हिंदू अस्मितेसाठी संघर्ष

    17-Jun-2024   
Total Views |
west bengal violence

भळभळत्या जखमा घेऊन जगणार्‍या पश्चिम बंगालमध्ये हिंदूंविरोधात अत्याचार सुरूच आहेत. मात्र, त्याची धग आता विविध स्वरूपामध्ये बंगालमध्ये हिंदूंना सोसावी लागत आहे. तेथील शाळांमध्येही हिंदूंची कोंडी करण्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रघुनाथगंज सरकारी शाळेत एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना टिळा आणि तुळशीमाळ घालण्यास मनाई करणारा आदेशच जारी केला. यानंतर संतप्त विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात आंदोलन केले. मात्र, याचे मूळ खरे तर तेथील ममता सरकारच. असे निर्णय नव्हे, तर फतवे काढण्याची हिंमत हिंदूद्रोही ममता सरकारमुळेच होते. धक्कादायक बाब म्हणजे, शाळेतील अनेक विद्यार्थी शाकाहारी असूनही, त्यांना मांसाहारी मध्यान्ह भोजनाची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारीही विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. नंतर झालेल्या गोंधळानंतर शाळा प्रशासन ताळ्यावर आले आणि हे सर्व निर्णय मागे घेतले. मात्र, अशा पद्धतीने हिंदू धर्मीयांना स्वतःचा धर्म पाळताना बहुसंख्य हिंदू असणार्‍या भारतातील एका राज्यात संघर्ष करावा लागतो, ही खेदजनक आणि तितकीच दुर्दैवी बाब. डाव्यांनी बंगालमध्ये हिंसाचाराचे थैमान घातल्यानंतर ममतांनी स्वबळावर बंगालची सत्ता ताब्यात घेतली. मात्र, अशा पद्धतीने ही सत्ता राबविली की आजही बंगालच्या जनतेला डाव्यांचेच सरकार असल्याचा भास व्हावा. कारण, बंगालच्या स्थितीत काडीमात्रही फरक पडलेला नाही. भाजपने बंगालमध्ये चांगली मेहनत घेऊन संघटन बळकट केले. मात्र भाजप कार्यकर्ते, नेत्यांनाही त्यासाठी बंगालमध्ये जीव गमवावा लागला. सत्ता भाजपला मिळाली नाही, मात्र किमान संघर्ष करण्याची उमेद तरी त्यामुळे बंगालमधील हिंदूंना मिळत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अनेक भाजप कार्यकर्त्यांना संपवले जात आहे. अशा अनेक पीडितांना राजभवनाची पायरी चढू दिली जात नसल्याचा गंभीर आरोप बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी केला आहे. माजी राज्यपाल जगदीप धनखड यांनाही ममता सरकारच्या जाचाचा सामना करावा लागला होता. बंगालमध्ये हिंदू अस्मिता जपणे आता एक संघर्ष बनत चालला आहे. मग तो शाळेत टिळा लावणे असो वा देवीची आणि प्रभू श्री रामचंद्रांची शोभायात्रा असो. अशा अनेक गोष्टींना एकीचे बळ प्रत्युत्तर ठरावे.

पुढचा नंबर काँग्रेसचा?

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतरही ‘इंडी’ आघाडीची रडारड सुरूच आहे. दुसरीकडे काँग्रेसशासित राज्यांमध्ये मात्र काँग्रेसने जनतेच्या तोंडाला पाने पुसण्यास सुरुवात केली आहे. तिकडे कर्नाटकात लोकसभा निवडणूक आटोपताच काँग्रेसने पेट्रोलचे दर वाढवले. महागाईच्या नावाने खडे फोडणार्‍या काँग्रेसला कर्नाटकात मात्र जनतेला दिलासा देता आला नाही. त्याचप्रमाणे, तेलंगणमध्येही फार काही वेगळी परिस्थिती नाही. तिथेही काँग्रेसशासित सरकारकडून हिंदूंची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरूच आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने तेलंगणमध्ये अभूतपूर्व यश मिळवले. त्यामुळे चवताळलेल्या काँग्रेस सरकारने आता तेथे भाजपविरोध तीव्र केला आहे. हैदराबाद येथील रामदास चौरस्ता येथे काही गोतस्करांना गोरक्षकांनी अडविल्यानंतर त्याठिकाणी मोठा गोंधळ झाला. तसेच, गोरक्षकांवर हल्ला करण्यात आला. यात काहीजण जखमीदेखील झाले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी भाजप आमदार टी राजा सिंह हल्ल्यातील पीडित गोरक्षकांना भेटायला जात होते. त्यावेळी हैदराबाद विमानतळावर त्यांना अटक करण्यात आली. तेलंगण पोलिसांच्या या कारवाईवर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मुळात ही कारवाई बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली. त्यामुळे पोलिसांना शांतता प्रस्थापित करायची होती की शांतता भंग करायची होती, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. बंगाल, कर्नाटक आणि तेलंगण या ठिकाणी हिंदूंविरोध शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्रात गोहत्या बंदीचा कायदा आहे, तसा तेलंगणमध्येही होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. गायीला हिंदू धर्मात मातेचे स्थान देण्यात आलेले आहे. मात्र, अगदी बकरी ईदच्या पूर्वसंध्येला अशी गोतस्करी होत असेल, तर गोरक्षक त्यावर आवाज उठवणारच. त्यांच्यावर हल्ला करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला तरी यशस्वी होणार नाही. त्याचप्रमाणे, टी. राजा सिंह यांना कित्येकदा अटक आणि नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, मात्र तरीही त्यांनी हिंदुत्वाची आणि हिंदुरक्षणाची भूमिका सोडली नाही. तेलंगणमधून आता भारत राष्ट्र समिती आपला गाशा गुंडाळत आहे, आता पुढचा नंबर काँग्रेसचा लागला, तर नवल वाटायला नको.
 

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.