णविराम लागला आहे. तसेच रायबरेली नव्हे, तर वायनाडमधून प्रियांका यांना संधी देऊन, त्यांचे पक्षातील स्थानही राहुल गांधींनंतरचे असल्याचे अप्रत्यक्षरित्या सिद्ध होते. केरळमधील कम्युनिस्ट आणि समविचारी पक्षांशी मिळतेजुळते घेण्याचे राहुल यांनी व्यवस्थित न पेललेले आव्हानही, आता प्रियांका यांच्या माथी असेल. त्यामुळे वायनाडमधील अल्पसंख्यांकांच्या मतपेढीमुळे प्रियांका यांचा विजय सुकर असला, तरी त्यांना स्वतःलासिद्ध करावे लागेल. मुलाने आईचा आणि आता बहिणीने भावाचा मतदारसंघीय वारसा चालवण्याची अशी ही काँग्रेसी घराणेशाहीची परंपरा यंदाही कायम राहिल्याचेच हे द्योतक!


विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची